मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन बांदोडकर मैदानावर पाच दिवसीय गोवा पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन
गोव्यात आजपासून सुरू होत असलेला गोवा पुस्तक महोत्सव हा ज्ञान वृद्धीसाठीचा महोत्सव आहे. पुस्तक वाचनामुळे ज्ञानात भर पडत असते. त्यामुळे या ज्ञानदानाच्या पुस्तक महोत्सवाचा गोमंतकीयानी व विशेष करून गोव्यातील मुलांनी फायदा करून घ्यावा, असे आवाहन काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. पणजी येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर काल ‘नॅशनल बुक टॅस्ट ऑफ इंडिया’ आयोजित पाच दिवसीय गोवा पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. व्यासपीठावर सन्माननीय पाहुणे गोव्याचे शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, गोवा क्रीडा खात्याचे संचालक डॉ. अजय गावडे, नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया चे अध्यक्ष मिलिंद मराठे, संचालक युवराज मलिक, लोकमान्य सांस्कृतिक फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. किरण ठाकूर ही मान्यवर मंडळी उपस्थित होती.
पुढे बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी, खाण्यापासून पिण्यापर्यंत गोव्यात अनेक महोत्सव होतात, परंतु हा पुस्तक महोत्सव सर्वस्वी वेगळा आहे. यातून खुप काही शिकायला मिळणार आहे. पुस्तक वाचून जो आनंद मिळतो तो मोबाईलवर वाचून मिळणार नाही. गोव्यात संस्कृती वाढत आहे.
शिक्षित लोकांमुळे देशाचा
लवकर विकास ः मुख्यमंत्री
शिक्षण हा समाजाचा मजबूत पाया आहे. आणि ज्या देशात शिक्षित लोकांची संख्या जास्त असते तो देश झपाट्याने विकास साधू शकतो. केंद्र सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरणात मातृभाषेला विशेष स्थान दिले आहे, असे स्पष्ट करून त्याद्वारे देशातील प्रादेशिक भाषांच्या विकासाला हातभार लागणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आता देशात व्यावसायिक शिक्षणही मातृभाषेतून घेण्याची सोय उपलब्ध झाली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
तत्पूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते फीत कापून या महत्त्वाचे उद्घाटन करण्यात आले. कालपासून सुरू झालेला हा पुस्तक महोत्सव येत्या 8 फेब्रुवारीपर्यंत चालू राहणार आहे.
नॅशनल बुक ट्रस्टचे चेअरमन प्रा. मिलिंद सुधाकर मराठे यांनी यावेळी बोलताना गोवा ही कलावंतांची भूमी असून गोव्यात मोठमोठे कलाकार, लेखक, साहित्यिक, कवी, गायक, संगीतकार आदींचा जन्म झाल्याचे सांगितले. गोव्यात दीनानाथ मंगेशकर, लता मंगेशकर, जितेंद्र अभिषेकी, अजित कडकडे यांच्यापासून हल्लीच्या काळातील रेमो फर्नांडिस आदिंनी संगीतात मोठी भर घातलेल्याचे ते म्हणाले. त्याशिवाय गोव्यातील पहिले साहित्यिक व ‘कृष्ण चरित्र’चे लेखक कृष्णदास श्यामा यांच्यापासून ज्ञानपीठकार दामोदर मावजो तसेच 1200 पेक्षा जास्त रहस्यकथा लिहून साहित्य क्षेत्रात विक्रम प्रस्थापित करणारे लेखक गुरूनाथ नाईक आदींचा त्यांनी यावेळी बोलताना उल्लेख केला. स्वत:चे पुस्तक असलेले गोव्यातील पहिले ज्ञात साहित्यिक कृष्णदास श्यामा यांचा जन्म झाला त्याला या वर्षी 500 वर्षे पूर्ण होत आहेत. आणि अशा वर्षी गोव्यात हा महोत्सव होत आहे हा दुग्धशर्करा योग असल्याचे मराठे म्हणाले. वाचक हजारो जीवने जगतो पण वाचत नाही तो एकच जीवन जगतो अशा आशयाचे पाश्चात्य साहित्यिक जॉर्ज आर. आर. मार्टिन्स यांचे वाक्य उदृत करून, मिलिंद यांनी सांगितले की, जो वाचक संवेदनशील, न्यानसमृद्ध होतो. वाचन संस्कृती वाढीस लागणे, विकसित वाचक निर्माण करणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे. का वाचावे, काय वाचावे आणि कसं वाचावे या प्रश्नांची उत्तरे मिळाली तर हा महोत्सव यशस्वी झाला असे म्हणू.
ज्ञानी माणसे देशाला पुढे नेतात ः मराठे
पुस्तक वाचनाने माणसाच्या ज्ञानात भर पडते आणि त्याद्वारे त्याच्या व्यक्तीमत्त्वात एक वेगळीच झळाळी प्राप्त होत असल्याचे त्यांनी योवळी नमूद केले. पुस्तके माणसाला ज्ञानी बनवतात. ही ज्ञानी माणसेच आपल्या देशाला पुढे नेतात, देशाची प्रगती घडवून आणतात. विकसित भारताची विकसित वाचक ही पूर्वअट असल्याचे ते म्हणाले. या महोत्सवात वेगवेगळे कार्यक्रम होणार असून त्यात सहभागी होण्यासाठी मोठमोठ्या व्यक्ती येणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. अशा या लोकांचे विचार ऐकण्याची संधी सोडू नका, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या पुस्तक महोत्सवाचे नामकरण ओशन ऑफ स्टोरीज असे करण्यात आलेले असून या ज्ञानाच्या महासागरात सर्वांनीच सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
महोत्सव दरवर्षी गोव्यात
झाल्यास पाठिंबा ः मुख्यमंत्री
गोव्यातून मोठ्या प्रमाणात पंढरपूरला वाऱ्या जात आहेत. गोव्याचे संगीत नाटक महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत पहिले, दुसरे येते. गोव्यात रवींद्र केळेकर, दामोदर मावजो सारखे ज्ञानपीठ विजेते साहित्यिक आहेत. वाचक आहेत म्हणून लेखकांना हुरूप येतो. हा महोत्सव गोमंतकीयांसाठी संधी आहे. त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. हा महोत्सव गोव्यात दरवर्षी घडवून आणला तरी गोवा शासनाचा पाठिंबा राहील. हा पुस्तक महोत्सव हा ज्ञानप्राप्तीचा महोत्सव असून पालकांनी मोठ्या संख्येने आपल्या मुलांना या पुस्तक महोत्सवात सहभागी होण्यासाठी पाठवावे, असे आवाहनही यावेळी सावंत यांनी केले.