– प्रा. प्र. शं. तासे
या लेखाचे शीर्षक वाचल्याबरोबर १९९४ सालातील ‘मी माझा’ या श्री. चंद्रशेखर भा. गोखले यांच्या छोटेखानी काव्यसंग्रहाने महाराष्ट्रभर निर्माण केलेली, चार ओळींच्या एकेक, सुट्या, स्वतंत्र आणि चटका लावणार्या कवितांची लाट आठवली ना? तोपर्यंत प्रसिद्ध कवींच्यासुद्धा काव्यसंग्रहांची एकेक आवृत्ती पाचशे, फार तर हजारभर प्रतींची असायची. ‘मी माझा’ हा संग्रह प्रसिद्ध झाला आणि अल्पावधीतच त्याच्या लाखो प्रती हातोहात खपल्या.
ज्याच्या-त्याच्या तोंडी ‘मी माझा’, ज्याच्या-त्याच्या तोंडी ‘मी माझा’मधील आवडलेल्या चारोळ्या, द्यायच्या चारोळ्या- घ्यायच्या चारोळ्या. वीस लाखाच्या आसपास या संग्रहाच्या प्रती खपल्याची नोंद ‘इंडियन एक्सप्रेस’सारख्या इंग्रजी वृत्तपत्राने केली, दखल घेतली, कविगौरव केला. चं.गो. अल्पावधीत लोकप्रिय झाले. मुलाखती घेतल्या गेल्या. त्यांच्या नव्यानव्या चारोळ्यांसाठीची मागणी वाढली आणि बघता बघता चं.गों.च्या चारोळ्यांचे अनुकरण करणार्यांची संख्या वाढत गेली. कवितेकडे न वाचता उलटायचे पान म्हणून बघणारी वाचकमंडळी चारोळ्या मात्र वाचू लागली… हे असले श्रेय कवयित्री सौ. शिरीष पै यांच्या ‘हायकू’ला यापूर्वी लाभले होते. पण चं.गो. ते चं.गो.च. आणि त्यांची चारोळी तीच चारोळी. इतरांनी अनुकरण करण्यात धन्यता मानावी, पण मूळच्या चारोळीची सर येऊ नये, ही बात अंदरकी… चारोळी लेखनाच्या स्पर्धा घेतल्या गेल्या… हे सगळे एका निवांत क्षणी आठवले आणि वाटले ‘मी माझा’ पुनः एकदा चाळावा, वाचावा, गोडवा चाखावा, एकट्यापेक्षा तुमच्याबरोबर तुमच्या साथीने, साक्षीने आणि समरसतेने…
‘पुसणार कोणी असेल तर| डोळे भरून यायला अर्थ आहे|
कुणाचे डोळे भरणार नसतील तर| मरणसुद्धा व्यर्थ आहे॥
ही ‘मी माझा’ काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावरील सुप्रसिद्ध चारोळी… तोपर्यंत अवघ्या महाराष्ट्राला गोविन्दाग्रजांच्या ‘प्रेम आणि मरण’ या कवितेतील ‘निष्प्रेम चिरंजीवन ते| जगी दगडालाही मिळते| धिक तया| क्षण एक पुरे प्रेमाचा| वर्षाव पडो मरणांचा॥ या ओळी मुखोद्गत होत्या. पण चं.गों.च्या चारोळ्यांनी तोच विचार कथा-काव्याच्या अंगाने न मांडता, सुभाषिताच्या अंगाने मांडून दाखवला. सुभाषितातील उपदेश गाळून, दृष्टांत गाळून, चारओळीत एक अंतर्गत विरोधी लय मांडून…! या चारोळीने पुस्तक हाती घेताच वा येताच मनाची पकड घेतली आणि ती चं.गोंं.नी अखेरपर्यंत टिकवूनच नव्हे तर सदा फुलती ठेवली, सदा बरहत ठेवली, सदा जागती, नादती व नांदती ठेवली… काहीतरी नवे, हवे, हवेहवेसे काव्यप्रांतात घडत होते…
ही सुभाषितवजा विरोधीलयीची चारोळी मग या संग्रहात अनेक वेळा भेटू येते-
‘नेहमीच डोक्यांनी विचार करू नये| कधी भावनांनाही वाव द्यावा|
आसुसलेल्या डोळ्यांना| स्वप्नांचा गाव द्यावा॥
‘इथं प्रत्येकजण आपआपल्या घरात| अन् प्रत्येकाचं दार बंद आहे|
तरी एकोप्यावर बोलणं हा| प्रत्येकाचा छंद आहे॥
‘इथं वेडं असण्याचे| खूप फायदे आहेत|
शहाण्यासाठी जगण्याचे| काटेकोर कायदे आहेत॥
अशा चारोळ्या वाचता वाचता आता आपल्या लक्षात असे येते की मराठी कवितेत तोवर ‘री ला री’| जन म्हणे काव्य करणारी अशी अंत्य यमकाची चाल रूढ होती. चं.गों.च्या चारोळ्यांत विरोधी लय तत्त्वाबरोबर दुसर्या व चवथ्या ओळीतील दोन-दोन नादानुकारी शब्दांनी यमक साधलेला आहे. (उदा. वाव द्यावा- गाव द्यावा, बंद आहे, छंद आहे, फायदे आहेत, कायदे आहेत इ.) पंडिती काव्यात अवजड शब्दांची यमके येतात. तिथे वरच्या ओळीतील शेवटच्या शब्दातील अक्षरांची, पुढच्या/खालच्या/शेवटच्या ओळीतील शब्दांशी यमक साधताना ओढाताण, फोडाफोड केलेली असते. त्यामुळे शब्दचमत्कृती साधते पण कृत्रिमतेचा दोषही कवितेच्या माथ्यावर येतो. (उदा. काव्य करावे म्यां, नच वाचकावें दूषितो परि लघूस| का न सदन बांधावे कीं त्यांत पुढें बिळें करिल घूस॥ -मोरोपंत). चं.गों.ची यमके साध्या-साध्या नादानुकारी शब्दांची बहुधा असतात, त्यामुळेच चं.गों.ची चारोळी अनुकरणाला आशयाने सुलभ असली तरी रचनेच्या दृष्टीने अवघड ठरली. त्याच धर्तीच्या या आणखी काही चारोळ्या-
‘वाळकं पान गळताना सांगतं| वसंत आता येणार आहे|
वसंत ओरडतच येतो| की मी लगेच जाणार आहे॥
‘सगळीच गावं दुरून| सुबक, सुंदर दिसतात|
गल्लीतून फिरताना कळतं| ती विस्कटलेली असतात॥
‘कोण म्हणतं रात्रीनंतर येणारा दिवस| नेहमी नवा असतो?
माझ्या मते तो नुसताच| दोन रात्रीमधला दुवा असतो॥
विस्तारभयास्तव अशा सामाजिक अनुभवाशयाच्या पण काव्योत्कटता साधलेल्या चारोळ्या आवरत्या घ्यावयास हव्यात. अशा चारोळ्या चं.गों.चे सामाजिक, विरोधीतत्त्वाधिष्ठित भान समर्थपणे व्यक्त करतात.
‘मी माझ्या’मधील ज्या चारोळ्या सर्वाधिक आवडल्या, त्या प्रेमविषयक आहेत. तरुण-तरुणींना (त्या काळातल्या) त्या अधिक भावल्या. आणि आजही त्या भावतील असेच आशय सामर्थ्य त्यात आहे. नवथर पहिल्यावहिल्या प्रीतीपासून निष्ठावंत अचल प्रीतीपर्यंतचे अनेक गहिरे भाव चं.गों.नी या प्रकारच्या चारोळ्यांत कळीचे फूल होताना दाखवावे तसे दाखवले आहेत. पहा ना हा रोमँटिक अनुभव-
‘गुलमोहर फुलताना| तुझ्या कुशीतून बघावं|
गुलमोहरासारखं फुलत| तुझ्या कुशीत जगावं॥
आता या किंचित विरहाच्या छटा व्यक्त करणार्या चारोळ्या पहा-
‘तू गेल्यावर वाटतं| खूपसं सांगायचं होतं|
तू खूपसं दिलस तरी| आणखी मागायचं होतं॥
‘ठाऊक असतं तुझं येणं अशक्य आहे| तरी मन तुझी वाट पाहणं सोडत नाही|
मीही म्हणतो जाऊ दे| मी त्याचं मन मोडत नाही॥
‘आता मलाही लागलंय जमायला| तुझ्यासारखं वागणं|
समोर असलं की गप्प राहणं| आणि रात्री कुढत जागणं॥
‘तुझी आठवण हा| नित्य नवा अनुभव आहे|
कधी उसळणारं वादळ| तर कधी पाकळीवरचं दंव आहे॥
‘तू समोर असलीस की| तुसतंच तुला बघणं होतं|
आणि तू जवळ नसताना| तुझ्या सोबत जगणं होतं॥
आता मीलनाचे काही उत्कट क्षण पाहा-
‘मुकं मुकं राहून तुझं| नुसतंच पहात राहणं|
जसं गोठलेल्या नदीचं| बर्फाखालून वाहणं॥
‘तुझ्यावर रागावणं हा| तुला आठवण्याचा बहाणा आहे|
तू आलास की तो जातो| तसा माझा राग शहाणा आहे॥
‘तेव्हा मी मनापेक्षा| पावलानाच आवरावयाला हवं होतं|
कारण मनाचं बहकणं नेहमीचच| पावलांचं बहकणं नवंच होतं॥
‘जेव्हा तू माझा| अलगद हात धरलास|
खरं सांग तेव्हा तुझ्याजवळ| तू कितीसा उरलास?’
‘आठवतं तुला आपलं| एका छत्रीतून जाणं|
ओघळणारे थेंब आपण| निथळताना पाहणं॥ सोबत असलीस की| मला माझाही आधार लागत नाही|
तू फक्त सोबत राहा| मी दुसरं काही मागत नाही॥
‘मिठी या शब्दात| केवढी मिठास आहे?
नुसता उच्चारला तरी| कृतीचा भास आहे॥
‘कोणी तरी लागतं| आपल्याला वेडू म्हणणारं|
वेडू म्हणताना आपल्यातलं शहाणपण जपणारं॥ इ. इ.
परस्परांवरील प्रगाढ प्रेमामुळे एक प्रकारचे गाढ परस्परावलंबित्व येते-
‘तुला वजा केल्यावर| बाकी काही उरत नाही|
तुझ्याशिवाय मी आयुष्य| आयुष्यच धरत नाही॥
‘तू माझं असणं| किती छान आहे|
नाहीतर हे जग म्हणजे| नुसतंच माणसांचं रान आहे॥
‘माझ्या प्रत्येक क्षणात| तुझा वाटा अर्धा आहे|
भूतकाळ आठवायचा तर| तुझ्याच आठवणींची स्पर्धा आहे॥
‘घर दोघांचं असतं| ते दोघांनी सावरायचं|
एकाने पसरवलं| तर दुसर्याने आवरायचं॥
‘दिवस ढळताना कळून चुकलं| तुझ्या आठवणीतून सुटका नाही|
हे तर कण, कण जळणं झालं| हा क्षणाचा चटका नाही॥
‘इमारत बनायला वेळ लागत नाही| घर बनायला वेळ लागतो|
घरासाठी दोन जीवांचा| खराखुरा मेळ लागतो॥
अशा प्रकारच्या उत्कट, प्रगाढ गृहस्थाश्रमीच्या प्रेमात चं.गो. अडकून राहत नाहीत. त्यांना घराबाहेरच्या, गावाबाहेरच्या, अवघ्या जगाच्या वाटांवर स्वच्छंद चालण्याचाही बराच अनुभव आहे. आणि तो त्यांनी कवीच्या सहृदयतेने, करुणेने, व्यापक समंजसपणे घेतला आहे. इथे चं.गों.चे काव्यविश्व व्यापक होत होत अमर्याद होते, मर्यादा पडते ती चारोळीची.
‘झाडावरून प्राजक्त ओघळतो| त्याचा आवाज होत नाही|
याचा अर्थ असा नाही की| त्याला इजा होत नाही॥
‘पिंपळाचं रोप कसं| कुठेही उगवतं|
कुठेही उगवतं म्हणून| त्याचं कसंही निभावतं॥
‘ढगांची सावली अलगद| माझ्या अंगावरून गेली|
शब्द मिळाले नाहीत तरी| मी त्यावर कविता केली॥
‘तळ्याकाठचं गवत तळ्याशी| सलगीनं वागायचं|
कारण त्याला जगायला तळ्याचं पाणी लागायचं॥
‘गावाबाहेरच्या डोहाला| कसलंच सोयरसुतक नसतं|
जो कोण डोकावेल वरून| त्याला त्याचंच प्रतिबिंब दिसतं॥
‘सरपणासाठी तोडलेल्या ओंडक्याला| एकदा पावली फुटली|
त्यालाच कळेना| ही जगायची जिद्द कुठली?’
चं.गों.च्या चारोळ्यांतले हे लुब्ध करणारे निसर्गायन आहे.
आता हे ग्रामायन पहा-
‘मोर थुई थुई नाचतो आणि| त्याची पिसं सांडतात|
लोकं इतकी हुशार की ते| त्याचाही बाजार मांडतात॥
‘गावाच्या वेशीवर| मारुतीला बसवलेला|
दर शनिवारी नारळ देऊन| बिचार्याला फसवलेला॥
‘इथं प्रत्येकाला ठाऊक आहे| प्रत्येकाचं गुपीत|
पण प्रत्येकजण डागाळलेला| इथला चंद्रसुद्धा शापीत॥
‘झिजेल म्हणून चंदन मी| उगाळायचं थांबवलं तर|
कंटाळून ते म्हणालं माझं| उरलं आयुष्य उगीच लांबवलं॥
‘पुतळे उभारून| खरंच स्फूर्ती मिळते का?
ते सरावाचे झाल्यावर| नजर तरी वळते का?’
‘देवळात जाऊन माणसं| दुकानात गेल्यासारखी वागतात|
चार आठ आणे टाकून| काही ना काही मागतात॥
‘लोकांच्यात वावरताना मी| माझा तोतया म्हणून वावरतो|
कुणी माझं खरं रूप ओळखलं की| माझ्यातला मी बावरतो॥ इ. इ.
आता हे स्वानुभवातून आलेलं वैश्विक सामंजस्य पहा-
‘तो प्रचंड वड कसा| उन्मळून पडला होता|
म्हणे त्याला बिलगलेला| सायलीचा वेल कुणी खुडला होता॥
‘उमलणं आणि फुलणं| यात बरंच अंतर आहे|
उमलणं अगदी स्वाभाविक आहे| फुलणं त्यानंतर आहे॥
‘आपल्याला काही हवं असणं| म्हणजेच आपलं जगणं आहे|
येणार्या प्रत्येक क्षणाकडे| आपलं काही मागणं आहे॥
‘घराभवती कुंपण हवं| म्हणजे आपलं जग ठरवता येतं|
बाहेर बरबटलेलं असलं तरी| आपल्यापुरतं सावरता येतं॥
‘मरताना वाटलं| आयुष्य नुसतंच वाहून गेलं|
मला जगायचंय, मला जगायचंय म्हणताना| माझं जगायचंच राहून गेलं॥
‘झेपेल तेवढंच दुःख| तो आपल्याला देतो|
दिलेलं दुःख संपलं की| आपल्यालाच नेतो॥
‘प्रत्येकाला एक आभाळ असावं| कधी वाटलं तर भरारण्यासाठी|
प्रत्येकाला एक घरटं असावं| संध्याकाळी परतण्यासाठी॥
‘प्रत्येकानं जगायलं हवं| आपापल्या परीनं, कारण|
तो… वैशाखातही गारवा देतो| वळवाच्या सरीनं॥
‘इथे प्रत्येकाला वाटतं| आपण किती शहाणे|
यावर उपाय एकच| सगळं शांतपणे पाहाणे॥
– ‘मी माझा’ या शीर्षकापासून आणि मुखपृष्ठावरच छापलेल्या चारोळीपासून आपण चं.गों.च्या सहवासात त्यांना व त्यांच्या चारोळ्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. ‘मी’संबंधीही काही चारोळ्या आहेत-
‘मी आहेच जरा असा| एकटा एकटा वाटणारा|
वाळकं पानसुद्धा गळताना| तन्मयतेने पाहणारा॥
‘माझ्या हसण्यावर जाऊ नका| माझ्या रुसण्यावर जाऊ नका|
जरी तुमच्यात बसलो तरी| माझ्या असण्यावर जाऊ नका॥
‘माझी गोष्ट मला सांगताना| मी जास्त खोलात शिरत नाही|
कारण नावालाही मग मी| निर्दोष असा ठरत नाही॥
‘मला पक्कं ठाऊक आहे की| प्रत्येक गोष्टीला अंत आहे|
म्हणूनच मी काही बोलत नाही| मी अगदी शांत आहे॥
इ. इ. ‘माझा’ शब्द ‘मी’चा ‘तुझ्या’शी संबंध दर्शवितो तो आपण प्रेमकाव्यात पाहिला आहे. मी-माझा, तू- तुझा हा संबंध प्रेमापुरता आहे. इथून पुढच्या निसर्ग, गाव (जग) रहाटी, आणि वैश्विक व विश्वधारा ईश्वराच्या जाणिवेमध्ये मी, माझे (तू-तुझे) पण मावळलेले आहे. आणि मी-माझे विरहित, तटस्थ, नितळ, निरीक्षणजन्य अनुभव आले आहेत- ‘मी माझा’ या चारोळ्यांसारख्या नव्या अभिव्यक्तींनी नटलेल्या चं.गों.च्या कवितेतील एक माणूस व एक संवेदनक्षम कवीचे हे विकसन आहे, उमलणे आहे, फुलणे आहे, बहरणे आहे. मीपासून सुरू झालेला हा जाणिवेचा काव्यात्म प्रवास वैशाखातही सरींच्या रूपाने गारवा देणार्या ‘त्या’पर्यंत पोहोचतो आणि ‘सगळे शांतपणे पाहणे’ या एकाच उपायावर येऊन थांबतो.