फुले

0
28
  • – मीना समुद्र

फुलांचं आयुष्य एका दिवसाचं असलं तरी काही फुले आठवणीत कायम दरवळत राहतात. झाडावेलींवर फुलणार्‍या फुलांनी सृष्टिसौंदर्य तर बहरतेच; पण पाहणार्‍याचे मनही उल्हसित, आनंदित, प्रफुल्लित होते. मग ती अगदी निर्गंध, अनाम, वेड्या बहराची अशी रानफुले का असेनात!

अनेक फुले फुलती, फुलोनिया सुकोनी जाती
कोणी तयांची महती गणती ठेविली असे
फुलांच्या बाबतीत कुण्या कवीने म्हटलेले हे उद्गार काहीसे सार्थ असले तरी पूर्णतः ते तसे वाटत नाहीत. फुलांचं आयुष्य एकाच दिवसाचं असलं तरी काही फुले आठवणीत कायम दरवळत राहतात, परिमळत राहतात. झाडावेलींवर फुलणार्‍या फुलांनी सृष्टिसौंदर्य तर बहरतेच; पण पाहणार्‍याचे मनही उल्हसित, आनंदित, प्रफुल्लित होते. मग ती अगदी निर्गंध, अनाम, वेड्या बहराची अशी रानफुले का असेनात!
कधी ती एखाद्या भूप्रदेशाची खासियत असतात. सध्या पावसाळ्यात फुलणारी ब्रह्मकमळे ही खरी ब्रह्मकमळे नसून एका जातीच्या वेलीवर उमलणारी ती रानफुले आहेत. आणि खरे ब्रह्मकमळ ज्याला म्हणतात ते हिमालय, काश्मीरसारख्या थंड प्रदेशातच उमलतात म्हणे! पण अगदी क्वचित वर्षाकाठी संध्याकाळनंतर फुलणारं, शुभ्रतेनं आणि कोमलतेनं, मंद गंधानं आणि मंद्र डोलण्यानं आकर्षित करणारं हे ओंजळीत मावेलसं फूल मात्र त्या संज्ञेला पात्र वाटतं. हरएक छोट्यामोठ्या फुलाचे आकार-प्रकार, रंग-गंध, रस, ऊर्मी, नजाकत अगदी वेगळी असली तरी फुलण्याचा आनंद तोच आणि इवल्या इवल्या जीवाचा सोहळा करण्याची रीतही तीच. एका जातीची- पातीची फुलं पाहावीत तर त्यांचा नाकनक्षा अगदी पारंपरिक! त्यांची पानं, देठ, पाकळ्या, पराग यांची ठेवण अगदी एकसारखी. गंधदानाची सवयही तशीच उदारहस्ताची! आणि गालावरचे सूर्यचंद्राच्या किरणसाथीने फुलत जाणारे हसूही अगदी तसेच वेधक. अनेक फुलांजवळ सृजनशक्तीची असलेली अंतःप्रेरणा आणि त्यांचे फलधारणेत झालेले संपूर्ण सुफल रूपांतर! सृष्टीचा संसार सावरणारी, सजवणारी ही फुले!

झाडांच्या, वृक्षवेलींच्या या बाळांना आपण माणसांनी सुंदर सुंदर नावे ठेवली. त्यांच्या प्रतिभेतून ती स्फुरली असंच म्हणायला हवं. रंग-गंधासारख्या त्यांच्या गुणवैशिष्ट्यांवरून माणसाच्या रंगरूपाचे, गुणांचे वैशिष्ट्यपूर्ण वर्णन होऊ लागले. त्यांच्यातली श्रेष्ठता-कनिष्ठताही ठरवली गेली. साहित्यातल्या उपमा, रूपके फुलांनी सजू लागली. प्रचंड प्रमाणात होणारे हे वृक्षवेलींचे नवनवोन्मेष अलंकार बनून माणसाची तनू भुषवू लागले. गजरे डोईत, मनगटात बांधू जाऊ लागले. ताज्या ताज्या, प्रसन्न, कोमल फुलांनी ईश्‍वराची पूजा होऊ लागली. कोणत्याही सणा-समारंभाला ती घरेदोरे सजवू लागली. आदर-सत्कार, कृतज्ञता, मानसन्मानही पुष्पप्रदानाने व्यक्त होऊ लागले. तान्ह्या बाळांची दृष्ट फुलांचीच आणि नवपरिणितांची शेजरी फुलांचीच. बाळजन्माचा पाळणा फुलांनीच सजवायचा आणि जन्मलेल्या प्रत्येकाला त्याच्या अखेरच्या प्रवासात साथही फुलांचीच.
अशा असंख्य, अगणित फुलांचे हारेच्या हारे, टोपल्याच्या टोपल्या भरभरून दसरा-दिवाळीसारखे सण-समारंभ, लग्न समारंभ, वाढदिवस पुष्पवर्षाव करून, पाकळ्या अंथरून साजरे होऊ लागले. फुलांच्याच रांगोळ्या आणि पायघड्या, फुलांचेच अलंकार, फुलांचीच पखरण, फुलांची अत्तरे, फुलांचे सुगंधी वारे, फुलांच्या कहाण्या, फुलांचे बोल, फुलांची संगत, फुलांची सोबत. फुलासंगे फुलणे, फुलाभोवती झुलणे, फुलांसारखे डोलणे, फुलांच्या रंगी रंगणे- गंधणे… रमण रणदिवे नावाच्या एका कवीने म्हटल्याप्रमाणे- ‘जीव लावणार्‍या माणसावर जीव ओवाळून टाकतात फुलं|’
झाडाझुडपांना, वृक्षवेलींना जीव लावणारी, त्यांची निगा राखणारी, त्यांचे संरक्षण-संवर्धन करणारी, त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारी माणसंही असतात जगात. निसर्गाचं सानुलं, गोजिरवाणं रूप वार्‍यावर डोलतं तेव्हा एखादा बालकवी ‘फुलराणी’ कविता लिहून फुलामुलांचा कवी म्हणून अजरामर होतो. ‘चाफा बोले ना, चाफा चाले ना’ म्हणत कवी ‘बी’ त्याला आपल्याबरोबर खेळायला-नाचायला बोलावतात. ‘टिप् फुले टिप् म्हणत’ कविवर्य मंगेश पाडगावकर प्राजक्ताची फुलं टिपायला सांगतात. ‘लपविलास तू हिरवा चाफा, सुगंध त्याचा लपेल का’ म्हणत ‘प्रीत लपवुनी लपेल का’ असा सवाल विचारला जातो. गोष्टीतली एखादी मुलगी फुलातून जन्म घेते. कुणी राजपुत्र आपल्या प्रेयसीसाठी गुलबकावलीचं फूल आणायला जातो. ‘आपल्याच गंधछंदात झंकारताना फुलं पानाफुलातून वाहणार्‍या वार्‍याचे श्‍वास मंतरून टाकतात. इवल्याशा दवातले आकाश कवेत घेतात. समंजस फुले बागेतील प्रेमिकांचा श्रृंगार पाहून पानाआड दडतात. स्वप्नांची आशा फुलवीत टिकवून ठेवतात. पण माणुसकीची हत्या होताना बघताना घायाळ होतात. माणूस अधिक निर्दयी बनू नये यासाठी तर रोज उमलत असतात’ अशा भावकोमल शब्दात रमण रणदिवे यांनी फुलांची कविता लिहिली आहे.

फुलांबाबतीत अगदी छोट्या फुलांचा जीवही कसा अळुमाळू होतो हे ‘मोगरीचं बाळ’ या कवितेत कवीने अतिशय हळवेपणाने मांडले आहे. मोगरीचं फूल हे मोगरीचं बाळ आहे. ‘ते तोडून त्याच्या आईपासून त्याला दुरावू नकोस’ असं एक छोटा आपल्या आईला सांगत आहे.

प्राजक्त, बकुळी, मोगरा, जाई-जुई ही सारी भरभरून ओसंडणारी अन् जमिनीवर सांडणारी अन् सुगंध पेरणारी ‘बहराची’ फुलं. सोनचाफा, गुलाब ही अत्यंत सुगंधी अशी आपले राजस रंगगंध खुलवीत फुलणारी. जास्वंदी, अबोली, सदाफुली, गुलबक्षी, शंकासूर, गोकर्ण, गणेशवेल अशी निर्गंध पण रंगलालित्य दाखवणारी. रातराणी, सुरंगी, निशिगंधा ही सुवासाचे रंध्ररंध्र खुलवणारी. झेंडू उग्र वासाबरोबर उत्फुल्लतेला केशरपिवळ्या रंगाने सजविणारे. शेवंती मंद वासाने स्मितहास्य फुलविणारी. अनंत, तेरडा, कव्हेर, गुलमोहर, बोगनवेल… किती किती म्हणून फुलं सांगावीत? रानफुलं वेगळीच. बहाव्याचा नूर आगळाच. चिंचेच्या फुलांचा थाट वेगळाच. फुलांच्या विश्‍वात मन रंगून-गुंगून जातं. रंगगंधात न्हावून निघतं. सतेज, प्रसन्न, पवित्र होतं. फुलपाखरं, भुंगे, मधमाश्या आणि फुलचुखे पक्षी यांच्यासारखे मधुरसपान करतात. लज्जेनं गाली गुलाब फुलतात. नाक चाफेकळीसारखं, मान कमळदेठासारखी (मृणालनाल), हात कमलकवीसारखे आणि पाय तर कमळासारखे (चरणकमल), वर्ण चाफेगौर, डोळेही कमळासारखे (कमलाक्ष, कमलनेत्र) अशा वर्णनातून फुलात गुंतलेलं मनच दिसतं. सतेज, कोमल, टवटवीत, ताजीतवानी, घवघवीत, प्रफुल्लित ही सारी विशेषणे फुलांना लागू होतात. उंबराचं फूल म्हणजे अप्राप्य वस्तू. उंबराचं फूल दिसत नाहीसं म्हणतात. कधी फुलं बारमाही तर काही मोसमी दिसणारी; काही तर अगदी थोड्या काळापुरतीच उमलणारी आणि तासा-दोन तासात मिटणारी; काही सकाळी फुलणारी तर काही संध्याकाळी अन् काही रात्री… मनाची फांदीन् फांदी आनंदाने डोलविणारी ही फुले, गंधाने भान हरपविणारी ही फुले. श्रावणमासात बहर ओसंडून वाहणारी ही फुले. पावसाळ्यानंतर कासचे पठार म्हणे फुलांनी फुलते आणि ती पाहण्यासाठी माणसे जातात. फुले असतातच अशी सुदर्शन. ती जेव्हा तरुवेलींच्या अंगावर समरसून फुलतात तेव्हा त्यांचे वैभव अगळेच असते. चेरीच्या फुलांचा बहर मग साजरा केला जातो. गुलमोहोर फुलला की आपल्याला आनंद होतो. सावरीच्या मधुप्याल्यातले रसपान करणारे पक्षी आपल्याला अनुपम सौंदर्याचे धनी करतात, आणि आस्वादाचा धडा घालून देतात.
मनवेलीवरती फुले प्रीतीचे फूल
राधेला पडते निळी सावळी भूल
अन् रंग सुरंगी दाटुन ये हृदयात
गगनात उमलते चंद्रफुलांची रात
अशा ओळीही झरझरत येतात. सर्वस्वाचे दान देऊन एकाच दिवसाचं आयुष्य जगणार्‍या फुलांप्रती कृतज्ञतेची ओंजळ वाहण्यासाठीही फुलेच असतात. ईश्‍वरसान्निध्यात जीवाचे सार्थक करणारी ही फुले उमलविणार्‍या ईश्‍वराला पवित्र पुष्पांजलीच वाहिली जाते. त्यांचे निर्माल्यही पवित्र असते.