Home बातम्या पाकिस्तानी क्रिकेटपटूंना कारावास

पाकिस्तानी क्रिकेटपटूंना कारावास

0

फिक्सिंग प्रकरणाचा खटला साऊथवॉर्क क्राऊन कोर्टात तीन आठवडे झाला. चौघांनाही अपिल करण्याची मुभा देण्यात आली आहे. दरम्यान, अमिरला कारागृहात न ठेवता युवा गुन्हेगारांच्या केंद्रात ठेवण्यात येणार आहे.

व्यावसायिक क्रिकेटवर या खेळाडूंच्या वर्तनाचा वाईट परिणाम झाला आहे, असे न्यायमूर्तींनी सांगितले. क्रिकेटची प्रतिमा आणि खेळातील प्रमाणिकपणा यास तिघांच्या वर्तनाने गालबोट लावले असेही कोर्टाने नमूद केले. अनेक तरुण या खेळाडूंना आपला हिरो मानून त्यांच्यासारखे होण्याचा प्रयत्न करीत असणार त्यांनाही या तिघांनी धोका दिला आहे असे कोर्टाने म्हटले. खेळाडूंचे कृत्य इतके गंभीर आहे की त्यांना केवळ तुरुंगवासच योग्य ठरेल अशी टीप्पणीही न्यायमूर्तींनी केली. यापुढेही आश्चर्यकारकरित्या सामना संपला तर लोक फिक्सिंगचा संशय घेतील असा खेद कोर्टाने व्यक्त केला.

बट्ट हा या फिक्सिंग कांडाचा सूत्रधार असल्याही निवाड्यात म्हटले आहे. आमिरला वयाच्या १८व्या वर्षी फिक्सिंग कांडात सहभागी होण्यास दबाव आणून भाग पाडण्यासाठी कोर्टाने बट्ट याला चांगलेच फटकारले. आमिर एक हुशार गोलंदाज आहे, तुम्ही कर्णधार असल्याने त्याला तुमच्यापुढे झुकणे भाग पडले. कॅप्टन, तुम्ही भ्रष्टाचार माजवलात, क्रिकेट व तुमचा देश यांच्यादृष्टीने हे खूप वाईट कृत्य आहे.

अमिरला उद्देशून कोर्टाने सांगितले की, त्याने केलेल्या कृत्याला नऊ महिने शिक्षा आहे मात्र त्याचे कोवळे वय, ग्रामीण पार्श्वभूमी व गुन्ह्याची त्याने दिलेली कबुली यामुळे त्याची शिक्षा सहा महिने केली आहे. आमिरकडे प्रत्यक्ष पैसे सापडले नसले तरी मुद्दामहून त्याने ‘नो बॉल’ टाकले असे सिद्ध होत असल्याचे कोर्टाने नमूद केले.

असिफ याचा सहभाग मात्र बराच होता. या कांडाच्या आखणीत, भ्रष्ट मार्गाने पैसे घेणे, फसवणे यासाठी तो दोषी असल्याचे कोर्टाने नमूद केले.

दरम्यान, निकालानंतर लगेच सर्व खेळाडूंना अटक करुन तुरुंगात नेण्यात आले. अर्धी शिक्षा भोगल्यानंतर वर्तणूक चांगली असल्यास त्यांच्या सुटकेची तरतूद आहे. तिघांना खटल्याचा खर्च भरण्यासाठीही सांगण्यात आले. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात ‘द न्यूज ऑफ दि वीक’ या नियतकालिकाने केलेल्या माजीद याच्या स्टींग ऑपरेशननंतर स्पॉट फिक्सिंगचे कांड उघडकीस आले होते. दहा लाख अमेरिकी डॉलर्समध्ये कसोटी सामना ‘फिक्स’ करण्याचे मजिद सांगत असल्याचे ध्वनिचित्रफितीत दाखविण्यात आले होते. बट्ट, असिफ आणि अमिर आपल्या पे-रोलवरती असल्याचा दावाही मजिदने केला होता. गेल्या वर्षी लॉडर्‌‌सवर झालेल्या सामन्यावेळी आधी ठरवून ‘नो-बॉल’ घातल्याचा आरोप या तिघांवर झाला होता. नंतर या तिन्ही खेळाडूंच्या हॉटेलमधील खोल्यांवर टाकलेल्या छाप्यात रोकड जप्त करण्यात आली होती. दरम्यान, याआधीच बट्ट याच्यावर दहा वर्षासाठी, आसिफवर सहा वर्षांसाठी आणि आमिरवर पाच वर्षांसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बंदी घालण्यात आली आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हेन्सी क्रोनिए, पाकिस्तानचा कर्णधार सलिम मलिक आणि भारताचा कर्णधार मोहंमद अझरुद्दीन यांच्यावर मॅच फिक्सिंगचे आरोप झाले होते. त्यांच्यावर शिस्तभंग कारवाईही झाली होती मात्र अद्यापपर्यंत कुठल्याही खेळाडूला अशा प्रकरणांत कारावास घडला नव्हता.