फक्त तू जागी हो या ठार झोपेतून!

0
580

श्री शारदा ग्रंथप्रसारक संस्था व कला, संस्कृती संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने फोंडा येथे नववे गोमंतक महिला साहित्य संमेलन नुकतेच पार पडले. संमेलनाध्यक्षा नीरजा यांचे अध्यक्षीय भाषण-

नमस्कार,

रदा ग्रंथप्रसारक संस्थेने आयोजित केलेल्या ९व्या गोमंतक महिला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मला दिल्याबद्दल मी प्रथम या संमेलनाच्या आयोजकांचे तसेच संगीता अभ्यंकर यांचे आभार मानते आणि आपण दिलेले हे अध्यक्षपद नम्रपणे स्वीकारते.

फोंड्यातील महिलांनी पुढाकार घेऊन स्थापन केलेल्या या संस्थेने महिला व मुलांसाठी जे काम केलं आहे त्याचा वृत्तांत मी वाचला आणि त्यातलं एक वाक्य मला विशेष भावलं. मुलांना वाचायची गोडी लागण्यासाठी आईनंही वाचलं पाहिजे या भावनेतून त्यांनी हे वाचनालय सुरू केलं असं म्हटलं आहे. माझ्या दृष्टीने हा विचारच खूप महत्त्वाचा आहे. घरातला एक पुरुष शिकला तर तो एकटाच शिक्षित होतो. पण जर बाई शिकली तर सारं घरच शिक्षित होतं असं म्हणतात. आपल्याकडं तशी अनेक उदाहरणं आहेत की आईचं वाचनाचं वेड मुलांना वाचनाकडं घेऊन जातं. अनेक लेखक-कवींनी सांगितलेल्या गोष्टींतून हे उलगडलं गेलं आहे. मंगेश पाडगावकरांसारखे कवी तर आपल्या आईचं हे ऋण नेहमीच मानतात. त्यामुळे महिलांनी वाचनाकडे वळावं यासाठी उभ्या केलेल्या या वाचनालयाचा हा वृक्ष असाच बहरत राहो अशा मी आपणा सर्वांना शुभेच्छा देते.

माधवी देसाईंच्या अध्यक्षीय कार्यकाळात आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेलं हे संमेलन गेली आठ वर्षं होतं आहे. हे नववं वर्ष. याआधी माझ्या अनेक मैत्रिणींनी या संमेलनाचं अध्यक्षपद भूषविलं आहे. त्यांच्याबरोबरीनं मीही आता शारदा ग्रंथप्रसारक संस्थेचीच एक सदस्य झाले आहे आणि त्याचा मला खरोखरच आनंद वाटतो.

आज लेखिका संमेलनाचं अध्यक्षपद आपण मला दिलंत त्यामागे आपली नेमकी काय भूमिका आहे मला माहीत नाही. पण मी गृहीत धरते की माझं लेखन, कथा, कविता आणि इतर प्रांतात केलेलं थोडंफार काम आणि त्याबरोबरच एक स्त्री म्हणून जगताना असलेल्या माझ्या भूमिकांचा विचार केला गेला असावा. म्हणूनच आज प्रारंभीच माझ्या पूर्वसुरींचं स्मरण करणं मला आवश्यक वाटतं. यांत डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी म्हणणारी जनाबाई आहे, सूर्याला गिळण्याची ताकद इवल्याशा मुंगीमध्ये आहे हे सांगून स्त्रीसामर्थ्याचा उद्घोष करणारी मुक्ताबाई आहे, महदंबा, सोयराबाई, बहिणाई आहे. जरी फुटल्या बांगड्या मनगटी करतूद असं ठणकावून सांगणार्‍या बहिणाबाई चौधरी आहेत. लक्ष्मीबाई टिळक, इंदिरा संत, शांता शेळके, विभावरी शिरूरकर, कमल देसाई, गौरी देशपांडे आहेत आणि आज लिहित्या असलेल्या, आपल्या स्वत्वाच्या शोधात असलेल्या आधीच्या व आजच्या पिढीतील माझ्या सर्व मैत्रिणी आहेत. त्याचबरोबर शब्दांवर प्रेम करणार्‍या तुमच्यासारख्या सख्या आहेत. या सर्वांच्या वतीने मी या अध्यक्षपदाचा स्वीकार करते.

माझ्याविषयी मी फारसं बोलणार नाही. पण एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते आणि ती म्हणजे, आज मी जी काही आहे त्यामध्ये माझ्या आईवडिलांनी माझ्यावर केलेल्या संस्कारांचा महत्त्वाचा वाटा आहे. हे संस्कार मूल्यभान जपणारे होतेच, पण त्याबरोबरच आत्मभान जागविणारेही होते. आपण वाढत असतो ते त्यांना पाहत त्याचं अनुकरण करतच. मीही तशीच वाढले. बाबांचं पुस्तकांविषयीचं प्रेम माझ्यातच नाही तर आम्हा सर्व बहिणींत उतरलं. घरात केवळ पुस्तकं पाहत मी मोठी झाले. लिहिता-वाचता यायला लागल्यापासून वाचनाला सुरुवात झाली. ती भूक एवढी प्रचंड होती की सातवी-आठवीपर्यंतच मी आपल्याकडचे बरेचसे लेखक वाचले होते. त्यात लहान मुलांच्या पुस्तकांपासून खांडेकर, फडके होतेच; पण त्यांच्याबरोबरच शरदचंद्र चटर्जींच्या सार्‍या कादंबर्‍या वाचून झाल्या होत्या. अण्णाभाऊ साठे, गंगाधर गाडगीळ, व्यंकटेश माडगूळकर अशा कथाकारांच्या कथा, शिरवाडकर, कानेटकर, तेंडुलकरांची नाटके सगळ्यांचा फडशा पाडला होता. दहावीपर्यंत अरुण साधू, जी. ए. कुलकर्णी वाचून झाले आणि मग इंग्रजी घेऊन ग्रॅज्युएशन करायचं ठरवल्यावर सुरुवात केली ती जेन ऑस्टेन, चार्लस् डिकन्सपासून. पुढे अमेरिका, युरोपियन साहित्याचा अभ्यास करताना झालेलं वाचन मला वेगळ्या तर्‍हेनं घडवत गेलं. आपण वाचतो ते कधीच वाया जात नाही. त्याचे संस्कार कळत नकळत आपल्यावर होत असतात. माझ्यावर जी. ए. मर्ढेकर, टी. एस. इलियट, कामू, सार्त्र यांचा प्रभाव होता. कविता मात्र मी उशिरा वाचायला लागले. या सर्वांच्या प्रभावामुळे मी निरीश्‍वरवादी झाले.

माझ्या आईचाही माझ्यावर प्रभाव होता. तिचा मोकळाढाकळा स्वभाव, तिच्यात असलेली ऊर्जा, तिची काम करण्याची क्षमता, निर्णय घेण्याची क्षमता, तिनं स्वतःसाठी निर्माण केलेलं अवकाश पाहत मी मोठी झाले. बाबा नोकरीसाठी माझ्या जन्माच्या वेळीच मनमाडला गेल्यानं आईनं कर्त्याची भूमिका बजावली. घरात चार मुली, आजी, आई, आत्या अशा सहा बायका. त्यामुळे बायकांचंच राज्य. मुलगा आणि मुलीमध्ये कसलाही भेद न मानणार्‍या घरात मी वाढले. माझ्या पणजीला वाटत होतं आम्हाला एखादा भाऊ असावा, पण आईबाबा किंवा आजीलाही तसं बोलताना मी पाहिलं नाही. चार मुलींना व्यवस्थित वाढवलं गेलंच, पण त्यांच्या शिक्षणाला महत्त्व दिलं गेलं. शिक्षणापासून लग्नापर्यंतच्या सार्‍या निवडींचं स्वातंत्र्य ज्या घरात दिलं गेलं त्या घरात वाढताना झालेल्या संस्कारांमुळेच कदाचित स्त्रियांच्या जगण्याचा विचार मी करू लागले असेन. माझा पिंडही तसा बंडखोरच. प्रत्येक गोष्टीसाठी माझ्याकडे प्रश्‍न असायचे आणि त्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न मी करायचे. माझा हा स्वभाव आणि त्याच्या जोडीला मी केलेलं वाचन मला विचार करायला प्रवृत्त करत होतं. त्यातून माझं लेखन सुरू झालं. माझ्या नकळत माझ्या कवितेतला सूर आक्रमक होऊ लागला. पुढे वैचारिकही वाचन झालं. सिमॉन द बोव्हाचं सेकंड सेक्स वाचलं आणि आपल्याला जे वाटतंय तेच ही म्हणते आहे हे लक्षात आलं. मनुस्मृती मुद्दामहून वाचली आणि स्त्रीविषयीची मतं, त्यांच्यासाठी केलेले नीतिनियम वाचल्यावर अस्वस्थ झाले. आपल्या व्रतवैकल्यांचा, आपल्या पुराणकथांचा अर्थ नव्याने लावू लागले आणि लक्षात आलं या पुरुषसत्ताक व्यवस्थेने स्त्रियांना परिघावर लोटले आहे. त्यांना शूद्राहूनही क्षूद्र लेखलं आहे. त्यांना ताब्यात ठेवण्यासाठी कधी त्यांचं, त्यांच्यातल्या शक्तीचं, मातृत्वाचं उदात्तीकरण केलं तर कधी त्यांनी वस्त्रालंकारात रमावं, स्वयंपाकपाण्यात आयुष्य घालवावं अशी सोय केली. त्यांना शिक्षण नाकारलं आणि उंबरठ्याआत लोटलं. पातिव्रत्य आणि चारित्र्य सांभाळण्याची सक्ती केली आणि या गोष्टी जोडल्या त्या तिच्या शरीराशी. अशा अनेक गोष्टींनी अस्वस्थ केलं, त्यामुळेच कदाचित माझ्याकडून अशा प्रकारचं लेखन झालं असावं.

या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोतच, पण त्याआधी लेखिका संमेलनाविषयी. आज अनेक संमेलनं भरताहेत. अखिल भारतीय साहित्य संमेलनांबरोबरच प्रत्येक धर्माची, जातींची साहित्य संमेलनं भरतात. त्यात लेखिकांचाही सहभाग असतो. पण तरीही आज महाराष्ट्रातही वेगवेगळी लेखिका साहित्य संमेलनं भरत आहेत. त्यात कुसुमताई चौधरी महिला कल्याणीतर्फे एका विशिष्ट रूपबंधाला वाहिलेलं संमेलन आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेचं महिला साहित्य संमेलन आहे, विदर्भ साहित्य संघाचं महिला साहित्य संमेलन आहे. तुमचं हे लेखिका संमेलन आहे. अशा संमेलनांची गरज काय किंवा बायकांनी वेगळी चूल मांडायची गरज काय असा प्रश्‍न विचारला जातो. पण स्वतःचं मोकळं अवकाश शोधण्यासाठी स्त्रियांना अशा संमेलनांची गरज आहे. मागे मी गोव्यात चैत्रांगी संमेलनाला आले होते. तिथे ज्या प्रकारे स्त्रिया मोकळ्या होत होत्या ते पाहून मला एका गोष्टीचं उत्तर मिळालं आणि ते म्हणजे, आपल्या व्यवस्थेनं तयार केलेल्या चौकटीत राहताना ज्या गोष्टी चार लोकांत बोलू शकत नाहीत त्या गोष्टी त्या एकत्र आल्यावर बोलतात. मी माझ्या एका कवितेत म्हटल्याप्रमाणे दावं सुटलेल्या गाईसारख्या उधळतात. कदाचित हा स्वतःचा अवकाश त्यांना मिळावा म्हणूनच पूर्वी व्रतवैकल्य अथवा मंगळागौर, हळदीकुंकू यांसारख्या सोयी सणांच्या नावाखाली त्यांच्यासाठी झाल्या असाव्यात. पण आज त्याचे संदर्भ बदलले आहेत. आज जेव्हा स्त्री शिक्षित झाली आहे, विचार करू लागली आहे तेव्हा एकत्र येण्यासाठी तिला अशा व्रतवैकल्यांची गरज आहे का असा प्रश्‍न आपण स्वतःला विचारायला हवा. एकत्र येण्यासाठी आज आपल्याकडे अनेक कारणं आहेत. आपली विद्यापीठं आहेत, चर्चासत्रं आहेत, अशा प्रकारची संमेलनं आहेत. तिथं येऊन तिनं मोकळं व्हायला काय हरकत आहे? काही नसलं तर आपले शब्द आपल्यासोबत आहेतच. त्यांच्या मदतीनं तिला मोकळं होता येईल असं मला वाटतं. या कारणासाठीच अशा प्रकारच्या संमेलनांची गरज आहे असे मला वाटते.

मैत्रिणींनो, मराठी साहित्यात, कोकणी साहित्यात त्याचप्रमाणे भारतातीलच नाही तर जगातील सार्‍याच भाषांतील साहित्यात स्त्रियांनी मोलाची कामगिरी केली आहे. जागतिक पातळीवर व्हर्जिनिया वूल्‌फ असेल किंवा सिमॉन द बोव्हा असेल, भारतात अमृता प्रीतम, इस्मत चुगताई, महाश्‍वेतादेवी, इंदिरा गोस्वामी, ललिताम्बिका, वैदेही, बामासारख्या लेखिका असतील; सार्‍यांनीच स्त्रीच्या जगण्याला शब्दबद्ध केलं आहे. मी आज बोलणार आहे ते मराठी लेखिकांच्या मराठी साहित्याला दिलेल्या योगदानाबद्दल. थोड्या वेळात सारा पट मांडता येणार नाही. पण स्त्रीच्या वेदनेला आवाज देणार्‍या, तिला आत्मभानाकडे घेऊन जाणार्‍या लेखिकांबद्दल मी थोडं बोलेन. तसं पाहिलं तर आज लेखिकांची संख्या कमी आहे, पण त्यांनी जे काही लेखन केलं आहे त्यानं मराठी साहित्यात मोलाची भर पडली आहे. ताराबाई शिंदे, सावित्रीबाई फुले, लक्ष्मीबाई टिळक यांच्यापासून सुरू झालेला हा प्रवास आज कविता महाजन, मोनिका गजेंद्रगडकर यांच्यापर्यंत येऊन पोचला आहे. विभावरी शिरूरकरांनी मुक्या कळ्यांचे निःश्‍वास आपल्यापर्यंत पोचवले. त्यांच्या जोडीनं कुसुमावती देशपांडेही लिहीत होत्या. पुढे कथा-कादंबरीच्या क्षेत्रात जी महत्त्वाची नावं पुढे आली त्यात कमल देसाई, गौरी देशपांडे, विजया राजाध्यक्ष, ज्योत्स्ना देवधर, निर्मला देशपांडे, आशा बगे, सानिया, शांता गोखले, अंबिका सरकार, ऊर्मीला पवार, प्रिया तेंडुलकर, मेघना पेठे अशा महत्त्वाच्या लेखिका. लोकप्रिय कादंबरीकार, कथाकारांचा समावेश मी केला नाही, कारण त्यांच्या लेखनावर पुरुष लेखकांचा प्रभाव होता. पुरुष ज्या नजरेतून स्त्रीकडे पाहत होता त्याच नजरेतून त्या आपल्या कादंबरीतील नायिका रंगवत होत्या. म्हणजे पारंपरिक, सहनशील, त्यागी वगैरे. आज टीव्ही मालिकांत दाखवल्या जातात तशा. केवळ ज्योत्स्ना देवधर त्याला अपवाद आहेत असं मला वाटतं. या लेखिकांनी त्यांच्या नायिकांना स्वतःचा आवाज दिला, स्वतःची ओळख दिली, आत्मभान दिले, निर्णयस्वातंत्र्य दिले. या विचारी नायिका स्वतःच्या शोषणाविषयी सजग झाल्या. त्याविरोधात आवाज उठवण्याचं बळ त्यांना त्यांच्या निर्मात्यांनी म्हणजेच लेखिकांनी दिलं. एवढंच नाही तर त्या आपल्या स्वातंत्र्याविषयी, आपल्या रतीप्रेरणांविषयी बोलायला लागल्या. स्वतः लेखिकांना आत्मभान आलं नाही तर त्यांच्या कथा-कादंबर्‍यांतील नायिकांनाही ते येणार नाही हे लक्षात घ्यायला हवं. आज मेघना पेठे, कविता महाजन किंवा प्रज्ञा पवारांसारखी लेखिका स्त्रीच्या रतीप्रेरणांविषयी लिहितात तेव्हा नकळत भुवया उंचावल्या जातात. बायकांना झालंय तरी काय असे प्रश्‍न मनात उभे राहतात. पण वर्षानुवर्षांची घुसमट मग ती मनाची असेल की शरीराची आज बायका व्यक्त करायला लागल्या असतील तर त्यात गैर काय असा प्रश्‍न कोणालाच पडत नाही. आज आधुनिकतेच्या गोष्टी आपण करत असलो तरी ही आधुनिकता वरवरची, पोशाखी आहे. आपल्या समाजाची मानसिकता मनूच्या काळात होती तीच आहे असं खेदानं म्हणावं लागतं. मला वाटतं ज्या काळात आम्ही शाळा-कॉलेजात जात होतो त्या दिवसांत म्हणजे चळवळींच्या काळात पुरोगामी विचारांचा प्रभाव लोकांवर होता. कमीत कमी लोक सारासार विचार करत होते. पण आज आपला समाज विचाराने पुन्हा दोनशे वर्षे मागे चालला आहे. आज जागतिकीकरणानं जग जवळ आलं आहे असं आपण म्हणतो आहोत; पण मनाने जवळ आलेलो नाही. धर्म, जाती, लिंगभेदावर आधारलेली समाजव्यवस्था आपल्या घटनेनं नाकारली असली तरी आपल्या मनानं ती नाकारलेली नाही. त्यामुळे सत्तर-ऐंशीच्या दशकात झालेल्या चळवळी मागे पडल्या आणि आपण होतो तिथंच फेकले गेलो. त्यामुळेच मग स्त्रियांवर बलात्कार झाला की त्यांच्या कपड्यांचा प्रश्‍न उभा केला जातो. पण पुरुषांच्या लैंगिकतेला प्रश्‍न विचारला जात नाही. समाजातल्या तथाकथित चांगल्या घरातल्या बायका सुरक्षित राहाव्या म्हणून वेश्याव्यवसायाचं समर्थन केलं जातं. मानसिक आणि शारीर पातळीवर तिचं शोषण करताना तिलाही शरीर आहे, त्या शरीराच्या काही गरजा आहेत याचा मात्र विचार केला जात नाही. भारतात हजारो बायका अशा आहेत की ज्यांना शरीरसुख म्हणजे काय आहे हे माहीत नाही. अशा वेळी मेघना पेठेंसारखी लेखिका ‘समुद्री चहूकडे पाणी’सारख्या कथेतून या विषयाला भिडते तेव्हा तिला बोल्ड लेबल लावून आपण मोकळे होतो. कितीतरी स्त्रिया लैंगिकतेविषयी बोलायला घाबरतात आणि जे काही बोललं जातं ते चोरटेपणानं. विशेषतः अश्‍लील विनोदांतून चोरटा विकृत आनंद मिळवला जातो. पण यावर उल्लेख केलेल्या लेखिका आज स्त्रीच्या जगण्याला थेट भिडायला लागल्या आहेत. त्यांच्या सर्व प्रकारच्या शोषणाविषयी त्या बोलतात, विचार करताहेत, स्वतःचे निर्णय घेताहेत आणि मुख्य म्हणजे त्यांच्या गरजांविषयी, प्रश्‍नांविषयी बोलताहेत.

कवितेच्या बाबतीत बोलायचं तर आज स्त्रिया जी कविता लिहीत आहेत ती कविता नक्कीच वेगळी आहे. काही कवयित्री आजही पारंपरिक पद्धतीची साचेबद्ध कविता लिहीत असल्या तरी अनेकजणी आज आत्मभानाची कविता लिहीत आहेत. आजच्या या कवितेविषयी मी थोडं विस्तारानं बोलणार आहे.

आजच्या कवितेकडे येण्यापूर्वी थोडं मागं गेलं तर मराठी कवयित्रींच्या कवितेचा पट आपल्यासमोर उलगडला जाईल. रविकिरण मंडळाच्या प्रभावाखाली रोमँटिक कविता लिहिणार्‍या कवयित्री चांगली भावकविता लिहीत होत्या. पण ही कविता अनेकदा पुरुषाच्या मनात असलेल्या स्त्रीचं चित्रण करत होती. पुरुषाच्या मनातली स्त्रीची प्रतिमा ही आत्मभान आलेल्या स्त्रीची नव्हती. त्याच्या मनात असणारी स्त्री ही त्याग, समर्पण करणारी, त्याला कुटुंबप्रमुखाचा मान देऊन त्याचा आदर करणारी, त्याच्यावर भरभरून प्रेम करणारी, शृंगारात त्याच्यासाठी रतीची भूमिका बजावणारी, त्याच्या वंशाला दिवा देऊन पत्नी, माता, गृहिणी यांची कर्तव्यं पार पाडणारी स्त्री होती. त्यामुळे त्या काळात लिहिणार्‍या काही लेखकांनी व कवींनी जरी त्यांच्या कथा, कादंबर्‍या व कवितेतून स्त्रियांचे प्रश्‍न मांडले तरी विभावरी शिरूरकर, कुसुमावती देशपांडे यांच्यासारखे अपवाद वगळता स्त्रिया स्वतःविषयी विशेष काही लिहिताना दिसत नव्हत्या. कवितेत तर त्यांचं आई म्हणून जे जगणं होतं ते विशेष कुठं येत नव्हतं. मी आणि तू, प्रेम, विरह, मातृत्व, घरसंसार याच भावविश्‍वात रमणारी त्यांची कविता पुरुष या केंद्राभोवतीच फिरताना दिसत होती. पद्मा गोळे, इंदिरा संत यांच्या कवितेत पुढे काही प्रमाणात स्त्रीच्या वाट्याला येणार्‍या चौकटीतील जगण्याविषयीची खंत आलेली दिसते. उदा.

सीतेपुढे एकच ओढली रेषा लक्ष्मणाने

तिने ती ओलांडली आणि झाले रामायण

आमच्यापुढे दाही दिशा लक्ष्मणरेषा

ओलांडाव्या लागतात

रावणांना सामोरे जावेच लागते

एवढेच कमी असते

कुशीत घेत नाही भुई दुभंगून (पद्मा गोळे)

किंवा

मी म्हणजे केरवारा… बिले पावत्या…

स्वयंपाकपाणी, बौद्धिकाची रतीब गाळणी

मी म्हणजे हेच काही,

चालत्या बोलत्या पाषाणाला सुख नाही, दुःख नाही

साठोत्तरी कवितेचा काळ हा खरं तर कवितेचा सुवर्णकाळ. मराठी कवितेत मर्ढेकरांनी आणलेलं नवं युग, अनियतकालिकाची चळवळ, पाश्‍चात्त्य देशांतून आलेले नवे विचार, स्वातंत्र्यपूर्व काळात पाहिलेल्या स्वप्नांचा शोकात्म शेवट, त्यामुळे झालेला भ्रमनिरास अशा अनेक विषयांना अगदी सहज भिडणार्‍या कवींच्या तुलनेत स्त्रियांची कविता मात्र एकाच वर्तुळात फिरत होती. त्यात त्यांचाही दोष नव्हता. कारण लिंगभेद हा जीवशास्त्रीय असला तरी त्याला समाजशास्त्रीय परिमाण लाभल्याने व्यवस्थेच्या बाहेर जाऊन आपल्या अनुभवविश्‍वाला मोकळेपणानं भिडणं स्त्रियांना शक्य होत नव्हतं. पण हळूहळू हे चित्र बदललं. केवळ लिंगभेदावर आधारित असलेलं हे दुय्यमत्व नाकारताना ते का नाकारावंसं वाटतं याविषयी त्या लिहू लागल्या. आसावरी काकडे त्यांच्या ‘स्त्री असण्याचा अर्थ’ या संग्रहात म्हणतात-

स्त्रीचा जन्म मिळाला म्हणून फक्त तिनंच का पेलावं स्त्रीत्व

कळायला हवं पुरुषी होत चाललेल्या समाजाला स्त्री असण्याचा अर्थ

स्त्रीचा देह असणं म्हणजे स्त्री असणं नाही

स्त्री असणं म्हणजे सर्जक आनंदाचा शोध घेत जगणं, जगवणं

स्त्री असणं म्हणजे जतन करणं अस्तित्वाचे अक्षांश रेखांश

रोखून धरणं महायुद्धाच्या शक्यता

सर्व मूल्यांचा आधार शाबूत ठेवणं

स्त्री असणं म्हणजे सहवेदना… प्रेम… तितिक्षा

पुरुषही पेलू शकतो असं स्त्रीपण जशी स्त्री निभावतेय सहज पुरुषपण.

गेल्या तीस-पस्तीस वर्षांतली कविता पाहिल्यावर लक्षात येतं की कवयित्री आता स्वतःच्या जगण्याकडे त्रयस्थपणे पाहू लागल्या आहेत. तसं पाहताना ज्या अनेक गोष्टी आजपर्यंत त्यांच्या लक्षात आल्या नव्हत्या त्या त्यांच्या लक्षात येऊ लागल्या आहेत. स्वतःच्या अस्तित्वाविषयीचे मूलभूत प्रश्‍न त्यांना पडू लागले. या पुरुषप्रधान समाजात स्त्रीची होणारी कोंडी, त्यातून तिला आलेलं तुटलेपण, एवढ्या दिवस तिच्या वाट्याला आलेली उपेक्षा, तिला दिलं गेलंलं वस्तुरूप त्यांना अस्वस्थ करू लागलं. पुरुषप्रधान मानसिकतेमुळे वाढत गेलेला मी आणि तू मधला विसंवाद, स्वतःच्या जगण्यातला अंतविर्रोध तिला जाणवायला लागला.

सत्तरच्या दशकात लिहिणार्‍या प्रभा गणोरकर आणि रजनी परुळेकरांच्या पावलांवर पाऊल टाकत गेल्या पंचवीस-तीस वर्षांत आपल्या कवितेचा ठसा उमटवणार्‍या अनेक कवयित्रींनी स्त्रीच्या वेदनेला वाट मोकळी करून दिली.

कोवळी पानं ओरबाडताना कुणी

अचानक मुळं ओढावीत आणि सुकत जावं रोपटं

तसं होत गेलं जगताना.

कवितेतलं जगणं तेवढं खरं उरलं

बाकीचं हातात काहीच राहिलं नाही (तरीही- अनुराधा पाटील)

सारं अभावाचं जग दानात पडल्यानंतर हाती काहीच न उरल्याची खंत जरी ही कवयित्री व्यक्त करत होती तरी पुन्हा आपल्या असण्याचा काळ येईल, पुन्हा भन्नाट वाहतील वारे असा आशावाद व्यक्त करते. कोण्या एका राजपुत्राची वाट पाहणार्‍या सार्‍या स्त्रियांच्या समोर फासेपारधी येतात तेव्हा स्त्रीचं प्राक्तन बदलण्यासाठी तिनं स्वतःची अशी नवी लिपी आता शोधून काढावी असा सल्ला प्रभा गणोरकर आपल्या कवितेत देतात. या घोड्यावरून येणार्‍या राजपुत्राच्या हातातले लगाम काढून घेण्याची भाषा मीही माझ्या कवितेत केली आहे.

माझ्यासारख्या अनेकजणी अशी भाषा करायला लागल्या आणि स्त्रियांच्या कवितेची भाषा बदलत गेली. ‘माझं गर्भाशय मी कितव्यातरी झाडावर टांगून दिलेलं’ असं म्हणत स्त्रीची मातृत्वाशी जुळलेली नाळ तोडणारी मल्लिका अमरशेखांची कविता काय किंवा ‘लग्नसंबंधानंतर स्त्रिया गाभण राहतात निसर्गचक्रानुसार’ असं म्हणून स्त्रीच्या आई म्हणून केलेल्या उदात्तीकरणाला छेद देताना या समाजानं तिला एक व्यक्ती म्हणून स्वीकारण्यापेक्षा केवळ मुलं प्रसवणारी मादी यापलीकडं कोणतंही स्थान दिलेलं नाही हे जळजळीत वास्तव आपल्यापुढं आणणारी रजनी परुळेकरांची कविता काय, या सार्‍याच कविता बाईच्या पारंपरिक प्रतिमेला नकार देतानाच या समाजानं एवढी वर्षं केलेल्या तिच्या शोषणाचा लेखाजोगा मांडायला लागल्या.

आज लिहिणार्‍या मल्लिका अमरशेख, आसावरी काकडे, अश्‍विनी धोंगडे, ज्योती लांजेवार, अरुणा ढेरे, अंजली कुलकर्णी, प्रज्ञा दया पवार, कविता महाजन, अनुपमा उजगरे, सुनंदा भोसेकर, सिसिलिया कार्व्हालो, अमिता कोकाटे, ज्ञानदा, मीनाक्षी पाटील, नीलम माणगावे, छाया कोरेगावकर, कविता मोरवणकर अशा अनेक कवयित्री आज शतकानुशतके होणार्‍या बाईच्या शोषणाची, तिच्या घुसमटीची कहाणी आपल्याला सांगताहेत. ‘या विराट पोकळीत अखंड राबणारी, काठोकाठ उदास होणारी, स्वतःचा चेहरा, शरीर शोधणारी’ प्रज्ञा पवारांची बाई असो की ‘जळमट धरत चाललेल्या कळाहीन संसाराचं करायचं काय?’ असा प्रश्‍न पडलेली अंजली कुलकर्णी यांची बाई असो; या सगळ्या कवयित्री आज स्वतःच्या समाजनिर्मित जगण्याकडे पाहून अस्वस्थ होताहेत आणि असं हे जगणं नाकारताहेत. ‘तू माझ्या देहाचा पिंजरा मोडलास हे एका परीनं बरं झालं, माझं मन त्या पिंजर्‍यातून मला मुक्त करता आलं’ असं सिसिलिया कार्व्हालो त्याला सुनावतात तर ‘मला खजुराहोचं प्रदर्शनी शिल्प व्हायचं नाहीय किंवा मला मळवटही भरून घ्यायचा नाही’ असं अनुपमा उजगरे या समाजपुरुषाला ठणकावून सांगताहेत.

या सार्‍याच कवयित्री स्वतःच्या जगण्याकडे पाहताना स्वतःची ओळख मिरवण्याचा प्रयत्न करताना दिसताहेत. स्वतःकडेही एक स्वतंत्र अस्तित्व असलेली स्त्री म्हणून पाहताहेत. एवढंच नाही तर समाजानं आखून दिलेल्या चौकटीतून बाहेर पडण्याचा मार्ग स्वतःच शोधताहेत. मल्लिका अमरशेख तिच्या ‘माणूसपणाचे भिंग बदलल्यावर’ या संग्रहातील ‘मी एक स्त्री’ या कवितेत म्हणते-

जगभरातल्या बायकांनी अशावेळी काय करावं?

आपापल्या कबरीत, आपापल्या चितेवर, आपापल्या पिरॅमिड्‌समध्ये त्यांनी पडून रहावं का गप्प?

की लिपस्टिक लावून सुळे लपवावेत?

की नखांना नेलपॉलिश लावून लपवावा त्यांचा तीक्ष्णपणा?

की स्वतःतल्या अस्सल आदीमपणाला धार लावावी वास्तवाच्या पात्यावर?

लखलखत्या तलवारीगत तळपावं?

स्त्रीच्या अशा या पवित्र्यानं चंद्रकांत पाटलांच्या खजुराहोच्या शिल्पातला पुरुष जसा गोंधळला होता तसाच तो आता या कवयित्रींच्या कवितेत काळजीत पडलेला दिसतोय.

तू काळजीत पडलायस प्रचंड

कळत नाहीये तुला आटोकाट जिवंत स्त्रीसुलभ ठेवण्यासाठी

नेमकं काय करावं माझं (प्रज्ञा पवार)

आता केवळ त्यालाच नाही तर या पुरुषप्रधान व्यवस्थेलाच प्रश्‍न पडलाय-

बायकांना अलीकडे काय झालंय

विसर पडलाय का त्यांना आपल्या बाईपणाचा?

हवा, पाणी आणि जमिनीइतकं गृहीत धरलेलं त्यांचं बाईपण त्या आता नाकारताहेत असं प्रज्ञा पवारांना वाटतंय. एवढंच नाही तर त्या आता ‘उगीचच कढ आवरीत, उसासे सोडत नाहीत की अडखळत नाहीत दाराशीच’ तर त्या ‘प्रदर्शित करतात त्यांच्या इच्छा-अपेक्षा, वासना-लालसा, त्या प्रेम करतात उत्कट… संपूर्ण. त्या आता असत नाहीत केवळ त्यांच्या मालकांच्या, कधीमधी असतात त्या स्वतःच्याही.’ प्रज्ञा पवारांना त्यांच्या चेहर्‍यावर आता ‘मनूला वाकुल्या दाखवणारं मुक्त निर्भर हसू’ दिसतं आहे. मीनाक्षी पाटलांना तर बाई असणं ही मिथच वाटायला लागली आहे. त्यामुळे आता एका राजाला दोन म्हणजे आवडती आणि नावडती राणी असल्याची गोष्ट बदलून ‘एक होती राणी, तिला दोन होते राजे’ अशी गोष्ट सांगण्याचा किंवा सगळ्याच गोष्टी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बदलण्याचा सल्ला तिची नव्या पिढीतील मुलगी देत आहे.

आजच्या या काही कवयित्री थेट वास्तवाला भिडताहेत. मोकळेपणानं स्वतःला व्यक्त करताहेत. पण त्याचबरोबर अनेकजणी आजही प्रेम, विरह, शृंगार यांसारख्या भावना व्यक्त करणारी कविता किंवा गझल लिहिताहेत. भावकविता आज पुरुषही लिहिताहेत. आणि ती लिहिण्यात काहीच गैर नाही. पण स्त्रीला दुय्यम स्थान देणार्‍या व्यवस्थेची मानसिकता जर त्यात डोकावत असेल तर कवयित्रींनी त्याचा विचार करायला हवा. काही कवयित्री एकीकडे स्त्रीशोषणाची कविता लिहिताहेत तर दुसरीकडे तिच्या शरीराचं वर्णन करणार्‍या शृंगारिक लावण्या लिहिताना दिसतात. अशावेळी त्या स्वतःच्या जगण्याकडे नेमक्या कोणत्या दृष्टिकोनातून पाहताहेत हे लक्षात येत नाही. एकीकडे आपल्याला उपभोग्य वस्तू समजलं जातं म्हणून या पुरुषी मानसिकतेवर हल्ला करायचा आणि दुसरीकडे त्याच मानसिकतेतून तिला रतीरूपात अडकवायचं. यामागे नेमकी भूमिका काय असते ते अनेकदा कळत नाही. केवळ आज स्त्रीजाणिवेच्या कविता लिहिण्याचा कल आहे म्हणून आपणही काहीतरी लिहायलाच हवं अशा भावनेतून जेव्हा कविता लिहिली जाते तेव्हा ती कृतक होते हे आपण सर्वांनीच लक्षात घ्यायला हवं.

समकालीन स्त्रियांच्या कवितेत येणारी प्रतिमासृष्टीही आज बदलते आहे. चंद्र, तारे, फुलं, पानं, वेली, वाटा, नदी, सागर, लाटा अशा पारंपरिक प्रतिमासृष्टीतून ही कविता केव्हाच बाहेर पडली आहे. आता त्यांच्या कवितेत स्वयंपाकघर आणि त्यातील वस्तू, अंगण, रांगोळी, शिवण-टिपण, घागरी, वेणा, कशिदा, बांगड्या अशा त्यांच्या अनुभवविश्‍वातील प्रतिमा येतात. पण ज्या संदर्भात त्या येतात ते संदर्भ आता बदलले आहेत. उदा.

कांडता कुटताना हातावर बसावा मुसळाचा घाव

तसा कधीकधी अकस्मात घाव बसतो स्त्रीत्वाचा तिच्यावरही (अरुणा ढेरे)

आज केवळ त्यांची प्रतिमासृष्टीच बदलली आहे असे नाही तर त्यांची भाषाही बदलली आहे. प्रेम, शृंगार, वासना यांविषयी बोलताना त्याची दुसरी बाजूही त्या दाखवून द्यायला लागल्या आहेत. या सार्‍या भावनांचा या पुरुषी व्यवस्थेने केलेल्या भ्रमनिरासावर त्यांनी नेमकं बोट ठेवलं आहे.

रक्ताच्या थेंबाथेंबात धुमसत राहणारा तुझा बलात्कारी बोल

एक हिंस्र, हिरवे गोंदण

तू अस्वलाच्या नखांनी केलेले कपाळावर (रजनी परुळेकर)

किंवा

काचेरी घर समजून तिनं निवडुंगाच्या ताटव्यात पाय ठेवला

आणि स्फटिकवत पाण्यासाठी आसुसून शेवाळ्यात तोंड घातलं (प्रभा गणोरकर)

किंवा

एक बुडणारा समुद्र,

एक व्ही.डी.चा पेशंट

एक कंटाळ्याचा चष्मा

एक काळभोर कुरूप

आणि सगळं मिळून एक फ्रॉड (मल्लिका अमरशेख)

रजनी परुळेकर आणि मल्लिका अमरशेख यांनी कवितेची नुसती भाषाच बदलली नाही तर तिचा पारंपरिक चेहराही बदलून टाकला.

स्त्रीत्व होऊन जातं एक भला थोरला पाळीव कुत्रा इमानी करुण डोळ्यांचा

स्वातंत्र्य हे अजून कुठल्यातरी साखळीचं नाव असतं

न् नात्यांचे अजब बिल्ले लटकावून

स्त्रीत्व हिंडतं या खोलीतनं त्या खोलीत. (देहऋतू- मल्लिका अमरशेख)

एक स्वप्न अलीकडे माझा सतत पाठलाग करते

समाजात पुरुषवेश्यांचेही मोहल्ले आहेत

आणि स्त्रिया प्रेमाच्या मृगजळावर थुंकून

ज्यांच्या भावना गोठून गेल्या आहेत अशा पुरुषवेश्यांच्या तोेंडावर पैसे फेकून

सर्वत्र प्रतिष्ठित म्हणून वावरताहेत…

-पन्नास, शंभर किंवा दोनशे वर्षांनी तरी हे घडावे, असे वाटत राहते (काही दीर्घ कविता- रजनी परुळेकर)

शतकानुशतके स्त्रीच्या झालेल्या शोषणाचा आज विचार करणार्‍या, त्यामागची कारणमीमांसा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार्‍या या कवयित्री आक्रमक झाल्यासारख्या वाटतात. पण ते स्वाभाविक आहे. एवढी वर्षे वेदनेचा प्रवास केल्यानंतर त्यांच्याकडून संयम अभिव्यक्तीची अपेक्षा करता येणार नाही.

संख्येनं कमी असल्या तरी आज कवयित्री आणि त्याच्या बरोबरीनं काही कवीदेखील त्यांच्या कवितेतून स्त्रीच्या भावविश्‍वाचा, तिच्या जगण्याचा वेगळ्या पद्धतीने विचार करताहेत हे महत्त्वाचे.

हे केवळ कविता, कथा, कादंबरीतून होतंय असं नाही, तर साहित्याच्या सगळ्या फॉर्मस्‌मधून होतंय. ललित लेखनातून होतंय, संशोधनात्मक काम केलं जातंय, समीक्षा केली जातेय, वैचारिक लेखन केलं जातंय, स्त्रीवादाची मांडणी केली जातेय, स्त्रियांसाठी नियतकालिकं चालवली जाताहेत. पुष्पा भावे, विद्या बाळ, गीता साने, छाया दातार, शारदा साठे, ज्योती म्हापसेकर, मंगला आठलेकर, शोभा नाईक, माधवी सरदेसाई, अरुणा ढेरे किती नावं घ्यायची हा प्रश्‍न आहे. आज आत्मभान आलेल्या स्त्रिया जुन्या परंपरांचे नव्याने अर्थ लावत आहेत. विवाहसंस्था असो की कुटुंबसंस्था असोत, त्याचे नवे संदर्भ त्या शोधताहेत. स्त्रीस्वातंत्र्य, स्त्रीवाद याविषयी बोलणार्‍या स्त्रिया म्हणजे घर तोडणार्‍या स्त्रिया असा गैरसमज या पुरुषसत्ताक व्यवस्थेनंच पसरवलेला आहे. तो काढून टाकून स्त्रीविषयी आदराचं स्थान त्यांच्या मनात निर्माण करण्याची गरज आहे. स्त्री-पुरुष समानता हा विनोदाचा विषय केला गेला आहे. त्याचं गांभीर्य त्यांना पटवून दिलं पाहिजे. आपल्याकडे धर्म-जात-विषमतेचा विचार जेवढ्या गंभीरपणे झाला तेवढा लिंगाधिष्ठित विषमतेचा झाला नाही. केवळ स्त्रिया त्यासाठी भांडत राहिल्या. त्यांच्यासोबत पुरुषही आले. नाही असं नाही. पण त्यांची संख्या खूप कमी होती. ही संख्या वाढविण्याचं काम आपल्यालाच करायचं आहे. त्यासाठी प्रथम आपण बदलणं गरजेचं आहे. स्वतःला प्रश्‍न विचारणं गरजेचं आहे. स्त्रियांना घरात कोंडायचे असेल तर त्यांना वस्त्रालंकारांनी मढवा, त्यातच गुंतून ठेवा असं मनूनं म्हटलं होतं आणि आपण आजही त्यातच गुंतलो आहोत. सुनेच्या, मुलीच्या अंगावर किती तोळे सोने टाकले आहे याचे हिशेब लावतो आहोत, हुंड्यासाठी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करतो आहोत, सोनं अंगावर घेऊन मिरवतो आहोत. मुलांची लग्नं करताना सुंदर गोर्‍या मुलींची अपेक्षा करतो आहोत. वधू पाहिजे या सदरातल्या जाहिराती पाहिल्या तरी लक्षात येईल आपण आजही बाईला एक सुंदर वस्तू यापलीकडे पाहत नाही. आधुनिक जगातही तिच्याकडे केवळ कमॉडिटी म्हणून पाहिले जाते, लग्नाच्या बाजारात तिच्या गुणांपेक्षा रूपावर भर दिला जातो. आपल्या जाहिरातींतही तिला फेअर अँड लव्हलीची गरज असते. कपडे धुणे, भांडी घासणे हेच तिचं काम दाखवलं जातं. जर ती थकली तर मूव्ह किंवा बाम लावून पुन्हा काम करायला तयार केले जाते.

हे सारं आपण पाहत असतो पण त्याचा विचार करत नाही. मैत्रिणींनो, एका चांगल्या हेतूनं तुम्ही हे संमेलन सुरू केलं आहे. वाचन करता आहातच, त्यावर विचारही करता आहात. पण एकत्र येऊन पारंपरिक सण-समारंभ साजरे करण्यापेक्षा चर्चा करा, एकमेकींना समजावून घ्या आणि तुमचे विचार आजच्या तरुण पिढीपर्यंत पोचवा. कारण ही तरुण पिढीच आज जास्त पारंपरिक होत चालली आहे. त्यांना विचार द्या.

शेवटी एवढंच म्हणेन,

बाई, जुना सूर्य निपचित पडलाय सरणावर

आता तूच हो नव्या जगातला एकमेव सूर्य

हा पृथ्वीचा ग्लोबल गोल फिरेल तुझ्याभोवती

असा दिवस रंगवायचा आहे मला माझ्या हातांनी

एका ऐतिहासिक पानावर

बाई, वाट पाहते आहे मी त्या दिवसाची

सभोवताली रंग पसरून

फक्त तू जागी हो या ठार झोपेतून

फक्त तू जागी हो..