फलोद्यान महामंडळाचा उपक्रम; पणजीत पहिले दालन
फलोद्यान महामंडळाच्या मुख्यालयात सवलतीच्या दरात ग्राहकांना पुष्पगुच्छ उपलब्ध करून देण्यासाठी एक खास दालन उघडण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाचे चेअरमन किरण कांदोळकर यांनी काल दिली. येत्या १५-२० दिवसात हे दालन सुरू करण्यात येणार असून महामंडळाच्या काही कर्मचार्यांना पुष्पगुच्छ तयार करण्यासाठीचे खास प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. त्यासाठी राज्याबाहेरून प्रशिक्षकाना आणण्यात येणार आहे.
महामंडळाच्या मुख्यालयात एकदा हे सुरू झाले की नंतर पुष्पगुच्छ विक्रीसाठीचे दालन सुरू करण्यास इच्छुक असलेल्या राज्यभरातील युवक-युवतींसाठीही पुष्पगुच्छ तायर करण्यासाठीचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येतील. हे प्रशिक्षण घेतलेले उमेदवार जेव्हा स्वत:चे पुष्पगुच्छ विक्री दालन सुरू करतील तेव्हा त्यांना त्यासाठी लागणारी फुले व अन्य साहित्य फलोद्यान महामंडळ पुरवतील. हे दालन चालवणार्या व्यक्तींना आपल्या दुकानात पुष्पगुच्छाची किती किंमत याची माहितीही ग्राहकाला आगाऊ द्यावी लागेल.
याव्यतिरिक्त महामंडळ त्यांना ठराविक पुष्पगुच्छांचे पोस्टरही देणार असून प्रत्येक पोस्टरवर त्या पुष्पगुच्छासाठी किती व कोणकोणत्या प्रकारची फुले वापरण्यात आलेली आहेत व त्याची किंमत किती आहे हे तपशील लिहिलेले असेल. त्यामुळे पुष्पगुच्छ खरेदी करताना ग्राहकांची फसवणूक होणार नाही. अन्य पुष्पगुच्छ विक्रेत्यांपेक्षा या दालनात ग्राहकांना सवलतीच्या दरात पुष्पगुच्छ उपलब्ध होऊ शकतील. या योजनेसाठी महामंडळ राज्यात पुष्पशेती करणार्या शेतकर्यांकडून फुले विकत घेणार असून त्यामुळे त्यांचीही चांगली सोय होऊ शकेल. दरम्यान, ही दालने चालवणार्याना पुष्पगुच्छ करण्यासाठी जो खर्च येईल त्याचा २० टक्के खर्च महामंडळ त्यांना देईल. त्यामुळे ग्राहकांना पुष्पगुच्छ स्वस्तात देण्यास दालनचालकाना अडचण येणार नसल्याचे कांदोळकर म्हणाले. ही योजना सुरू करण्यासाठी अत्यल्प खर्च येणार असून तो २ ते २.५ लाख रु. एवढाच असेल असे कांदोळकर यांनी सांगितले. मात्र, एकदा योजना सुरू झाल्यानंतर त्यासाठी कायमस्वरुपी वेगळा खर्च येणार असून त्याची सोय केली जाणार असल्याचे त्यानी स्पष्ट केले.