Home बातम्या प्रणव मुखर्जी संपुआचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार

प्रणव मुखर्जी संपुआचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार

0

यूपीएच्या कालच्या बैठकीला कॉंग्रेस तसेच अन्य घटक पक्ष द्रमुक, राष्ट्रीय लोकदल, राष्ट्रवादी कॉंग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि इंडियन मुस्लिम लीगचे नेते उपस्थित होते.

दरम्यान, मुखर्जी यांना परवापर्यंत विरोध करून तृणमूल कॉंग्रेसबरोबर ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या नावाची शिफारस करणार्‍या समाजवादी पक्षाने आपली भूमिका बदलत मुखर्जींना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे आता ममता बॅनर्जी एकट्या पडल्या आहेत. समाजवादी पार्टीने जाहीर केलेल्या पाठिंब्यानंतर बहुजन समाज पार्टीचा पाठिंबाही मुखर्जींना दिला जाणार असल्याचे पक्षाच्या नेत्या मायावती यांनी जाहीर केले. या दोन्ही पक्षांच्या पाठिंब्यानंतर मुखर्जी राष्ट्रपती बनण्यासाठी आवश्यक असलेल्या निर्वाचन मंडळाच्या ५.४९ लाख मतांचे मूल्य गाठण्याच्या बरेच जवळ पोचले आहेत. आता तृणमूल कॉंग्रेसच्या मतांचे ४८ हजार मूल्य वगळून विजयासाठी मुखर्जींना २६ हजार मतांचे मूल्य मिळवावे लागेल. हा पाठिंबा डावी आघाडी आणि अन्य पक्षांकडून मिळण्याची कॉंगेसला अपेक्षा आहे.

प्रणव मुखर्जी यांनी पाच दशकांहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात घालवला असून त्यांची कारकिर्द लक्षणीय आहे. मुखर्जी यांच्या उमेदवारीस व्यापक पाठिंबा आहे, असेही श्रीमती गांधी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी झालेल्या यूपीएच्या बैठकीनंतर बोलताना सांगितले. आज झालेल्या यूपीए घटक पक्षांच्या बैठकीत मुखर्जी यांच्या उमेदवारीबाबत निश्‍चित करण्यात आल्याचे त्या म्हणाल्या.

दरम्यान, मुखर्जी यांचे नाव ठरविण्यात आल्यानंतर पंतप्रधानांनी लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज आणि राज्यसभेतील भाजप नेते अरुण जेटली यांच्याशी

दूरध्वनीवरून संपर्क साधून यूपीएच्या निर्णयाची माहिती दिली व भाजप आणि रालोआने मुखर्जींच्या उमेदवारीस पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानेही मुखर्जी यांच्या उमेदवारीचे स्वागत केले आहे. मात्र त्यांना पाठिंबा द्यायचा की नाही, याबाबत अन्य डाव्या पक्षांशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचे पक्षाने म्हटले आहे.

दरम्यान, तृणमूल कॉंग्रेस अध्यक्ष ममता बॅनर्जी या अजूनही अब्दुल कलाम यांच्या नावावर ठाम असल्याचे कळते. कालच्या यूपीएच्या बैठकीलाही त्या उपस्थित राहिल्या नाहीत. मात्र एकूण राजकीय स्थिती पाहता कलाम निवडणूक लढविण्यास तयार होतील असे वाटत नसल्याचे अनेक चिकित्सकांचे म्हणणे आहे. तसे झाल्यास मुखर्जी यांचा मार्ग आणखी सोपा होईल. भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या कालच्या बैठकीतही कलाम यांच्या उमेदवारीबाबत जनता दल संयुक्तने काही आढेवेढे घेतल्याचे वृत्त आहे. दरम्यान, उमेदवारीबाबत रालोआची काल सहमती होऊ शकली नाही. दुसरीकडे पी. ए. संगमा हे राष्ट्रपती निवडणूक लढविण्याच्या विचारापासून अजून दूर गेलेले नाहीत. सुरूवातीस त्यांना अण्णा द्रमुक आणि बिजू जनता दलाने पाठिंबा जाहीर केला होता. मात्र त्यांचा स्वत:चा पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांच्या उमेदवारीस पाठिंबा दिलेला नसून उमेदवारी मागे घेण्यास सूचविले होते.

तोडगा काढणारा माणूस

कॉंग्रेससाठी तोडगा काढणारा माणूस अशी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांची प्रतिमा आहे. पक्षाला आणि पक्षाच्या सरकारला अनेक समस्यांतून तारण्याचे कसब त्यांनी बरेचदा साधले आहे. भारतीय राजकारण, अर्थकारण, धोणात्मक मुद्दे याबाबत मुखर्जी यांचा वकुब आहे. महत्त्वाच्या संसदीय प्रश्‍नावर यूपीएतील घटक पक्षांत आणि विरोधी पक्षांमध्ये मध्यस्थ म्हणून त्यांनी यशस्वी कामगिरी पार पाडली आहे.

१९८४मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर कॉंग्रेसमध्ये निर्माण झालेल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता. राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी मुखर्जींना कॅबिनेटमध्ये सामील न करून घेतल्याने नाराज बनून प्रणवदांनी राष्ट्रीय समाजवादी कॉंग्रेस हा वेगळा पक्षही स्थापला होता. नंतर पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी त्यांनी पुन्हा पक्षात आणले व नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष केले होते.

अजूनपर्यंत सरासरी सुमारे १८ तास ते काम करतात. नॉर्थ ब्लॉकमधील त्यांच्या कार्यालयात प्रशासकीय व खात्याची कामे संपल्यानंतर रात्री १० च्या सुमारास त्यांच्या राजकीय बैठका सुरू होऊन मध्यरात्रीनंतरपर्यंत चालू असतात.

रवींद्र संगीतात त्यांना विशेष रुची असून माशाची आमटी व भात त्यांचे आवडते पदार्थ आहेत.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक, आशियाई विकास बँकेच्या गव्हर्नर बोर्डवरही मुखर्जी यांनी काम केलेले आहे.

जन्म : ११ डिसेंबर १९३५

जन्मस्थळ : मिराती, जिल्हा बिरभूम, पश्‍चिम बंगाल

पत्नी : सुर्वा मुखर्जी

अपत्ये : दोन मुलगे, एक मुलगी

शिक्षण : एम. ए. (इतिहास), एम. ए. (राज्यशास्त्र), एल. एलबी, डी. लिट्

व्यवसाय : शिक्षक, पत्रकार, लेखक

भूषविलेली पदे : १९७३ साली पहिल्यांदा केंद्रात उद्योग विकास खात्याचे उपमंत्री. संसदेतील विविध कार्यकाळांत केंद्रीय मंत्रिमंडळात उपमंत्री, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री म्हणून विदेश व्यवहार, संरक्षण, अर्थ, जहाजोद्योग, महसूल आणि बँकींग, वाणिज्य, पोलाद आणि खाणी अशी महत्त्वाची खाती सांभाळली आहेत.

जून १९९१ ते मे १९९६ या काळात ते केंद्रीय नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते.

२००४ पासून लोकसभेचे नेते.

२००९ सालापासून ते केंद्रीय मंत्रिमंडळात अर्थमंत्री आहेत.

संसदेतील कार्यकाळ : राज्यसभेत १९६९, १९७५, १९८१, १९९३, १९९९ मध्ये निवड. २००४मध्ये १४ व्या, २००९मध्ये १५व्या लोकसभेवर निवडून आले.

ममता बहिणीसारखी, समर्थनासाठी आवाहन

उमेदवारी देऊन गौरव केल्याबद्दल यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी व अन्य पक्षांचे प्रणव मुखर्जी यांनी आभार व्यक्त केले. ही उमेदवारी आपण नम्रतापूर्वक स्वीकारीत असल्याचे ते म्हणाले.

ममता बॅनर्जी आपणास बहिणीसारखी असून तिचा पाठिंबाही आवश्यक असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. श्रीमती बॅनर्जी या एक बहुमोल सहकारी असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, मुखर्जी हे दि. २४ रोजी अर्थमंत्रीपदाचा राजीनामा देऊन दि. २५ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.