28 C
Panjim
Thursday, April 22, 2021

बद्धकोष्ठ ः मूळ अनेक रोगांचे

  •  डॉ. मनाली म. पवार
    (गणेशपुरी-म्हापसा)

पचलेल्या अन्नातील पाण्याचे शोषण मोठ्या आतड्याद्वारे होऊन मल तयार होतो. हे होत असताना पाणी जास्त प्रमाणात शोषले गेले तर मल जास्त घट्ट होतो आणि बद्धकोष्ठ हा त्रास होतो व मल पुढे सरकण्यात अडचण निर्माण होते.

मलविसर्जनाचा वेग आला असता वेगाचे धारण करणे किंवा मलप्रवृत्ती अडवून धरणे व त्याचवेळी शौचास न जाणे हे बद्धकोष्ठाचे सद्य परिस्थितीत महत्त्वाचे कारण आहे.

बद्धकोष्ठ म्हणजे रोजच्या रोज मलविसर्जन न होणे. नियमितपणे पोट साफ झालं की प्रत्येकाला एक समाधान लाभतं. प्रत्येकाच्या आयुष्यात अधूनमधून पोट साफ न होण्याचा त्रास हा कधीतरी होत असतो. पण तो बहुतेकवेळा विशेष महत्त्वाचा नसतो. सतत त्रास होत असल्यास मात्र याचे गांभीर्य लक्षात घ्यावे व योग्य त्या वैद्याचा सल्ला घ्यावा.

एकदा पोट साफ झालं की परत ती क्रिया होण्याचा काळ प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत निरनिराळा असतो. एखाद्याला दिवसातून दोन वेळा पोट साफ होईल तर एखाद्याला दोन दिवसातून एकदा. काही लोकांना दिवसातून तीन वेळा स्वच्छतागृहात किंवा शौचास जावे लागते तर काहींना सकाळी उठल्यावर एकदाच. युरोप- अमेरिकेत तर आठवड्यातून दोन वेळा प्रातर्विधी होणारे ‘निरोगी’ लोकही असतात.

एखाद्या व्यक्तीस तीन दिवस शौचास झालेच नाही तर मात्र पोटात साठलेल्या मलाचे खड्यामध्ये रुपांतर होते व शौचाला कमालीची वेदना होते. यालाच मलावरोध किंवा बद्धकोष्ठता म्हणता येईल.

बद्धकोष्ठ किंवा मलावरोध म्हणजे काय?
– आपण जे अन्न घेतो, त्याचे जठर आणि लहान आतड्यात अनेकविध पाचकरसांच्या मदतीने पचन होते. त्यानंतर ते मोठ्या आतड्यात जाते. याठिकाणी अन्नाचे अभिशोषण होते. पचलेल्या अन्नातील पाण्याचे शोषण मोठ्या आतड्याद्वारे होऊन मल तयार होतो. हे होत असताना पाणी जास्त प्रमाणात शोषले गेले तर मल जास्त घट्ट होतो आणि बद्धकोष्ठ हा त्रास होतो व मल पुढे सरकण्यात अडचण निर्माण होते.

बद्धकोष्ठाची कारणे –
आधुनिक जीवनशैलीमुळे झालेला आहार-विहारातील बदल हे बद्धकोष्ठतेचे प्रमुख कारण आहे.
त्याचप्रमाणे मलविसर्जनाचा वेग आला असता वेगाचे धारण करणे किंवा मलप्रवृत्ती अडवून धरणे व त्याचवेळी शौचास न जाणे हे बद्धकोष्ठाचे सद्य परिस्थितीत महत्त्वाचे कारण आहे. म्हणूनच आयुर्वेद शास्त्रामध्ये आरोग्य टिकविण्यासाठी म्हणा किंवा रोग होऊ नये म्हणून मल-मूत्रादी वेग अडवू नये, असे सांगणारा संपूर्ण एक अध्याय वर्णिलेला आहे.

* दिनक्रमातील बदल
* व्यायामाचा अभाव, सतत बैठे काम, शारीरिक हालचाली कमी.
* ए.सी.मध्ये जास्त वेळ काम करणे.
* प्रवास किंवा दुचाकीचा जास्त वापर
* मलविसर्जनात होणार्‍या त्रासाकडे दुर्लक्ष
* आतड्याच्या – गुदद्वाराच्या समस्या, आतड्यातील कार्यपद्धतीतील बिघाड
* आहार गरजेपेक्षा कमी घेतला जाणे, विशेषतः उपवास, डाएटचे फॅड
* आहारात मांसाहार, चीज, अंडी इ. पदार्थांचे अतिसेवन असणे.
* कॉफी व शीतपेयांचे वाढते अतिसेवन.
* कामाच्या ठिकाणी, बाजारात, शाळेत शौचालयांची उपलब्धता नसणे, उपलब्ध असले तरी त्यात स्वच्छतेचा अभाव असणे, त्यामुळे शौचाची भावना टाळण्याचेच प्रमाण जास्त होते.
* मूळव्याध किंवा अन्य कारणांसाठी भीतीने (वेदनेच्या भीतीने) नैसर्गिक शौच विसर्जनाची भावना झाल्यावर ती टाळण्याची सवय होणे.
* औषधे- लोह- कॅल्शिअमसारख्या गोळ्या-औषधांनी बद्धकोष्ठाचा त्रास उद्भवू शकतो. तसेच ऍसिडिटी कमी होण्यासाठी घेतली जाणारी अँटासिडसारख्या औषधांनी तसेच पोट साफ करण्यासाठी सतत रेचक औषधांचा वापर, वेदनाशामक गोळ्या, खोकल्याची काही औषधे, नैराश्यावरील औषधे यामुळे अनेकांना बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.
बहुसंख्य स्त्रियांना गरोदरपणात बद्धकोष्ठतेचा त्रास होतो.
* आजार – अनेक रुग्णांमध्ये मानसिक तणाव हे बद्धकोष्ठतेचे कारण असू शकते. म्हणजेच आयुर्वेद शास्त्राप्रमाणे विषमाशन, अध्यशन, लंघन, गुरू वा लघु-रुक्ष, शुष्क- विष्टंभी- पित्छिल गुणांचे वा आंबवलेले पदार्थ, आजचे फास्ट फूड, जंक फूड, रेडी-टू-इट फूड, चटपटीत खाणे, बेकरीचे पदार्थ, शीत पेये, जेवल्यानंतर आईसक्रीम इत्यादी वेळी-अवेळी, योग्य पद्धतीने न खाणे.

– रात्री जागरण व दिवसा झोपणे
– अतिव्यायाम किंवा व्यायामाचा अभाव
– अतिमैथुन
– मानसिक चिंता, व्यग्रता, अग्निमांद्य या कारणांनी बद्धकोष्ठतेचा त्रास होतो.
बद्धकोष्ठाची सामान्य लक्षणे –
– पोट फुगणे
– मलप्रवृत्तीचे वेळी प्रवाहन करावे लागणे, जोर द्यावा लागणे
– पुन्हा पुन्हा शौचास होणे
– शौचास सकष्ट, वेदना होऊन
– शिथिल किंवा ग्रंथिल असणे
– अपचन, मळमळणे, पोटात दुखणे, पोटात जळजळ होणे, आंबट ढेकर येणे, छातीत जळजळणे.
– झोप न येणे व झोपेत जास्त स्वप्नं पडणे
– उत्साह हानी, आळस येणे
– स्वभाव त्रासिक, चिडचिड होणे
– त्याबरोबर बद्धकोष्ठतेमध्ये अपानवायूची विकृती घडत असल्याने कृच्छव्यवायता (मैथुनाच्या वेळी वेदना होणे) व स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या वेळी पोटात दुखणे, कंबर दुखणे किंवा कष्टाने रजःप्रवृत्ती होणे… अशी लक्षणे आढळतात.

व्यवहारात बद्धकोष्ठतेचे दोन प्रकार आढळतात- ‘१. वातप्रधान, २. वातकफप्रधान बद्धकोष्ठ – वातप्रधान बद्धकोष्ठामध्ये मल पिच्छिल, शिथिल असले तरीही फार कुंथावे लागते. अधोदर गुरुता, मुखप्रदोक, मुखदुर्गंधितता, क्षुधाल्पता ही लक्षणे या प्रकारात आढळतात.
डॉक्टरांचा सल्ला घ्यावा का?
जर एखाद्याला प्रथमच शौचाला वारंवार शौच घट्ट होण्याचा त्रास, सतत पाच-सहा दिवस होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
ज्येष्ठ नागरिकांना शौचाला खडा होण्याची तक्रार उद्भवल्यावर त्यांनी काही अर्धवट उपचार ऐकीव माहितीतून किंवा अज्ञानातून करण्याऐवजी लगेचच वैद्यकीय सल्ला घ्यावा.

शौचाला घट्ट होण्याबरोबर खूप वेदना होत असतील, बद्धकोष्ठाच्या त्रासासमवेत जर वजनसुद्धा कमी होत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
तपासण्याची गरज केव्हा येते?
एखादे वेळेस बद्धकोष्ठ झाले तर काहीच तपासण्या करण्याची गरज नसते. काही प्रासंगिक कारणे. उदा. वेदनाशामक औषधे, लोहाच्या गोळ्या, मांसाहार अशा गोष्टी दूर केल्या जातात. मात्र दीर्घकालीन बद्धकोष्ठाचे निदान करण्यासाठी डॉक्टर गुदद्वाराची तपासणी हाताच्या बोटाने तसेच प्रॉक्टोस्कोपसारख्या साध्या उपकरणाने करतात.
रुग्णामधील इतर लक्षणांचा विचार करून काहींमध्ये रक्ताच्या तपासण्या करून हार्मोन्सची पातळी आजमावली जाते, तर काही रुग्णांमध्ये आतड्याचा बेरियम एक्स-रे, सोनोग्राफी, सिटी-स्कॅनदेखील करावा लागतो.

कोलोनोस्कोपी नावाच्या दुर्बीणीतून करावयाच्या विशेष महत्त्वाच्या तपासणीत मोठ्या आतड्याच्या आतील भाग डॉक्टर स्वतः नजरेखालून पडताळतात. यामध्ये आतड्याच्या दीर्घकालीन आजाराचे उत्तर मिळू शकते आणि निदान तसेच उपचार करणे सोपे जाते.
बद्धकोष्ठता टाळण्यासाठी…

बद्धकोष्ठाची व्यथा काही सोप्या गोष्टी आचरणात आणल्या तर टळू शकते.
त्यासाठी आपला आहार सर्व अन्नघटकांनी संतुलित असावा. त्यात चोथायुक्त पदार्थ म्हणजे ‘फायबर’ जास्त असावेत. उदा. फळे- संत्री, मोसंबी, अननस, सफरचंद, पालेभाज्या, शेंगा, तृणधान्ये वगैरे… मांसाहार टाळावा.

चोथा असलेली फळे आणि पालेभाज्यात विरघळणारे आणि न विरघळणारे, असे दोन्ही प्रकारचे घटक असतात. विरघळणारे पदार्थ पाण्यासह सहजगत्या मोठ्या आतड्यात जातात. न विरघळणारा चोथा जसाच्या तसा मोठ्या आतड्यात येतो. हा चोथा मलावरोध कमी करणारा असतो. त्यामुळे प्रत्येकाच्या आहारात किमान चाळीस ते पन्नास ग्रॅम चोथा असलाच पाहिजे.

आहारात दूध व तूपाचा समावेश करावा. तेलकट पदार्थ म्हणजे तेलात तळलेले पदार्थ पूर्ण टाळावे पण कच्चा तेलाचा वापर करावा. बद्धकोष्ठाचा त्रास असलेल्यांनी सकाळी दोन चमचे खोबरेल तेल प्यावे. तळलेला पापड पित्त वाढवतो, बद्धकोष्ठता निर्माण करतो पण तोच पापड नुसता निखार्‍यावर भाजून वरून तेल लावल्यास अपायकारक ठरू शकत नाही. आहारात जेवढा स्निग्धपणा असेल तेवढे आतड्यात काहीही न चिकटता, सरळ खडे न होता मलप्रवृत्ती होईल.

– तांदूळ, गहू आदी धान्य कोंड्यासह वापरणे पथ्यकर ठरते.
– सतत बसून न राहता, शारीरिक हालचाल वाढवावी. धावणे, पळणे, पोहणे, सायक्लिंगसारखे व्यायाम नियमित करावेत.
– लहान मुले व तरुणांसाठी मैदानी खेळ उत्तम ठरतात.
– सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे शौचाला जाण्याची भावना टाळू नये. त्याचप्रमाणे भावना झाली नसताना शौच होण्यासाठी विनाकारण ताण देऊ नये.
चविष्ट… पण वर्ज्य कराव्यात अशा गोष्टी…
– बाजारात मिळणारे सर्व प्रकारचे तळलेले व जड पदार्थ, वेफर्स, चॉकलेट, शीतपेये, चहा-कॉफी, पिझ्झा-बर्गर या सर्व गोष्टी ज्या चविष्ट आहेत. पण आरोग्यास हीतकारक नाही त्या सर्व गोष्टी टाळाव्यात.
– रात्री जागरण व दिवसा झोपणे टाळावे.
– भूक लागली नसता, पचन झाले नसताना जेवू नये.
– उपाशी राहू नये.

बद्धकोष्ठाची चिकित्सा –
बद्धकोष्ठामध्ये तीक्ष्ण विरेचन कधीही घेऊ नये. केवळ अनुलोमक औषधांचा उपयोग करावा. द्राक्षा, आरग्वध, निशोत्तर, हरीतकी, एरंडतेल, गंधर्वहरितकी यासारखी द्रव्ये वापरावीत.

– मृदु रेचनासाठी रात्री १५-२० मनुका गरम पाण्यात भिजत घालाव्या, सकाळी त्या कुस्करून पाण्यासकट सेवन करावी.

– एरंड तेल चपाती किंवा भाकरीच्या पीठामध्ये घालून त्याच्या चपात्या किंवा भाकर्‍या करून खाव्यात.

– वातप्रधान बद्धकोष्ठामध्ये स्नेहन, अनुवासन बस्ति यांचा चांगला उपयोग होतो.

– वातकफप्रधान अवष्टंभासाठी, स्नेहन, अनुवासन बस्ति न देता पिच्छिल द्रव्यांचा वापर करावा. इसबगोल, अहळीव, रानतुळशीचे बी वापरता येते.

– दूध हे मृदु विरेचक असल्याने दररोज रात्री झोपण्यापूर्वी दूध प्यावे.

– आंत्र व महास्रोतसातील अन्य अवयव या सर्वांना बल प्राप्त होण्यासाठी आमपाचकवटीचा उपयोग करावा.

– सुवर्ण, अभ्रक, वंग यांचा उपयोग इंद्रियबल्य यादृष्टीने चांगला होतो.

– विविध आसने व चक्रमणाचा व्यायाम बद्धकोष्ठामध्ये उपयुक्त ठरतो.
वरवर पाहता बद्धकोष्ठ हा तसा दुर्लक्षिला जाणारा विकार आहे, पण त्याचा फार बाऊ करू नये तसेच सतत त्रास होत असल्यास त्याकडे कानाडोळा करू नये.

STAY CONNECTED

848FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

चैत्रगौरी हळदीकुंकू ः निसर्गपूजा

सौ दीपा जयंत मिरींगकर(फोंडा) गौरीला माहेरपण करणे हे एक निमित्त. निसर्गातील फळाफुलापानांचे रंग, रूप, चवी अनुभवायला आणि लेकीबाळींना...

कालमापनाचे साधन ः ‘पंचांग’

सुमरंग रायसालसेत आम्ही वर्ष, महिना, वार, दिवस जसं लक्षात ठेवतो, तसं पंचांग लक्षात ठेवायला त्रास नाही. ग्रहणाची वेळच सांगते की आमचं पंचांग...

असे व्हायला नको होते, पण…

ज. अ. रेडकर(सांताक्रूझ) ‘‘कुठेही गेले तरी आता पैसे दिल्याशिवाय नोकरी मिळत नाही सर, तेव्हा माझा नाइलाज आहे, निदान...

आईची माया

प्राजक्ता गावकर ‘‘आईची मायाच तशी असते ग पोरी.’’ अपघातात आई गेली पण तिच्या मनात तुला आणि बाळाला पाहायचे...

टॅक्सीचालकांनी संप मागे घेत चर्चेसाठी पुढे यावे ः मुख्यमंत्री

राज्यातील टुरिस्ट टॅक्सीचालकांनी आपला संप मागे घेऊन चर्चेसाठी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांच्या एका प्रश्‍नावर बोलताना काल...

ALSO IN THIS SECTION

कोरोना लसीकरण घ्यावे का?

डॉ. मनाली म. पवार(सांतइनेज) या एका वर्षात संशोधकांनी कठोर मेहनतीने कोरोनावर लस बनवली; मात्र आज कोरोना लसीकरण जगभरात...

थर्टीन

लेख- १३ बायोस्कोप प्रा. रमेश सप्रे ‘थर्टीन’ शब्दाचेही दोन पैलू आहेत. शुभ नि अशुभ! आपण अशुभ...

अनासक्तीचा आदर्श ः ‘कमळ’

योगसाधना - ५००अंतरंग योग - ८५ डॉ. सीताकांत घाणेकर शास्त्रीजी कमळाबद्दल सारांश करताना म्हणतात- कमळ...

क्षयरोग्यांनाही लसीकरण उपयुक्त

डॉ. प्रदीप महाजन (रिजनरेटिव्ह मेडिसिन रिसर्चर) या लसींमध्ये सक्रिय व्हायरस नसतो ज्यामुळे एखाद्याला रोगाचा त्रास होईल किंवा आरोग्य...

उन्हाळ्यात त्वचेची काळजी

डॉ. मनाली म. पवार(सांतइनेज-पणजी) सूर्याच्या प्रखर उष्णतेने शरीराचा ओलावा कमी होतो, घामावाटे, मूत्रावाटे व काही प्रमाणात मलावाटे शरीरातून...