– डॉ. सोमनाथ कोमरपंत
आदरणीय कविश्रेष्ठ कुसुमाग्रज ऊर्फ तात्यासाहेब शिरवाडकर,
सविनय नमस्कार.
तुम्हाला संवाद करायला आवडायचा म्हणून हे पत्र. तुमच्या जन्मशताब्दीची सांगता उद्या होत आहे. विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकानंतर २७ फेब्रुवारी १९१२ मध्ये पुण्यनगरीत तुमचा जन्म. भारतीय कविकुलातील श्रेष्ठ कवी म्हणून तुमचा कीर्तिसुगंध दरवळत आहे. सर्जनशीलतेला सुजनत्वाचा स्पर्श झाला की ती द्विगुणित होते. तिला गोडवा प्राप्त होतो. हा आल्हाददायी प्रत्यय आम्हाला दीर्घकाळ घेता आला. कविता हा तुमचा मर्मबंध. कवितेशिवाय नाटक, कादंबरी, कथा, ललितनिबंध, आस्वादक समीक्षा आणि अनुवाद याही क्षेत्रांत तुम्ही अनिरुद्ध संचार केला. तिथेही ‘कुसुमाग्रजत्वा’ची मुद्रा उमटविली. या वाङ्मयनिर्मितीमागे तुमचे एकात्म मन आहे. एका संपन्न क्षितिजाचे हे प्रतिबिंबरूप आहे. तुमच्याइतकेच ते विलोभनीय आहे. परिणत प्रज्ञा, उन्मेषशालिनी प्रतिभा, प्रगाढ चिंतनशीलता, उत्तुंग कल्पनाशक्ती आणि समर्थ शब्दकळा यांच्या गुणसंगमातून अवतरलेले हे अक्षरशिल्प आहे.
‘जीवनलहरी’च्या रूपाने एकविसाव्या वर्षी तुम्ही काव्यक्षेत्रात पदार्पण केले. तारुण्याच्या नव्हाळीतील ते भावविभोर क्षण. सर्जनशक्तीने साथ दिल्यामुळे ते सुफलित झाले. ‘जीवनलहरी’ या काव्यप्रकाराची देणगी तुम्ही मराठी काव्यविश्वाला दिली. नव्हाळीतील उमाळा मराठी रसिकतेला मानवला. वाङ्मयनिर्मिती हेच आपले जीवितकार्य हा निर्णय याचवेळी झाला. पुढे ध्यास आणि श्वास कवितेचाच झाला.
‘रत्नाकर’, ‘प्रतिभा’, ‘ज्योत्स्ना’, ‘वागीश्वरी’ या नियतकालिकांनी अग्रक्रमाने तुमच्या कविता प्रसिद्ध केल्या. पुढे ‘मौज’, ‘सत्यकथा’ यांसारख्या नवी संवेदनशीलता जोपासू पाहणार्या नियतकालिकांनी तुमच्या कवितांना महत्त्वाचे स्थान दिले.
आयुष्यात भ्रमंती तशी खूप झाली. अनेक संघर्षांतून जावे लागले. ‘सारथी’, ‘प्रभात’, ‘धनुर्धारी’, ‘नवयुग’ आणि ‘स्वदेश’ या नियतकालिकांत पत्रकारितेचा अनुभव घेतला. लेखनक्षेत्रात मुक्त मुशाफिरी केली. सामान्यांतील सामान्य विषय स्वीकारून ललित निबंध लिहिले. त्यांना समृद्ध आशय प्राप्त करून दिला.
माधव जूलियन, बालकवी, केशवसुत, गोविंदाग्रज, भा. रा. तांबे, वि. दा. सावरकर, गोविंद ही तुमची कवितेतील श्रद्धास्थाने. विशेषतः इंग्रजीतील बायरन आणि मराठीतील माधव जूलियन ही तुमची आराध्य दैवते. वाचन-मनन-चिंतन आणि निदिध्यास यांतून तुम्हाला स्वत्वाचा शोध लागला. कालनिष्ठ जाणिवांना चिरस्थायी स्वरूप प्राप्त करून देणारी अंतःप्रेरणा मिळाली. कुसुमकोमल वाणी तुमचीच; ओजस्वी वाणीचे स्वामीही तुम्हीच!
स्पंदनशील समाजात वादळी वारे घोंगावत असताना ‘विशाखा’ हा कवितासंग्रह जन्माला आला. भाऊसाहेब खांडेकरांची पितृवात्सल्याची सावली लाभली. हे विशाखा नक्षत्र सुलक्षणी ठरले. कृतिशील आत्म्यांना त्यांच्या खडतर दिवसांत ‘विशाखा’तील मंत्राक्षरांनी नवे चैतन्य निर्माण केले ः
पदोपदी पसरुनि निखारे आपुल्याच हाती
होउनिया बेहोष धावलो ध्येयपथावरती
एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार
होता पायतळी अंगार
किंवा
कशास आई, भिजविसि डोळे, उजळ तुझे भाल
रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल
सरणावरती आज आमुची पेटताच प्रेते
उठतिल त्या ज्वालांतुन भावी क्रांतीचे नेते
नानासाहेब गोरे, बॅ. नाथ पै यांना आणि असंख्यांना या शब्दांमुळे कारावासाच्या भिंतीत त्राण लाभले. पु. ल. देशपांडे यांच्यासारख्या सव्यसाची साहित्यिकाला ‘विशाखा’ नक्षत्रावर आपल्या तरुणाईचा शोध लागला. मंगेश पाडगावकर, वसंत बापट, कृ. ब. निकुंब इत्यादी कवींना नवी प्रेरणा, नवे स्फुरण मिळाले. तत्कालीन नव्या पिढीने ‘विशाखा’तील समृद्ध आशयामुळे मंत्रभारलेपण अनुभवले. सिद्धहस्त ललितनिबंधकार रवींद्र पिंगे यांच्या मनोगतातून हा प्रातिनिधिक स्वर अनुभवता येतो ः ‘‘कुसुमाग्रजांची कविता हा आम्हा शाळकरी मुलांच्या जगातील लामणदिवा होता.’’
‘विशाखा’ हा कवितासंग्रह प्रसिद्ध होऊन ७० वर्षे लोटली तरी त्यातील अम्लान ओळी अनेकांच्या ओठांवर आहेत. ‘विशाखा’नेच तुमचे कवियश निश्चित केले. तेथून तुमच्या प्रतिभेचा पारिजातक फुले ढाळीत राहिला. मराठीच्या मानसभूमीवर विचारांची, भावनांची, कल्पनांची आणि संवेदनांची शिल्पे तुम्ही सतत निर्माण केली.
नाशिकची भूमी हे तुमचे साहित्यनिर्मितीचे क्षेत्र. या भूमीला तुम्ही आपले मानले. या भूमीने आणि माणसांनी तुम्हाला ममत्वाने स्वीकारले. जीवनदायिनी गोदावरीने तुम्हाला कमलावराप्रमाणे अनंत हस्तांनी अनंत दिले आहे. या कृतज्ञतेपोटी तुम्ही तुमचा ‘छंदोमयी’ हा कवितासंग्रह ‘नाशिकच्या परिसरातील गोदावरीस-’ अर्पण केलेला आहे. ‘गोदाकाठचा संधिकाल’मध्ये जी संस्मरणीय तसबीर आहे ती याच परिसरातील क्षणचित्रांची अन् जाणिवांची. याच परिसरातील प्रशांत घाटावर राम गणेश गडकर्यांना ‘राजसंन्यास’ या नाटकाचा पहिला प्रवेश सुचला होता असे म्हणतात. ही आठवण तुम्ही मर्मबंधातील ठेव म्हणून जपून ठेवलेली आहे. तिळभांडेश्वराच्या अरुंद बोळात मेणबत्त्यांप्रमाणे माणसे शिलगावीत जाण्याचे लोकविलक्षण सामर्थ्य असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना तुम्ही स्वर्गलोकातील अग्नी माणसांसाठी पृथ्वीवर आणणारा प्रॉमीथिअस असे संबोधले आहे. कवी गोविंदांची आठवण तुम्ही कृतज्ञतेने जोपासली आहे. नाशिकची ही भूमी राष्ट्रीय पुरुषार्थाला अशी प्रेरणा देणारी. ‘गौतमी गंगे’ने दिलेले दान तितक्याच निरिच्छ भावनेने तिला देऊन टाकले. जीर्णमतवादी विचारांना थारा न देता निरंतर आधुनिक संदर्भ अधोरेखित करीत राहिलात. म्हणूनच तर नाशिकला, पर्यायाने अवघ्या महाराष्ट्राला साहित्यसंस्कृतीच्या जाणिवेची प्रकाशकिनार देणारा प्रज्ञावंत आणि प्रतिभावंत अशी तुमची तेजस्वी प्रतिमा आहे. ‘साकल्याचा प्रदेश’ तुम्ही तुमच्या अनुभूतिक्षेत्राच्या कवेत घेतलेला आहे. शेक्सपियरचा शोध घेताना अक्षरवाङ्मयाचा गुणविशेष हा एकमेव निकष तुमच्या मनोधारणेत आहे. हे सारे घडले ते स्वयंप्रेरणेने. मनस्वी वृत्तीने. एरव्ही तुम्ही ग्रंथनिमग्न. पण माणूस समोर आला की ग्रंथापासून हात सुटायचा. माणसाचा हात हातात यायचा. मग तो राव असो वा रंक असो. तुमचे बंधू वसंतराव शिरवाडकर यांनी म्हटलेले आहे ः
‘‘तात्या लिहीत बसले आहेत हे आम्ही कधी पाहिले नाही. ते लिहितात केव्हा हे कुणाला कधी कळले नाही. पण लिहितात हे तर नक्कीच.’’
अशी एकांतसमयी तुम्ही साहित्यसाधना केली; पण सामाजिक अभ्युदयाविषयी तुमचे सतत चिंतन असायचे. या समाजमनस्क वृत्तीतूनच तुम्ही ‘हिमलाट’, ‘अहि-नकुल’, ‘आगगाडी व जमीन’, ‘सहानुभूती’, ‘गुलाम’, ‘लिलाव’, ‘बळी’ व ‘आव्हान’ इत्यादी कविता लिहिल्या. ‘विशाखा’मधील हा अंतःसूर पुढेही कायम राहिला. आर्थिक विषमतेविषयीची चीड, पददलितांविषयीची सहानुभूती आणि त्यातून निर्माण झालेला करुणेचा स्वर ही तुमच्या प्रतिमाधर्माची गुणवैशिष्ट्ये.
ज्या स्वातंत्र्याची आकांक्षा तुम्ही उत्कट शब्दांत व्यक्त केली, ते स्वातंत्र्य पूर्वक्षितिजावर अवतरले. विराट भारतीय मन आनंदोर्मींनी ओसंडून गेले. तो आनंदही तुम्ही त्या भावनांशी एकरूप होऊन प्रकट केला. स्वराज्य आले खरे; परंतु सर्वसामान्य माणसाच्या आशा-आकांक्षा फलद्रूप झाल्या नाहीत. या सामाजिक व आर्थिक विसंवादाचे शल्य तुमच्या संवेदनशील मनाला बोचत होते. तुमची प्रतिभा या भ्रमनिरासामुळे अंतमुर्ख झाली. प्रेयसापेक्षा श्रेयसाला प्राधान्य देणारी, सौंदर्योपासकाचा पिंडधर्म असलेली तुमची काव्यभाषा बदलली. तिने उपहासव्यंजकतेचे रूप धारण केले. पण तिच्यातील समाजसन्मुखतेचे अंतःसूत्र कायम होते. ‘स्वगत’, ‘हिमरेषा’, ‘मराठी माती’, ‘छंदोमयी’, ‘मुक्तायन’, ‘पाथेय’ आणि ‘महावृक्ष’मधील तुमच्या कवितांचा प्रवास न्याहाळून पाहावासा वाटतो. आजच्या दाहक वास्तवावर तुम्ही जळजळीत भाष्य केलेले आहे. स्वराज्यात ठिकठिकाणी उभारले गेलेले पुतळे हाही तुमच्या चिंतनाचा विषय. समाजजीवनातील वाढती विरुपता तुमच्या अंतःकरणाला विद्ध करते. ‘प्रार्थना’, ‘अखेर कमाई’, ‘ज्योतीराव’, ‘तात्पर्य’, ‘मर्यादा’, ‘म्हातारा म्हणतोय’, ‘पर्वणी’, ‘अनावरण’, ‘घृणास्पद’, ‘कलोजस’, ‘पहाडातील देवी’, ‘गाभारा’, ‘बर्यापैकी’, ‘विशेषणे’, ‘तेथे’, ‘आम्ही सारे’ आणि ‘किंग केनेडी’ या कवितांमधून किती मर्मदृष्टीने दिवसेंदिवस प्रदूषित होत गेलेल्या आमच्या सामाजिक, सांस्कृतिक जीवनांगांकडे तुम्ही पाहता याचे दर्शन घडते. आमच्या बोथटलेल्या संवेदनांना जाग आणते. तुमचा हा प्रगल्भ समाजभानाचा पैलू आम्हाला विचारसन्मुख करायला लावणारा आहे. जाणिवा समृद्ध करणारा आहे.
मूल्यविवेकाचा ध्यास तुमच्या प्रतिभेने कायम ठेवलेला आहे… तुम्ही आपली जीवनश्रद्धा अभंग ठेवलेली आहे… रसमयतेचे उत्कट रंग टवटवीत ठेवलेले आहेत. जीवनांगांना समृद्ध करणार्या प्रज्ञावंतांविषयी आणि प्रतिभावंतांविषयी तुमच्या मनात नितांत आदराची आणि आत्मीयतेची भावना आहे. इथेही राष्ट्राच्या चतुःसीमा ओलांडून जाणारी विशाल भावना प्रकट होते. त्या व्यक्तींनी जोपासलेली जीवनमूल्ये तुम्हाला प्रातःस्मरणीय वाटतात. व्यक्तिमाहात्म्यापेक्षा त्यांच्या अंगी असलेल्या गुणांचा तो गौरव असतो. या गुणांमुळे मानवतेचे मूल्य समृद्ध होत असते.
तात्यासाहेब, एका जीवनयात्रिकाने दुसर्या जीवनयात्रिकाशी केलेले हितगुज आम्हाला ‘संत’ या कवितेत आढळते. जीवनमूल्यांच्या होरपळीत ज्या महामानवाचे कार्य ही ‘मिथ्’ वाटावी त्या जीवनयोगी बाबा आमटे यांना उद्देशून तुम्ही म्हणता ः
…माझ्या घराच्या एकलकोंड्या कौलारावर
बसले आहेत निळ्या पाखरांचे थवे
तुझ्या वाटेवरची धूळ
आपल्या पंखांवर वाहण्यासाठी
आकाशाचं मन कळत नाही
वारा होऊन मुक्त झाल्याशिवाय
म्हणून थोडं वारेपण-
थोडं दिवेपण-
उचललं आहे माझ्या जिराईत अक्षरांनी
तुझ्याच मेघशील जीवनातून
तुझ्याच स्वागताच्या कमानीवर
तोरण लावण्यासाठी
कविता आणि जीवन एकमेकांच्या समीप आल्याचा आनंदानुभव आम्ही येथे घेत आहोत.
प्रेम आहे माणसाच्या
संस्कृतीचा सारांश
त्याच्या इतिहासाचा
आणि भविष्यकालातील
त्याच्या अभ्युदयाची आशा
एकमेव!
हे फक्त तुम्हीच आम्हाला सांगू शकता. तुम्हीच तर मनस्विनी पृथ्वीचे चिरस्थायी प्रेमगीत लिहिले होते.
तुमच्या ‘कौंतेय’मधील सूर्यपुत्र कर्णाचा आत्मशोध ही घनतमातील तेजोशलाका वाटते, ‘नटसम्राट’मधील गणपतराव बेलवलकर यांचे एकाकीपण अंतःकरणाला गलबलून टाकणारी शोकात्म अनुभूती देते आणि ‘ययाती आणि देवयानी’मधील पुढील गीत हे तुमच्या जीवनचिंतनाचे नवनीतच वाटते ः
सर्वात्मका शिवसुंदरा
स्वीकार या अभिवादना|
तिमिरातुनी तेजाकडे
प्रभु आमुच्या ने जीवना॥
सुमनांत तू, गगनात तू
तार्यांमध्ये फुलतोस तू|
सद्धर्म जे जगतामध्ये
सर्वांत त्या वसतोस तू॥
चोहींकडे रूपे तुझी
जाणीव ही माझ्या मना॥
तात्यासाहेब, तुम्हाला विनम्र अभिवादन!