पेट्रोल-डिझेल पंपावरील कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी मसुदा अधिसूचना जारी

0
20

>> सूचना आणि हरकतींसाठी दोन महिन्यांचा कालावधी

राज्य सरकारच्या कामगार खात्याने राज्यातील पेट्रोल-डिझेल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनासाठी मसुदा अधिसूचना काल जारी केली. या प्रस्तावानुसार हेल्पर, क्लीनर यांना दरदिवशी किमान 553 रुपये आणि व्यवस्थापकांना दरदिवशी 806 रुपये अशा प्रकारे किमान वेतन निश्चित करण्यात आले आहे. या प्रस्तावित किमान वेतनाबाबत सूचना आणि हरकतींसाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.

राज्य सरकारने पेट्रोल-डिझेल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची एकूण 4 वर्गात विभागणी केली असून, प्रत्येक वर्गासाठी वेगवेगळे किमान वेतन निश्चित केले आहे. कामगार खात्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याच्या केलेल्या वर्गवारीमध्ये वर्ग 1 मध्ये – व्यवस्थापक – 806 रुपये, वर्ग 2 – अकाऊंटंट, कॅशिअर, क्लार्क आणि सुपरवायझर – 734 रुपये, वर्ग 3 – फोर कोर्ट सेल्समन, पंप अटेंडंट, एअर बॉय, एअर मॅन – 625 रुपये आणि वर्ग 4 मध्ये – हेल्पर, क्लीनर, स्वीपर आणि प्यून या कामगारांना किमान वेतन 553 रुपये निश्चित केले आहे. राज्य सरकारकडून किमान वेतनाबाबत अंतिम अधिसूचना जारी केल्यानंतर नवीन किमान वेतन लागू होणार आहे.
पर्वरी येथील सचिवालयातील कामगार सचिव कार्यालयात सूचना, हरकती सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे. किमान वेतनाबाबत अंतिम निर्णय घेताना सूचना, हरकतींचा विचार केला जाणार आहे.

कामगार खात्याने गेल्या नोव्हेंबर 2022 मध्ये कामगारांच्या किमान वेतनाबाबत मसुदा जारी केला आहे. त्यात पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांशिवाय विविध व्यवसायांमध्ये कार्यरत असलेल्या विविध श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनाबाबत मसुदा सूचना जारी केली आहे. तथापि, सदर मसुदा अधिसूचनेबाबत अंतिम अधिसूचना जारी झालेला नाही. त्यात अकुशल कामगारांसाठी किमान 425 रुपये प्रतिदिन, कुशल कामगारांसाठी 806 रुपये आहे, असे वेतन प्रस्तावित करण्यात आलेले आहे. कामगार संघटनांनी सदर किमान वेतनात वाढ करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती.