31 C
Panjim
Thursday, April 22, 2021

पर्यटनाला नवी जाग!

  • प्रतिभा कारंजकर

पर्यटनाच्या दृष्टीने गोवा हे एक सुरक्षित राज्य मानले जाते. त्यामुळे देशी पर्यटकांचा गोव्याकडे कल जास्त आहे. नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण आणि आधुनिक सुखसोईंनी युक्त असा गोवा देशातीलच नव्हे तर रशिया, इस्त्राएल, अमेरिका, युरोपसारख्या देशांतील लोकांनाही आकर्षित करत असतो. जगभरातील पर्यटक गोव्यात येण्यास उत्सुक असतात. येथे आलेले पर्यटक इथल्या निसर्गाचा मनमुराद आनंद लुटतात. त्यामुळे आपण पर्यटनासाठी लागणार्‍या मूलभूत सुविधांत वाढ केली पाहिजे. नवीन नवीन योजना राबवून पर्यटक आपल्याकडे कसे आकर्षित होतील हे पाहिले पाहिजे.

गोवा ही खास देवाने घडवलेली भूमी, जी आपल्याला देणगी म्हणून मिळाली आहे आणि याचा प्रत्येक गोवेकराला अभिमान आहे. माझे वडील ज्यावेळी गोव्यात आले होते तेव्हा पोर्तुगिजांचे राज्य असल्याने त्यांना गोव्यात यायला पासपोर्टसारखा परवाना काढावा लागला होता. नंतर मी पंच्याहत्तर साली गोव्यात आले तेव्हा गोवा जरी भारताचा भाग असला तरी मला परदेशात आल्यासारखे वाटत होते. कारण आमचे तेव्हाचे वास्तव्य रायबंदर, ओल्ड गोवा, पणजी या भागांत होते. गोव्याचे बहुतेक पर्यटन पोर्तुगीज शैलीचे स्थापत्त्य आणि कॅथलिक संस्कृती असलेल्या भागात आहे. त्यामुळे गोवा म्हणजे देशातला परदेश अशीच त्याची ख्याती पसरली आहे.

यंदा कोरोनामुळे परदेशी जाणारी विमाने बंद आहेत. आणि कोरोनाच्या भीतीने परदेशात जाणे सोडाच, त्याविषयी विचारसुद्धा करता येत नाही. त्यामुळे एरव्ही परदेशांत फिरायला जाणारी लोकं गोव्याच्या दिशेनेे वळली. गोव्यात पर्यटनावरची बंदी उठली आणि देशी पर्यटकांचे लोंढेच्या लोंढे गोव्यात दाखल झाले. पर्यटनाच्या दृष्टीने गोवा हे एक सुरक्षित राज्य मानले जाते. त्यामुळे देशी पर्यटकांचा गोव्याकडे कल जास्त आहे. नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण आणि आधुनिक सुखसोईंनी युक्त असा गोवा देशातीलच नव्हे तर रशिया, इस्त्राएल, युरोपसारख्या देशांतील लोकांनाही आकर्षित करत असतो. जगभरातील पर्यटक गोव्यात येण्यास उत्सुक असतात. येथे आलेले पर्यटक इथल्या निसर्गाचा मनमुराद आनंद लुटतात. समुद्र आणि स्वच्छ समुद्रकिनारे हे एक गोव्याचे खास वैशिष्ट्य जे सर्वांचे मन मोहून टाकते. मासे खवैय्यांसाठी तर गोव्यातली मासळी म्हणजे एक पर्वणीच ठरते. त्यामुळे ‘सी-फूड’चे आयोजनही हॉटेलवाले करताना दिसतात.

‘आतिथी देवो भव:’ ही आपली संस्कृती. त्यामुळे येथे येणार्‍या प्रत्येकाचं आगतस्वागत मोठ्या कौतुकानं होतं. आपली स्वागत करण्याची पद्धत ही परदेशीय लोकांसाठी आकर्षण ठरते. आणि येथे साजरे होणारे ‘इफ्फी’, ‘कार्निव्हल’, ‘शिगमोत्सव’सारखे उत्सवही बघण्याची लोकांना ओढ असते. नाताळ आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी लोक विशेषतः गोव्याचीच निवड करतात. कारण ते सुट्टीचे दिवस असतात. तेवढ्या अवधीत एन्जॉय करायच्या दृष्टीने गोवा हे ठिकाण देशातल्या पर्यटकांना सोयीचे वाटते. ते त्यांच्या बजेटमध्येही बसणारे असते. कुटुंबासहित एन्जॉय करायचं ठिकाण म्हणजे गोवा. कारण येथे प्रत्येकाच्या वयानुसार त्याची भूक भागवली जाते. थोड्या वयस्क लोकांना देवदेव करावासा वाटतो, त्यांच्यासाठी येथे खूप सुंदर, स्वच्छ अशी मंदिरे आणि चर्चेस आहेत. तरुणाईला भूल पाडणारी एकशे पाच किलोमीटर लांबीची समुद्रकिनारपट्टी गोव्याला लाभली आहे. येथे त्यांना समुद्रस्नान, बोटिंग, स्पीड बोट, बनाना राईड, वॉटर स्पोर्ट्स, वॉटर स्कीईंग, वॉटर सर्फिंग, पॅरासेलिंग करता येते. कुणाला निळ्याशार पाण्यावरच्या फेसाळणार्‍या लाटा बघण्यात मजा वाटते. इथल्या शॅक्सची झोपडी सिस्टिमही लाजवाब आहेे. विद्युत रोषणाई आणि संगीतावर त्यांची पावले थिरकतात. एका वेगळ्या दुनियेत गेल्याचा त्यांना अनुभव येतो.
सहा-सात महिने पावसाने सिंचन केल्याने इथला सदाहरित असा हिरवागार निसर्ग, गावांतील नारळी-पोफळीच्या बागा, मुलायम रेतीचे स्वच्छ समुद्रकिनारेे, इथले सुंदर रस्ते, देशी-विदेशी पर्यटकांची मांदियाळी, स्वत: एखादी भाड्याने टू-व्हीलर घेऊन त्यांना मनसोक्त फिरता येते. गोव्यातील वातावरण शांत, सुंदर आणि आल्हाददायक असते. तसेच माणसेही स्वागतशील, शांत, संयमी आणि प्रेमळ असल्यामुळे गोव्यात येणे पर्यटकांना सुखावह वाटते. देशभरातच नव्हे तर जगभरात गोव्याला एक सुंदर पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. देशी पर्यटकांच्या तुलनेत येथे परदेशी पर्यटकांचाही भरणा अधिक असतो.

क्षेत्रफळाने अतिशय लहान राज्य असलेल्या गोव्यामध्ये पाहण्यासारख्या खूप गोष्टी आणि प्रेक्षणीय स्थळे आहेत. पणजी ही गोव्याची राजधानी. मांडवी नदीवरच्या पुलावरून या राजधानीचं दिवसा आणि रात्रीही रूप विलोभनीय असतं. रात्रीच्या झगमगाटात पणजी एखाद्या नववधूसारखी सजलेली दिसते. बघताना डोळे दिपून जातात. रात्रीच्या वेळी खास पर्यटकांसाठी सजलेल्या बोटी पाण्यावर तरंगताना दिसतात. तिथे बोट राईडबरोबर बोटीमध्ये इथल्या काही खास लोककलांचे दर्शनही घडवले जाते. बोट मिरामारपर्यंत चक्कर मारून परत फिरते तेव्हा नदीच्या दोन्ही काठांवरचे दृश्य खूपच सुंदर दिसते.

परदेशातील चर्चेस्‌पेक्षाही जुने गोवे येथील चर्चेस खूपच सुंदर, स्वच्छ व आकर्षक आहे. शिवाय त्यांना प्राचीनतेचा वारसा लाभला आहे. येथील मंगेश, महालसा, शांतादुर्गा ही मंदिरे म्हणजे पर्यटकांचे श्रद्धास्थान. यांचे दर्शन घेतल्याशिवाय गोव्याचे पर्यटन पूर्ण होत नाही. सप्तकोटेश्वर मंदिराला शिवकालीन इतिहास आहे. छोटी-छोटी अशी अनेक मंदिरे गोव्यात पाहण्यासारखी आहेत. तिरुपती, मल्लिकार्जुन, दामोदर, अनंताचे, रामनाथी, महालक्ष्मी ही फोंड्याच्या आजूबाजूने असलेली मंदिरे स्वच्छ आणि आकर्षक आहेत. इथला दूधसागर धबधबा तर पर्यटकांचे खास आकर्षण आहे. तिथे जायला दोन मार्ग आहेत. पावसाळ्यानंतरचे त्याचे शुभ्रधवल फेसाळणारे रूप पाहायचे असेल तर रेल्वेने जावे लागते. बेळगावी जाणार्‍या रेल्वेतून हा नजारा अंगावर अक्षरशः काटा आणतो. दुसर्‍या मार्गाने या धबधब्याच्या मुळाशी जाता येते. येथे खूप सुंदर डोह आहे. तिथे जाण्यासाठी एक ट्रेलसारखा मार्ग आहे जो नदीतून, पाण्यातून, खडकांवरून, अरुंद मातीच्या रस्त्यावरून तुम्हाला घेऊन जातो. तो चित्तथरारक असा अनुभव देतो. तिथे आपले वाहन घेऊन जाता येत नाही. ओपन जीपमधून याचा अनुभव घेणे ही खूप आगळी-वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे गोव्यात आल्यावर दूधसागरला नक्कीच भेट दिली पाहिजे. लहान मुलांना प्राण्यांचे खूप आकर्षण असते. त्यांच्यासाठी बोंडला इथील पार्क आणि महावीर अभयारण्य आहे. तिथे आपण पिकनिक काढू शकतो. तांबडी सुर्ल येथे असलेले प्राचीन हेमाडपंथी दगडी शंकराचे मंदिरही पाहण्यासारखे आहे.

इथले समुद्रकिनारे तरुणांना आकर्षित करत असतात. इथल्या चित्तथरारक खेळ्यांचा अनुभव घेणे ही त्यांच्यासाठी एक पर्वणीच असते. कोलवा बीचवर चालणारे पॅरा ग्लायडिंग हे आकाशी उडायचे स्वप्न उराशी बाळगणार्‍यांसाठी आहे. उंच आकाशी पेरॅशूटमध्ये बसताना एक गाईड तुमच्यासोबत असतो. तो वार्‍याप्रमाणे दिशा निश्‍चित करून तुम्हाला आकाशाची सैर घडवून आणतो. पाण्यावरच्या सुसाट वेगाने जाणार्‍या बोटीला दोरीने बांधून आकाशी उडण्याचा खेळ खूपच थरारक असतो. बोट आणि त्यामागे उडत चाललेले तुम्ही असं ते दृश्य पाहून उरात धडकी भरते. पण हे सगळे तरुणांचे धाडसी खेळ.

कुटुंबासाठी दोनापावला येथे बोटिंग करता येते. तिथे हवेशी बोलणारी, पाण्यावर जणू तरंगते अशी बोट राईड असते. ती चालवणारा गाईड प्रशिक्षित असतो. त्याच्यामागे बिनधास्तपणे बसून तुम्ही आनंद घेऊ शकता. बनाना बोट राईड ही बनानाच्या आकाराची ट्यूब बोट तुम्हाला तीनचार जणांना फिरवून आणू शकते.

गोव्याला समुद्रकिनार्‍यांची देणगीच लाभली आहे. कोलवा बीच मडगावपासून जवळच आहे. तिथे पाण्यावरचे जेट स्कींग, बनाना बोट राईड, पॅरासेलिंग असे धाडसी खेळ खेळायला मिळतात. कुटुंबासोबत राहण्यासाठी येथे काही लोक घरेही भाड्याने देतात. जवळच असलेले अवर लेडी ऑफ मरसी चर्च पाहण्यासारखे आहे. तिथे असलेल्या बाल जीजसमध्ये आजार बरा करण्याची शक्ती आहे असे मानतात. दोनपावला हा खासकरून हनिमून ट्यूरिस्टसाठी एक लव्हर्स पॉईंट आहे. त्याबद्दल एक प्रेमकथाही सांगितली जाते. पोर्तुगीज व्हॉईसरॉयची मुलगी एका गोवन फिशरमॅनच्या प्रेमात पडली. तिच्या वडिलांनी या गोष्टीला विरोध केल्याने तिने या पॉईंटवरून समुद्रात उडी घेतली. ती गेल्यानंतर तिच्या वडिलांनी त्या जागेचे रूपांतरण करून तिथे एक सुंदर स्पॉट बनवला.
मोरजी किनार्‍यावर ‘सनबाथ’ घेणार्‍यांसाठी ‘सनबेड’ची सोय आहे. हे ठिकाण मिनी रशिया या नावानेही ओळखले जाते. तिथे रशियन लोक जास्त उतरत असल्याने रशियन रेस्टॉरंट्‌स आहेत. या किनार्‍यावर पक्षीप्रेमी लोकही येतात. येथे किंगफिशर वगैरे पक्षी येतात आणि किनारी कासवेही पाहता येतात. पाळोळी बिचवर पर्यटकांसाठी तात्पुरती उंच मचाणासारखी घरे बांधलेली आहेत. त्यांना ‘कोको हट्‌स’ म्हणतात. येथे झेन, योगा असे तत्त्वज्ञानावर वर्ग घेतले जातात. वाघातोर या बीचवर शॅक्स आहेत. शिवाय येथे नियतकालिकेही खरेदी करता येतात. गालजिबाग समुद्रकिनारा हा टर्टलबीच म्हणून ओळखला जातो. येथे खूप प्रमाणात कासवे दिसतात. ही कासवे त्यांच्या सीझनमध्ये किनारी अंडी घालण्यासाठी येतात. कोळव्याजवळ बाणावलीम हा बीच आहे. इथली पांढरीशुभ्र चमकदार वाळू हे या बीचचे आकर्षण आहे. शिवाय येथे डॉल्फिन शो पाहता येतो. त्यासाठी बोटीने समुद्राच्या जरा आत जावे लागते. कळंगुट बीच म्हणजे तर सगळ्या बीचांची राणी. येथेही खरेदीसाठी बर्‍याच गोष्टी असतात. येथील सेंट ऍलेक्स चर्च बघण्यासारखे आहे. हरमल बीच हा सनसेटसाठी प्रसिद्ध आहे. येथे योगा, ताईची, रेकी असे वर्ग चालतात. ट्युरिस्ट ते शिकू शकतात. येथे इंटरनॅशनल सर्फिंग स्कूल आहे. हणजुणा हा बीच फ्ली मार्केटसाठी प्रसिद्ध आहे. विदेशातील वस्तू येथे विकत मिळतात. आगोंदा किंवा पाळोळे या दोन्ही बीचवरून बोटीने बटर फ्लाय बीचकडे जाता येते. ते अर्धचंद्राकार आहे. असे अनेक समुद्रकिनारे आपल्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांमुळे प्रसिद्ध आहेत.

फोंड्याजवळील केरी गावात बरेच स्पाईस फार्म आहेत. येथे पर्यटकांना मसाल्याच्या झाडांविषयी माहिती मिळते. बिगफुट आणि जवळच असलेल्या प्राचीन गुंफा याही पाहण्यासारख्या आहेत. सांगे तालुक्यात नेत्रावळी येथे असलेली बुडबुड्याची गूढ तळी आहे. गोपीनाथ मंदिरासमोर असलेली ही चौकोनी तळी. त्यात मध्यभागी चौकोनी दगड, त्यावर एक त्रिशूल आणि नेत्रासारख्या खुणा आहेत. टाळी वाजवली की तळ्याच्या मुळातून बुडबुडे वर येऊ लागतात आणि आवाज येतो. हा ध्वनी म्हणजे विज्ञानाचा एक चमत्कार आहे. गावाजवळच ऊंच डोंगरावर चंद्रेश्वर भूतनाथ हे शंकराचे मंदिर आहे. मये इथे असलेले तळेही प्रेक्षणीय आहे. तिथे बोटिंग करता येते. येथे बदके, हंस, मोर यांसारखे पक्षी आपले लक्ष वेधून घेतात. येथील बोटी दोघांनी पायाने वल्हवायच्या आहेत. हरवळे या गावी असलेला धबधबा पावसाळ्यात अगदी उफाळून वाहत असतो. त्याचे अंगावर तुषार घेणे हा एक रोमांचक अनुभव असतो. जवळच शंकराचे प्राचीन देवालय आहे.

उत्तर गोव्यातील आग्वादचा किल्लाही प्रेक्षणीय आहे. येथे बर्‍याच सिनेमांचे चित्रीकरण केले गेले आहे. तेथील दीपगृहही पाहायला मिळतो. गोव्याचं इंटिरिअर पाहायचं असेल तर एखाद्या गावातून कौलारू घरांच्या, नारळी-पोफळीच्या बागांतून, छोट्या-छोट्या तळीच्या किनारी असलेल्या पक्ष्यांच्या थव्यातून, हिरव्यागार वार्‍याबरोबर लवलवणार्‍या भातशेतीतून चक्कर मारली पाहिजे. येथेच खर्‍या गोव्याची ओळख होते. इथल्या शांत, निरव वातावरणात मनाला प्रसन्नता लाभते.

सतत चार-पाच महिने कोरोनाच्या काळात गोव्यातील पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता. त्याचा मोठा फटका राज्याच्या अर्थव्यवस्थेला बसला. पण पर्यटकांमुळे कोरोनाचा प्रसार आणि प्रादुर्भाव वाढू शकतो ही भीती मनात असतानाही त्या व्यवसायाला गती मिळवून देण्यासाठी काही तत्त्वे ठरवून दिली गेली व त्यानुसार पालन करत पर्यटन सुरू करावे असे सरकारने ठरवले. कोरोना काळात येथील हॉटेलं, रेस्टॉरंट्‌स बंद पडल्याने त्या व्यवसायाशी निगडीत लोकांसमोर पोटापाण्याचा प्रश्न उभा राहिला. वेटर्स, शेफ, हॉटेल मॅनेजर, कुक सर्वांच्याच पोटावर पाय आला. अशा शून्य कमाईवर किती दिवस तग धरणार? त्यासाठी मग नाईलाजस्तव पर्यटकांवर काही बंधने घालून येथे येण्यास मुभा दिली गेली. आणि हळूहळू पर्यटक गोव्यात यायला सुरुवात झाली. नाताळच्या वेळी तर गोवा पर्यटकांनी तुडुंब भरून गेला होता. राज्यात कोरोनाची धास्ती वाटत असतानाही नाताळ सणाच्या साजरीकरणात कुठेही कमतरता दिसली नाही. नाताळ आणि नववर्षाचे औचित्य साधून पर्यटकांनी गोव्यात मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली. समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून गेले होते.

यंदा विदेशी पर्यटकांनी पाठ फिरवल्याने गोव्याच्या पर्यटन व्यवसायात निराशा पसरली होती; पण देशी पर्यटकांच्या येण्याने थोडी कमी झाली. सुरुवातीचे सहा-सात महिने हातावर हात ठेवून बसलेले उद्योजक कामाला लागले. येणारे पर्यटक त्यांचे आशेचे किरण बनले.
महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, राजस्थान, केरळ वगैरे बहुतेक सगळ्या आजूबाजूच्या राज्यांतून पर्यटक आपापल्या गाड्या घेऊन गोव्यात दाखल झाले. गाड्यांची संख्या अचानक वाढल्याने पार्किंगचा प्रश्‍न उभा राहत होता. त्यामुळे ‘ट्राफिक जाम’चा अनुभव जिथे-तिथे येऊ लागला. सध्या मोठमोठी हॉटेल्स, लॉजेस, रेस्टॉरंटस् खचाखच भरली आहेत. खाणार्‍यांबरोबर पिणार्‍यांचीसुद्धा गोव्यात चंगळ होत असते. कारण त्यांना ते खिशाला परवडणार्‍या किमतीत उपलब्ध असते. त्यामुळे बर्‍याच पर्यटकांसाठी हेही एक आकर्षण ठरते.

येणारे पर्यटक जरी पैसे खर्च करायला, मौजमजा करायला आले असले तरी बर्‍याच ठिकाणी त्यांना लुबाडण्याचे प्रकारही होतात. या गोष्टीमुळे गोव्याची प्रतिमा खराब होऊ शकते. येथे आलेल्या प्रत्येकाला पुन्हा पुन्हा यावेसे वाटले पाहिजे यादृष्टीने आपण त्यांच्याशी व्यवहार ठेवला पाहिजे. गोवा पर्यटन खात्याने नवनवीन घोषणा करून लोकांना येथे येण्यास उद्युक्त केले पाहिजे. पर्यटनाचे नवीन पर्व सुरू झालेय असे समजून त्यात सुधारणा करत ते जास्तीत जास्त लोकाभिमुख कसं होईल ते पाहिले पाहिजे. तरुण पिढीला अशा उद्योगात सामील करून घेतलं पाहिजे.

कोरोना आला आणि त्याने सगळ्यात आधी बळी घेतला तो पर्यटन व्यवसायाचा. लॉकडाऊनमुळे कुणीच, कुठेच प्रवास करू शकत नव्हते. आपल्या देशात निदान स्थानिक पर्यटनावरची बंदी तरी शिथिल केली गेलीय, पण परदेशात अजूनही ती चालूच आहे. कारण तिथे कोरोना अजूनही आटोक्यात येण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. खरे तर विदेशातून येणार्‍या लोकांकडून पर्यटन व्यवसायाला खरा फायदा होत असतो. आपण पर्यटनासाठी लागणार्‍या मूलभूत सुविधांत वाढ केली पाहिजे. नवीन नवीन योजना राबवून पर्यटक आपल्याकडे कसे आकर्षित होतील हे पाहिले पाहिजे. त्यामुळे देशी आणि विदेशी पर्यटकांची संख्या वाढेल आणि अर्थव्यवस्थेला बळकटी येईल. या संकटाच्या तडाख्यातून लवकरच सगळ्यांची सुटका व्हावी आणि जनजीवन पुन्हा पूर्वपदावर येवो, अशी आशा मनात धरून पुढे पुढे चालत राहायचे. सध्या एव्हढेच आपल्या हाती आहे.

STAY CONNECTED

848FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

चैत्रगौरी हळदीकुंकू ः निसर्गपूजा

सौ दीपा जयंत मिरींगकर(फोंडा) गौरीला माहेरपण करणे हे एक निमित्त. निसर्गातील फळाफुलापानांचे रंग, रूप, चवी अनुभवायला आणि लेकीबाळींना...

कालमापनाचे साधन ः ‘पंचांग’

सुमरंग रायसालसेत आम्ही वर्ष, महिना, वार, दिवस जसं लक्षात ठेवतो, तसं पंचांग लक्षात ठेवायला त्रास नाही. ग्रहणाची वेळच सांगते की आमचं पंचांग...

असे व्हायला नको होते, पण…

ज. अ. रेडकर(सांताक्रूझ) ‘‘कुठेही गेले तरी आता पैसे दिल्याशिवाय नोकरी मिळत नाही सर, तेव्हा माझा नाइलाज आहे, निदान...

आईची माया

प्राजक्ता गावकर ‘‘आईची मायाच तशी असते ग पोरी.’’ अपघातात आई गेली पण तिच्या मनात तुला आणि बाळाला पाहायचे...

टॅक्सीचालकांनी संप मागे घेत चर्चेसाठी पुढे यावे ः मुख्यमंत्री

राज्यातील टुरिस्ट टॅक्सीचालकांनी आपला संप मागे घेऊन चर्चेसाठी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांच्या एका प्रश्‍नावर बोलताना काल...

ALSO IN THIS SECTION

वाया (न)गेलेले एक वर्ष

डॉ. मधू स. गा. घोडकीरेकर नाव ‘कोविड-१९’ असले तरी या विषाणूने सन २०२० वर एकतर्फी राज्य केले. हे...

निर्णायक लढाईची वेळ

दत्ता भि. नाईक अतिशय घनदाट जंगलांत माओवाद्यांना शस्त्रे कोण पुरवतो याची कसून चौकशी झाली पाहिजे. अग्निशेष, ऋणशेष आणि...

बदलते बँकिंग क्षेत्र

शशांक मो. गुळगुळे मोबाईलने जसे मनगटावरचे घड्याळ घालविले, कॅमेरे गळ्यात घालून फिरणे घालविले तसेच ग्राहकांना बँकेपर्यंत जाण्याचा त्रास...

ऋतुराज आज वनी आला…

मीना समुद्र हा उदारात्मा वसंत चेतोहर, मनोहर असतो. त्यामुळेच त्याला ‘ऋतुराज’ ही पदवी बहाल झालेली आहे. चैत्रातले त्याचे...

दर्यादिल राजकारणी

वामन सुभा प्रभू(ज्येष्ठ पत्रकार) २२ मार्च रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास माझ्या मोबाईलवर झळकलेला हा संदेश मागील सहा-सात दिवसांत...