प्राणवायूसंदर्भातील उपाययोजनांचा अहवाल उच्च न्यायालयात सादर

0
136

राज्य सरकारचे आरोग्य सचिव रवी धवन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला गोमेकॉमधील प्राणवायू पुरवठा व इतर समस्या सोडविण्यासाठी हाती घेतलेल्या उपाययोजनांचा सद्यःस्थितीचा अहवाल काल सादर केला. गुरुवार दि. १३ मे रोजी सकाळी ८ ते शुक्रवार दि. १४ मे २०२१ रोजी सकाळी ८ या चोवीस तासांच्या काळात गोमेकॉला ६४ ट्रॉली सिलिंडरचा पुरवठा केला. तसेच, ६०० जम्बो प्राणवायू सिलिंडर आणि ४७ लहान सिलिंडरचा पुरवठा करण्यात आला. या दिवशी रात्री १० ते पहाटे ५.४५ यावेळेत प्राणवायूच्या पुरवठ्यावर पूर्ण देखरेख ठेवण्यात आली होती. प्राणवायू पुरवठ्याची गती कमी झाल्याची एकही तक्रार आली नाही, असे अहवालात म्हटले आहे.

उच्च न्यायालयाने प्राणवायूअभावी एकाही रुग्णाचे निधन होता कामा नये, असा निर्देश राज्य सरकार आणि गोमेकॉला दिलेला आहे. प्राणवायू पुरवठ्यात सुधारणा घडवून आणण्याची सूचना केली आहे.

सरकारकडून उपाययोजना सुरू
न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्य सरकारकडून विविध उपाययोजना हाती घेण्यास प्रारंभ केला आहे. प्राणवायू सिलिंडरची वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालविण्यासाठी ८ प्रशिक्षक ट्रॅक्टर चालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, आणखी २ उच्च क्षमतेचे ट्रॅक्टर भाडेपट्टीवर घेण्यात आले आहेत.

गोमेकॉमध्ये एलएमओ प्राणवायू टाकी बसविण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. ही टाकी बसविण्यासाठी खासगी कंपनीचे सहकार्य घेतले जात आहे. येत्या १७ मेपर्यंत ही प्राणवायू टाकी कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे., अशी माहिती देण्यात आली.

गोमेकॉमध्ये २६३ कॉन्संट्रेटर
केंद्र सरकारकडून मिळालेल्या ३२३ कॉन्संट्रेटर पैकी २६३ कॉन्संट्रेटर गोमेकॉमध्ये, तसेच फोंडा इस्पितळ ३०, म्हापसा इस्पितळ २० आणि डिचोली येथील केशव सेवा साधना कोविड इस्पितळांना १० कॉन्संट्रेटर देण्यात आले आहेत. राज्यातील प्राणवायूच्या पुरवठ्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. २६ मॅट्रिक टन मंजूर होता. आता त्यात २० मॅट्रिक टनांनी वाढ करून ४६ मॅट्रिक टन करण्यात आला आहे. तसेच दोन ड्युरा सिलिंडरची व्यवस्था करण्यात आली आहे. कोविड रुग्णांना घरी वापराच्या प्राणवायू सिलिंडर, एनजीओकडून कोविड रुग्णांसाठी वापरले जाणारे प्राणवायू सिलिंडर भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अशी माहिती अहवालात देण्यात आली आहे.