Home बातम्या परग्रहावरील जीवसृष्टीचे गूढ उकलणे दूरच : डॉ. नारळीकर

परग्रहावरील जीवसृष्टीचे गूढ उकलणे दूरच : डॉ. नारळीकर

0
यासंबंधी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, ब्रह्मांडात काही ग्रह पृथ्वीपासून एवढे प्रचंड दूर आहेत की पृथ्वीवरील वैज्ञानिक प्रकाशाच्या वेगाने प्रवास करू शकेल असे अवकाशयान घेऊन जरी तेथे जायला निघाले, तरी तेथे जाण्यास त्यांना लाखो वर्षे लागतील. त्यामुळे अशा परग्रहांवर जाऊन तेथे जीवसृष्टी आहे की काय याचा शोध घेणे ही केवळ अशक्यप्राय अशी गोष्ट असल्याचे डॉ. नारळीकर यांनी नमूद केले.

परग्रहावर जीवसृष्टी आहे की काय याचा शोध घेण्याचे काम अखंडितपणे चालू आहे व अवकाश संशोधनात होत असलेल्या प्रगतीमुळे जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठीच्या कामातही प्रगती होऊ लागली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
परग्रहांवर जीवसृष्टी आहे की काय याचा शोध घेण्यासाठी आता रेडिओ संदेश पाठवण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली व सर्वांत जवळच्या परग्रहावरून या संदेशाचे उत्तर येण्यास साडेआठ वर्षे लागू शकतील, पण त्यासाठी त्या परग्रहावर जीवसृष्टी असावी लागेल व संदेशाला प्रत्युत्तर देण्याएवढा विकास तेथील मानवजातीने साधलेला असावा लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
ब्रह्मांड असे आहे
तत्पूर्वी ब्रह्मांड कसे आहे, त्याची रचना कशी आहे यासंबंधी माहिती देताना ते म्हणाले की, पृथ्वीच्या जवळ आहे ती ग्रहमाला (सोलर सिस्टिम), नंतर आहे ती आकाशगंगा (गॅलेक्सी), नंतर आहे तो आकाशगंगांचा स्थानिक समूह (लोकल ग्रुप ऑफ गॅलेक्सीस), नंतर आहे तो आकाशगंगांचा दाट समूह (क्लस्टर ऑफ गॅलेक्सीस) व त्यानंतर आहे तो आकाशगंगांचा महासमूह (सुपर क्लस्टर ऑफ गॅलेक्सीस), शंभर वर्षांपूर्वी यापैकी अर्ध्या गोष्टींचीही शास्त्रज्ञाना माहिती नव्हती असे सांगून यापुढे आकाशासंबंधीच्या आणखीही काही नव्या गोष्टींचा त्याना शोध लागू शकेल, असे ते म्हणाले. मात्र, सर्वांत मोठे आव्हान आहे ते आपण कल्पनाही करू शकत नाही एवढ्या दूरवर असलेल्या ग्रहांवर जाऊन जीवसृष्टीचा शोध कसा घ्यायचा याचे. अवकाशात जीवजंतू आहेत की काय हे जाणून घेण्यासाठी काही वर्षांपूर्वी कसा प्रयोग करण्यात आला होता व ४५ हजार कि. मी. वर कसे सूक्ष्म जीवजंतू सापडले होते याची माहितीही त्यानी यावेळी दिली. इस्रोने केलेल्या या प्रयोगात १२ नव्या प्रकारचे सूक्ष्म जंतू सापडले होते. त्यापैकी तीन प्रकारचे सूक्ष्मजंतू हे पूर्णत: माहिती नसलेले असे होते. त्यापैकी एका जीवजंतूला आर्यभट यांचे नाव, एकाला इस्रोचे नाव तर अन्य एकाला होयले या शास्त्रज्ञाचे नाव देण्यात आले होते, अशी माहिती त्यानी दिली. भारताने केलेल्या या प्रयोगात पृथ्वीबाहेरील वातावरणात ४५ हजार कि. मी. अंतरावर हे जीवजंतू सापडले होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

ज्ञानकक्षा वाढविण्यासाठी शोध आवश्यक

परग्रहावर जीवसृष्टी आहे की काय याचा शोध घेण्याची आवश्यकताच काय असा प्रश्‍न एका विद्यार्थीनीने विचारला असता, आमच्या ज्ञानकक्षा वाढवण्याच्या दृष्टीने त्याचा उपयोग होऊ शकेल तसेच परग्रहावर जर आमच्यापेक्षा हुशार अशी मानवजात असेल तर त्याचा आमच्या विकासासाठीही आम्हाला फायदा होऊ शकेल, असे मत त्यानी व्यक्त केले. रसिकानी विचारलेल्या अन्य कित्येक प्रश्‍नाचीही त्यांनी यावेळी उत्तरे दिली.