चुकीच्या जागी वाहने पार्क करणार्यांची वाहने उचलण्याचे काम ज्या चार कामगारांना देण्यात आले होते त्या कामगारांना काल आयुक्ताने दुसरे काम करण्यास सांगितले असता त्यांनी ते करण्यास नकार दिल्यानंतर आयुक्ताने त्यांना कथित शिवी दिल्याच्या निषेधार्थ कामगारांनी काल दुपारपासून संप पुकारला.
वाहतूक पोलीस ल्युसोफोनियासाठीच्या कामात मग्न असल्याने सध्या चुकीच्या जागी पार्क करून ठेवण्यात येणारी वाहने उचलण्याचे काम बंद आहे. त्यामुळे पोलिसांना ही वाहने उचलण्यास मदत करणार्या या कामगारांना आयुक्तानी अन्य कामाकडे वळवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी ते करण्यास नकार दिला व आयुक्तानी शिवीगाळ केल्याचा दावा करून संप पुकारला. दरम्यान, महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी संपाचा निषेध करताना कामगाराना कुठल्याही कामाचा आदेश देण्याचा अधिकार आयुक्ताना आहे. त्यांना विविध काम नेमून देण्यात आले नसल्याचे ते म्हणाले. दरम्यान, महापालिका क्षेत्रातील साफसफाईच्या कामाचे आउटसोर्सिंग करण्याबाबत महापालिका गंभीरपणे विचार करीत असल्याचे फुर्तादो म्हणाले.