जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळेल अशी जी आश्वासने भाजपने दिली होती, त्याची कार्यवाही प्राधान्याने हाती घेतली जाईल, असे ते म्हणाले. यात लाडली लक्ष्मी योजना, विधवा पेन्शन योजना व ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या योजनांचा समावेश असेल. टाटा कॅन्सर रुग्णालयाची थकबाकी दोन दिवसांत अदा केली जाईल. त्यामुळे गोव्यातील कॅन्सर रुग्णांना तिथे जाऊन मोफत उपचार घेणे पुन्हा शक्य होईल.
भ्रष्टाचार शून्यावर आणणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. मलेरिया कामगारांवरील अन्यायावर तोडगा काढणार असल्याचे ते म्हणाले. सत्तरीतील एक आमदार भाजप सरकार पाडण्याचा मनसुबे रचत आहे, असे कळते. त्याने सरकारच्या कामात विनाकारण अडथळा उत्पन्न केल्यास योग्य प्रत्यूत्तर दिले जाईल, असे पर्रीकर म्हणाले.
दरम्यान, डिचोली येथील कार्यक्रमाला ऍड. मनोहर शिरोडकर, डॉ. गुरुप्रसाद कापडी, कांता पाटणेकर, डॉ. शेखर साळकर, विश्वास गावकर, तुळशीदास गावकर, दिलीप तेंडुलकर, शुभलता कळंगुटकर, सुभाष पळ, चंदन परब, यांचीही भाषणे झाली. यावेळी साळगावचे आमदार दिलीप परुळेकर उपस्थित होते. विठ्ठल वेर्णेकर व नारायण बेतकेकर यांनी सूत्रसंचालन केले.
नोकर भरती स्थगितीचे आदेश
निवडणुकीच्या काळात झालेली नोकर भरती स्थगित ठेवण्याचे आदेश काल मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सर्वसामान्य प्रशासकीय खात्याला दिले आहेत. निवडणूक काळात मोठ्या प्रमाणावर विविध खात्यांत नोकर भरती झाली होती, घिसाडघाईने केलेल्या या प्रक्रियेत नियमांची पायमल्ली झाल्याचा तसेच बर्याच नेमणुका आचारसंहितेच्या काळात नियमबाह्यपणे झाल्याचा आरोप होता.