पावसाने ओलांडले पाऊण शतक

0
19

>> रविवारी राज्यात पावसाने घेतली विश्रांती

राज्यात पावसाने रविवारी उसंत घेतल्याने नागरिकांनी सुस्कारा सोडला. राज्यात पावसाने आत्तापर्यंत इंचाचे पाऊण शतक ओलांडले आहे. राज्यात आत्तापर्यंत ७५.५४ इंच पावसाची नोंद झाली आहे.

गुजरात किनारपट्टी भागातील कमी दाबाच्या पट्‌ट्यामुळे राज्यात शनिवारी जोरदार पाऊस पडला. गेल्या चोवीस तासांत ३.१८ इंच पावसाची नोंद झाली असून फोंडा येथे सर्वाधिक ७.३१ इंच पावसाची नोंद झाली.

राज्यातील पावसाचे प्रमाण आत्तापर्यंत २७.८ टक्के अधिक आहे. जुलै महिन्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. चोवीस तासात जोरदार पावसामुळे अनेक भागात नद्यांतील पाण्याच्या पातळीत वाढ झाली होती. तथापि, रविवारी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

चोवीस तासांत फोंड्याला जोरदार पावसाने झोडपून काढले. फोंड्यात ७.३१ इंच पावसाची नोंद झाली. पेडणे येथे ४.२१ इंच, दाबोली येथे ३.४४ इंच, मुरगाव येथे ३.४१ इंच, ओल्ड गोवा येथे ३.११ इंच, काणकोण येथे २.९६ इंच, सांगे येथे २.९४ इंच, साखळी येथे २.८९ इंच, पणजी येथे २.७९ इंच, मडगाव येथे २.१२ इंच, केपे येथे १.२० इंच पावसाची नोंद झाली. वाळपई येथील पावसाची माहिती उपलब्ध झाली नाही.

केपे येथे ९१.४४ इंच पाऊस
राज्यात आत्तापर्यंत केपे येथे सर्वाधिक ९१.४४ इंच पावसाची नोंद झाली आहे. पेडणे येथे ८६.०४ इंच, सांगे येथे ८२.४२ इंच, काणकोण येथे ८१.७९ इंच, वाळपई येथे ८१.२३ इंच, फोंडा येथे ७८.८७ इंच पावसाची नोंद झाली आहे.