पदपथांवरील अतिक्रमणामुळे स्मार्ट सिटीच्या कामास विलंब

0
14

कार्यकारी अधिकारी संजित रॉड्रीगिस यांची माहिती

पणजी महानगरपालिका क्षेत्रात रस्त्याच्या कडेला आणि पदपथांवर झालेल्या अतिक्रमणांमुळे स्मार्ट सिटीच्या कामांना विलंब होत आहे, असा दावा पणजी स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजित रॉड्रीगिस यांनी काल केला.
पणजी महानगरपालिका क्षेत्रातील सांतइनेज व आसपासच्या भागात स्मार्ट सिटीअंतर्गत विकासकामे करताना खासगी जागेत अतिक्रमण केल्याची तक्रार काहीजणांनी केली होती. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी रॉड्रीगिस यांनी महानगरपालिकेचे महापौर रोहित मोन्सेरात व अधिकाऱ्यांसमवेत स्मार्ट सिटीच्या सांतइनेज भागातील कामाची काल गुरूवारी पाहणी करून आढावा घेतला.

स्मार्ट सिटीचे काम पूर्ण करण्यासाठी 31 मे 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे कामांना गती दिली जात असताना स्मार्ट सिटीच्या कामांना काही ठिकाणी अतिक्रमणामुळे विलंब होत आहे. अतिक्रमण हटविण्यासाठी भरपूर प्रयत्न करावे लागत आहेत. पदपथ हे दुकानदारांसाठी नसून पादचाऱ्यांसाठी असल्याने त्यांच्यावर दुकानदारांवर कारवाई करण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. स्मार्ट सिटीच्या कामात अडथळा येणाऱ्या ठिकाणी तोडगा काढण्याचे काम केले जात आहे, असे महापौर रोहित मोन्सेरात यांनी सांगितले.