दिवाळीचा सण असल्याने तसेच पंजाब व उत्तर प्रदेशसारख्या शेतीप्रधान राज्यांतील निवडणुका तोंडावर असल्याने केंद्र सरकारने विविध पिकांच्या आधारभूत किंमतींत वाढ करण्याची घोषणा केली आहे. विविध शेती उत्पादनांसाठी आधारभूत किंमतींत ३९ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मात्र, त्यामुळे गेल्या आठवड्यात १० टक्के महाग बनलेल्या विविध अन्नधान्याच्या वस्तूंच्या किंमती आणखी कडाडण्याची भीती निर्माण झाली आहे.
गव्हाच्या आधारभूत किंमतीत १५ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. कृषी मूल्य व किंमती आयोग (सीएसीपी)च्या शिफारशींनुसार सरकार निर्णय घेणार असल्याचे केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी जाहीर केले होते, परंतु आयोगाने गव्हाच्या आधारभूत किंमतीत क्विंटलमागे १,३५० रुपयांपर्यंत वाढ करण्याची शिफारस केली होती व पंजाबसारख्या गव्हाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होणार्या राज्याने त्यावरील पाच टक्के कर हटवावेत असेही सुचवले होते, परंतु आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने या शिफारशींकडे कानाडोळा केला असून केवळ आधारभूत किंमतीत प्रति क्विंटल १६५ रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे सन २०१२ – १३ मध्ये विक्री करावयाच्या गव्हाची खरेदी सरकार १,२८५ रुपये प्रति क्विंटल या दराने करणार आहे. गतवर्षी सरकारने गहू पन्नास रुपयांच्या बोनससह १,१७० रुपये क्विंटल दराने खरेदी केला होता. मोहरीच्या आधारभूत किंमतीत ६५० रुपयांवरून तब्बल २५०० रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आली आहे, तर वाटाणा व मसूर यांचे दर प्रति क्विंटल रू. २,८०० निश्चित करण्यात आले आहेत. वाटाण्याच्या दरांत प्रति क्विंटल ७०० रुपये वाढ केली गेली आहे.