मसाज पार्लर्सवर छापे
कळंगुट भागातील काही ठिकाणी चालू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाल्याची घटना ताजी असतानाच पणजीतही अनैतिक व्यवहार चालत असल्याचे उघड झाले आहे. पणजी पोलिसांनी काल येथील काही मसाज पार्लर्सवर छापे मारले. त्यातून हे स्पष्ट झाले आहे.
पणजीचे उपविभागीय पोलीस अधीक्षक उमेश गावकर यांनी काल रात्री उशिरा घेतलेल्या पत्रकार परिषदेत या सेक्स रॅकेट विषयी माहिती दिली. त्यानुसार सांतइनेज येथील लानेद स्पा सलून व मार्केटनजीकच्या लिलावती स्पा या पार्लरवर छापे टाकण्यात येऊन तेथील एकूण सात तरुणींची सुटका करण्यात आली. या सर्वजणी थायलंडच्या आहेत. त्या २२ ऑगस्ट रोजी गोव्यात पर्यटक व्हिसावर आल्या होत्या. त्यांच्या व्हिसानुसार त्यांना नोकरीस प्रतिबंध होता. असे असूनही त्यांना मसाज पार्लरवर गुंतविण्यात येऊन अनैतिक व्यवहारासाठी वापर करण्यात येत होता असे गावकर यांनी सांगितले. याप्रकरणी लानेद स्पा सलूनचा मालक एल्टन फुर्तादो याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उमेश गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पणजी पोलीस निरीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई, जुने गोवे पोलीस निरीक्षक मनोज म्हार्दोळकर यांनीही या कारवाईत भाग घेतला.