पर्येचा लढा आणि तिढा

0
18

राजकारणापोटी कौटुंबिक कलह होतात, घरे फुटतात. वेळोवेळी हे दिसून आलेले आहे. कधी कधी तर सर्व बाजूंनी सत्तेची फळे चाखता यावीत यासाठी हेतुपुरस्सर कुटुंबातील एक व्यक्ती या पक्षात, तर दुसरी दुसर्‍या पक्षात असेही नियोजन केले जाते. कधी कुटुंबातील अंतर्गत कलह केवळ राजकीय कारणांखातर चव्हाट्यावर येतो. पर्ये मतदारसंघातील ताज्या घडामोडींमुळे गोव्यात एक थेट कौटुंबिक संघर्ष राजकीय व्यासपीठांवर उपस्थित झालेला दिसतो. आपली सुवर्णमहोत्सवी विधिमंडळ कारकीर्द पूर्ण करणारे ज्येष्ठ नेते श्री. प्रतापसिंह राणे यांनी काल पर्ये मतदारसंघात सपत्निक देवदर्शन घेतल्याने आता कॉंग्रेसतर्फे सासरे आणि भाजपतर्फे सून असा तेथे सामना रंगणार का असा प्रश्न जनतेला पडला आहे.
वास्तविक, प्रतापसिंह राणे यांनी आपल्या विधिमंडळ कारकिर्दीचा सुवर्णमहोत्सव साजरा करीत असतानाच राजकीय निवृत्ती जाहीर केली असती तर त्यांची शान राहिली असती आणि हा अनवस्था प्रसंग ओढवला नसता. परंतु त्यांना अजूनही राजकारणात सक्रिय राहण्याची उमेद आहे. पुत्र विश्वजित राणे यांनी मध्यंतरी आपल्या पित्याची राजकीय निवृत्ती गृहित धरून पत्नी दिव्या राणे यांना भाजपाची उमेदवारी मिळावी अशी तरतूद केली खरी, परंतु या दबावाला सिनियर राणे बधलेले दिसत नाहीत. विश्वजित यांनी पित्याने निवृत्ती घ्यावी असे सांगताना गेली वीस वर्षे आपणच त्यांना निवडून आणत आलो आहोत अशी फुशारकी मारली होती. हा अपमान जिव्हारी लागल्यानेच बहुधा राजकीय निवृत्तीच्या विचारात असलेल्या सिनियर राणेंनी आपल्या क्षात्रतेजाला स्मरून पुन्हा तलवार परजली आहे. लढवय्या घराण्याचा वारसा सांगणार्‍या पत्नी सौ. विजयादेवीही पदर खोचून पतीसमवेत उभ्या राहिलेल्या दिसत आहेत. त्यामुळे हा एक कौटुंबिक संघर्ष राजकीय व्यासपीठावर लढला जात आहे की राजकीय संघर्ष कौटुंबिक स्तरावर उतरला आहे असा प्रश्न जनतेला पडला आहे.
आपले दोन हात ओरपायला पुरेसे पडत नाहीत म्हणून पत्नीचे दोन हात जोडीला घ्यायची हाव अनेक इच्छुक उमेदवारांना या निवडणुकीत लागलेली दिसली. मायकल लोबो, बाबू कवळेकर, विश्वजित राणे, बाबूश मोन्सेर्रात अशी सगळी जोडपीच राजकीय रणांगणात उतरण्याच्या तयारीत दिसताच ही काय सत्यनारायणाची पूजा आहे का, असा थेट सवाल आम्ही विचारला होता. २०१२ च्या निवडणुकीत अशाच प्रकारे कॉंग्रेस पक्षाने आलेमावांची घराणेशाही खपवून घेतल्याने त्या पक्षाचे त्या निवडणुकीत कसे पानीपत झाले याचेही स्मरण तेव्हा करून दिले होते. राजकीय घराणेशाहीविरुद्ध जनतेमधून उमटलेल्या तीव्र प्रतिक्रियांमुळे भाजप श्रेष्ठींनाही अखेर ताठर भूमिका घ्यावी लागली आणि परिणामी मायकल लोबोंना पक्षातून बाहेरचा रस्ता स्वीकारावा लागला, तर बाबू कवळेकरांवर आपल्या पत्नीच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला मुरड घालण्याची वेळ ओढवलेली आहे. मोन्सेर्रात दांपत्य हे भाजपमध्ये येतानाच जोड्याने आलेले असल्याने त्यांना उमेदवारी देणे भाजपला भाग पडले खरे, परंतु मायकल लोबोंच्या दबावापुढे न बधणारे भाजप श्रेष्ठी विश्वजित राणे यांच्या दबावापुढे का लोटांगण घालून राहिले आहेत असाही प्रश्न जनतेला पडलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा सिनियर राणेंची भेट घेतली तेव्हा त्यांच्याशी निवृत्तीबाबत काही राजकीय तडजोड झाली होती का असा प्रश्न राणे निवडणुकीत उतरणार नाहीत असे दिसू लागताच जनतेमधून विचारला जाऊ लागला होता. त्याचे उत्तर लवकरच मिळणार आहे.
प्रतापसिंह राणेंची कारकीर्द १९७२ पासून आजतागायत नेहमीच उजळ माथ्याची राहिलेली आहे. त्यामुळे राजकीय आयुष्याच्या सांध्यपर्वामध्ये त्यांच्यावर विरोधकांशी छुपी तडजोड केल्याचा डाग लागू नये अशीच त्यांच्या समर्थकांची इच्छा आहे. त्या दबावामुळे राणे रणांगणात उतरत आहेत असे दिसते. भाजपने दिव्या राणे यांना पर्येतून उमेदवारी बहाल केलेली असल्याने आता सासरे विरुद्ध सून असा संघर्ष उभा राहणार आहे. सासर्‍याविरुद्ध सुनेने उभे राहणे खरे तर मानहानीकारक असल्याने आपल्याऐवजी विजयादेवींना उभे करण्याचा प्रस्ताव सिनियर राणे देऊ शकतात, कारण राणेंनी एकतर लढावे किंवा पर्यायी उमेदवार द्यावा असे कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी सुनावलेले आहे. या शेवटच्या क्षणी जर राणे लढणार नसतील तर त्यांच्यावर भाजपाशी तडजोड केल्याचा ठपका आणि त्यांच्या आजवरच्या राजकीय कारकिर्दीवर किटाळ येईल आणि लढले तर कौटुंबिक कलहाला सामोरे जावे लागेल, असा हा त्यांच्यापुढील दुहेरी पेच आहे. वेळच अशी आहे की आता माघार नामुष्कीची असेल.