नोकरीचे आमिष दाखवत 18 जणांना 31 लाखांचा गंडा

0
2

पोलिसांकडून दोघांविरोधात गुन्हा दाखल

सरकारी नोकरीचे आमिष दाखवून 18 जणांना सुमारे 31 लाख रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी आगशी पोलिसांनी जास जॉनी डिकॉस्टा (सासष्टी) आणि ज्वेन्सी रिचर डायस (कुडतरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगशी येथील आल्टन सिल्वेरा याने फसवणूकप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. दोघाही संशयितांनी संपर्क साधून सरकारच्या विविध खात्यांत नोकऱ्या उपलब्ध असल्याची माहिती देऊन संपर्क साधण्याची सूचना केली. सरकारी नोकरीसाठी ठरावीक रक्कम द्यावी लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले. तक्रारदार युवकाने त्याच्या ओळखीच्या काहीजणांना ही माहिती दिली. त्यानंतर 18 जणांनी सुमारे 31 लाख रुपये गोळा करून संशयितांना दिले. नोकरीबाबत संशयितांकडे अनेकदा विचारणा करण्यात आली. पण, त्यांना नोकऱ्या देण्यात आल्या नाहीत, असे तक्रारीत म्हटले आहे.

बँक कर्मचारी भासवून खातेदारास फसवले

बँक कर्मचारी असल्याचे भासवून एका खातेदाराला सुमारे 1 लाख 20 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी जुने गोवे पोलीस स्थानकावर तक्रार दाखल करण्यात आली आहे. संशयित संदीप शर्माच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित संदीप शर्मा याने ॲक्सेस बँकेच्या एका खातेदाराशी संपर्क साधून आपण बँक कर्मचारी असल्याचे भासवून केवायसी अपडेट करण्यासाठी खातेदाराकडून सर्व माहिती घेऊन गंडा घातला.