मानसिक ताण व त्वचा

0
220
  •  डॉ. अनुपमा कुडचडकर
    त्वचारोग तज्ज्ञ (हेल्थवे हॉस्पि. जुने गोवे)

हल्ली आईवडील कामाला जातात. विभक्त कुटुंब. मुलं घरात एकटी नाहीतर पाळणाघरात. संस्कार होणार तरी कुठून? सुख, माया, ममता, आपुलकी म्हणजे काय हे त्यांना दाखवून तरी कोण देणार? त्यामुळे दुःख, राग, द्वेश, स्वार्थ हल्लीच्या मुलांमध्ये वाढलेला आढळतो.

आपण सर्वांनी हे गाणं ऐकलं असेल ‘‘मेरे मन ये बता दे तू, किस ओर चला है तू, क्या पाया नही तुने, क्या ढुंढ रहा है तू..’’ खरंच आपलं मन काय काय विचार करत असतं? कुठं कुठं क्षणाक्षणाला हिंडत असतं. आपल्याकडे सगळं असूनसुद्धा ते काही ना काही नवीन नवीन शोधत असतं. कितीही मिळालं तरी आपण समाधानी नसतो. माणूस जातीच्या मनाची कधीच पूर्ण तृप्तता झालेली दिसत नाही. सकाळी होताच मनाची चक्रं फिरायला लागतात ती रात्री झोप येईपर्यंत ती काहीना काही विचार करतच असतात.

आपल्या मनाचा व आजूबाजूला घडणार्‍या घडामोडींचा जवळचा संबंध असतो. प्रत्येक घडणारी गोष्ट मनावर परिणाम करत असते. त्यामध्ये चांगले व वाईट परिणाम मनावर होत असतात. आपल्या मनावर होणारे परिणाम कळत नकळत आपल्या आरोग्यावर परिणाम करत असतात.

पूर्वीच्या काळी घरोघरी मुलांवर चांगले संस्कार व्हायचे. एकत्र कुटुंब पद्धती होती. घरात आजी-आजोबा असायचे. त्यामुळे मुलांच्या शारीरिक वाढीबरोबर चारचौघात कसं नांदायचं, मिळून-मिसळून कसं रहायचं, प्रत्येक गोष्टीची वाटणी कशी करायची ही शिकवण आपोआप अंगवळणी पडायची. पण हल्ली आईवडील कामाला जातात. विभक्त कुटुंब. मुलं घरात एकटी नाहीतर पाळणाघरात. संस्कार होणार तरी कुठून? सुख, माया, ममता, आपुलकी म्हणजे काय हे त्यांना दाखवून तरी कोण देणार? त्यामुळे दुःख, राग, द्वेश, स्वार्थ हल्लीच्या मुलांमध्ये वाढलेला आढळतो. त्यांच्या जेवणाखाण्यातही समतोल नसतो. आपल्या मनातल्या भावना किंवा इच्छा ते हव्या तशा व्यक्त न करू शकल्यामुळे त्यांचा मानसिक ताण वाढलेला आढळतो. वाढलेल्या मानसिक ताणांमुळे आरोग्याच्या विविध तक्रारी उद्भवतात. हॉर्मोन्समध्ये होणारा बदल हा मानसिक ताणामुळे होणारा सर्वांत मोठा बदल आहे. त्याचे परिणाम त्वचेवर दिसू लागतात- जसे चेहर्‍यावर मुरूम येणं, केसात कोंडा होणं, केसतोड, नखं खाणे, सोरीयासिस, कोड, केस गळणे, टक्कल पडणे, त्वचेवर खाज येणे अशा अनेक त्वचेच्या समस्या मानसिक ताणामुळे उद्भवू शकतात.

मानसिक ताण असलेल्या व्यक्तींनी आपल्या जवळच्या माणसांकडे आपल्या भावना बोलून दाखवल्या पाहिजे. त्यावर काहीतरी मार्ग शोधला पाहिजे. प्राणायाम, योगासन, ध्यान यांसारखे उपायसुद्धा मानसिक ताण कमी करायला फार फायद्याचे ठरतात.
लहान मुलांना योग्य मार्गदर्शन करून आईवडिलांनी व शिक्षकांनी त्यांचे मानसिक ताण कमी करायला मदत केली पाहिजे. जर आपण सतत आनंदी व समाधानी रहायला शिकाल तर आजचे मानसिक ताण व आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मानसिक ताणामुळे त्वचेच्या काही समस्या उद्भवलेल्या असतील तर त्यावरही उपचार केले पाहिजेत. गरज पडल्यास मानसोपचार तज्ज्ञांची मदतही घेतली पाहिजे.