Home बातम्या ‘बनावट’ मतदारांची माहिती उघड करण्यास टाळाटाळ

‘बनावट’ मतदारांची माहिती उघड करण्यास टाळाटाळ

0

निर्मला सावंत यांचा आरोप

कुंभारजुवे मतदारसंघातील धुळापी, जुने गोवे या परिसरात मिळून सुमारे हजारांवर ‘बनावट’ मतदारांची नोंदणी झालेली असून या प्रकरणाची माहिती हक्क कायद्याखाली अर्ज करूनही माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे माजी वीजमंत्री तथा कुंभारजुवे मतदारसंघातील इच्छुक उमेदवार निर्मला सावंत यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

जुने गोवे येथील रेल्वे स्थानकाजवळील २४ क्रमांकाच्या घरात ७७ मतदारांची नोंदणी झालेली असून त्यांचे पत्ते तसेच प्रतिज्ञापत्रांवर सह्याही नसल्याचे अनेक अर्ज सावंत यांनी पत्रकारांना दाखविले. धुळापी येथील ४३४/४ क्रमांकच्या घरातील ७० मतदारांची नोंदणी झाली असून या एकाच घरात सर्व धर्माचे लोक एकत्रपणे राहात असल्याचे दिसून आले आहे. काही अर्जांवर बीएलओच्या सह्याही बोगस असण्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. या प्रकरणी आपण जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या विधानसभा निवडणुकीत आपला सुमारे ५०० मतांनी पराभव झाला होता. बोगस मतदारांमुळेच हा प्रकार घडत असून निवडणूक आयोगाने या प्रकाराची गंभीरपणे दखल घेऊन चौकशी करावी व बोगस नावे यादीतून काढून टाकावी, अशी मागणी सावंत यांनी केली. कुंभारजुवे मतदारसंघातून आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असून भाजप, मगो, गोवा विकास पार्टी व युगोडेपा या सर्व पक्षांनी पाठिंबा देण्याचे आश्‍वासन आपल्याला दिल्याचे सावंत यांनी एका प्रश्‍नावर सांगितले. पत्रकार परिषदेस निलेश गोम्स, रिचर्ड गोम्स, बाप्तीस पेरेरा व रोहिदास नाईक उपस्थित होते.