प्राथमिक शाळा बंदचा इरादा नाही : मुख्यमंत्री

0
15

>> विद्याभारती गोवा शिष्टमंडळाने घेतली भेट

सरकारी प्राथमिक शाळा बंद करण्याचा सरकारचा अजिबात इरादा नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल स्पष्ट केले.
अध्यक्ष डॉ. सीताराम कोरगावकर यांच्या नेतृत्वाखाली विद्याभारती गोवा या शैक्षणिक संघटनेच्या शिष्टमंडळाने काल आल्तिनो येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यावेळी शिष्टमंडळाने शाळांच्या विलिनीकरणाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्‍नावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिले.

या शिष्टमंडळात प्राचार्य सुभाष वेलिंगकर, प्राचार्य गजानन मांद्रेकर व माधव केळकर यांचा समावेश होता. नवीन शैक्षणिक धोरणाच्या कार्यवाहीत विद्याभारती गोवाने केलेल्या सूचना अवश्य विचारात घेऊ, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले.

गोवा सरकारने नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी पूर्वप्राथमिक स्तरापासून करण्याचे निश्चित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षणतज्ज्ञ सदस्यांच्या विशेष चिंतन बैठकीतून सदर धोरणाच्या अंमलबजावणीसाठीच्या पूर्ण नियोजनाचे तयार केलेले मार्गदर्शक प्रारूप शिक्षण मंत्रीपद सांभाळणार्‍या मुख्यमंत्र्यांना काल शिष्टमंडळाने सादर केले.

राज्यातील परिस्थिती लक्षात घेऊन नवीन शैक्षणिक धोरणाच्या यशस्वी कार्यवाहीसाठी नेमके काय करावे लागेल, सर्व शैक्षणिक प्रशासकीय यंत्रणांची कशा प्रकारे अनुकुल पुनर्रचना व सक्षमीकरण करावे लागेल, पूर्वप्राथमिक शाळांचे सुसूत्रीकरण, समान अभ्यासक्रमाची सूत्रे काय असावी, अडचणी आणि उपाययोजना अशा अनेक वस्तुनिष्ठ मार्गदर्शक तत्वांचा समावेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आलेल्या मार्गदर्शिका दस्तऐवजात करण्यात आलेला आहे.