पणजीचा टाहो

0
5

राजधानी पणजीचे नरकपुरीत रूपांतर करून कामे अर्धवट स्थितीत सोडलेल्या स्मार्ट सिटी योजनेची सूत्रे आता स्वतः मुख्यमंत्र्यांना हाती घ्यावी लागलेली दिसतात. गेल्या काही दिवसांत त्यांनी लागोपाठ दोन पाठपुरावा बैठका घेतल्या. तरीही समाधान न झाल्याने अर्धवट राहिलेल्या कामांची त्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून पाहणी केली आणि ही कामे पावसाळ्यात बंद न ठेवता सुरूच ठेवण्याचे आदेशही जारी केले. या योजनेचे सुकाणू ज्या ‘इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेड’ या पूर्णतः सरकारी मालकीच्या स्पेशल पर्पज वेहिकल कंपनीकडे आहे, तिच्या सीईओपदी संजित रॉड्रिग्स यांच्यासारख्या अनुभवी अधिकाऱ्याला आणले गेले आहे. या सगळ्या प्रयत्नांतून पणजी शहराला सध्या आलेले गलीच्छ आणि ओंगळ स्वरूप दूर होईल आणि मांडवीच्या काठावरचे हे शहर पूर्वीप्रमाणे झळाळू लागेल अशी आशा आहे. काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शहरे आधुनिक बनवण्याचे उद्दिष्ट ठेवून स्मार्ट सिटी योजना जाहीर केली. पहिल्या पाच वर्षांत त्यावर 48 हजार कोटी खर्च करण्याची तरतूदही केली. देशातील प्रमुख शहरे त्यासाठी टप्प्याटप्प्याने निवडली गेली. सुदैवाने गोव्याच्या राजधानी पणजीचाही त्यात समावेश झाला. अठरा हजार नागरिकांनी उत्साहाने त्यासाठी विविध सूचना सरकारला केल्या होत्या, परंतु ज्या गतीने आणि कार्यक्षमतेने हे काम व्हायला हवे होते ते झाले नाही. पराकोटीच्या सुशेगादपणाने ते वर्षानुवर्षे रेंगाळत गेले. शेवटी पणजीची स्मार्ट सिटी योजना गुंडाळण्याची आणि त्यासाठी आलेला निधी परत नेण्याची तंबी जेव्हा केंद्राकडून मिळाली, तेव्हा कुठे कामाला वेग आला. मग घाईगडबडीने एकाचवेळी सर्वत्र खोदकाम काय हाती घेण्यात आले, मलनिःस्सारण वाहिन्यांची आणि काँक्रिट रस्त्यांची कामे काय सुरू झाली, या सगळ्या धावाधावीत पणजीची पूर्ण वाताहत करून सोडली गेली. पणजीकरांनी विलक्षण संयमाने हा सगळा त्रास गेले कित्येक महिने सहन केला, परंतु बघता बघता प्रकरण गळ्याशी आले. पणजीला स्मार्ट बनवण्याच्या नावाखाली सध्या पोर्तुगीजकालीन सांडपाणी निचरा व्यवस्थेची पूर्ण वाताहत करून सोडली गेली आहे. त्यामुळे सर्वत्र जमिनीखालील या सांडपाणी वाहिन्या तुंबल्या आहेत आणि त्यातून सांडपाणी भरून वाहते आहे. उद्या जेव्हा पहिला पाऊस येईल, तेव्हा हे सगळे घाण पाणी पणजी शहराच्या रस्त्या-रस्त्यांवरून वाहू लागलेले दिसेल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कितीही दिलासा देण्याचा प्रयत्न केला असला, तरी येत्या पावसात आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे याबाबत पणजीवासीय साशंक आहेत आणि त्यांची भीती मुळीच अनाठायी नाही.
मध्यंतरी सरकारने पावसाळ्यापूर्वी स्मार्ट सिटीची कामे तूर्त स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आणि कंत्राटदारांनी कामे अर्धवट सोडून आपल्या यंत्रसामुग्रीसह गाशा गुंडाळला. रस्त्यांवर तात्पुरती डागडुजी करून कामे पूर्ण होत आल्याचा आभास सध्या निर्माण केला गेला आहे, परंतु जमिनीखालून वाहणाऱ्या सांडपाण्याला त्याद्वारे अडवता आणि दडवता येणार नाही. येत्या पावसाळ्यात ते आपला प्रताप दाखवील. त्यामुळे आता येत्या पावसाळ्यातही मलनिःस्सारण वाहिन्यांची आणि रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे सुरू ठेवण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला आहे. सध्या पणजीच्या रस्तोरस्ती जी दुर्गंधी पसरलेली दिसते, ती जमिनीखालील पोर्तुगीजकालीन निचरा व्यवस्थेची विल्हेवाट लागल्याची आणि त्यामुळे ठिकठिकाणी सांडपाणी तुंबले असल्याची निदर्शक आहे. सांतिनेज खाडीचे आज मोठ्या गटारात रूपांतर झालेले दिसते आहे. त्यात त्याच्या काठांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे उभी ठाकली आहेत. पणजीच्या उपनगरांमध्ये अक्षरशः शेतजमिनींमध्ये प्रचंड मोठे गृहप्रकल्प उभे राहत आहेत. या सगळ्यातून एक विरूप, विद्ध्वंसक चित्र समोर उभे आहे. अर्धवट, अपूर्ण कामांमुळे पणजी स्मार्ट बनणे तर दूरच, या मूळच्या सुंदर शहराला सध्या अवकळा प्राप्त झाली आहे. पणजी शहराचा समावेश स्मार्ट सिटी योजनेत झाला तेव्हा आम्ही अग्रलेखात म्हटले होते, ‘पणजी स्मार्ट बनवायची असेल तर ते सर्वांचे सामायिक स्वप्न बनायला हवे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्याच्या प्रत्येक पावलामागे प्रामाणिकपणा हवा. सार्वजनिक जीवनातील या प्रामाणिकपणाची उणीवच आपल्या देशात स्वप्नांना उद्ध्वस्त करून जात असते. त्यामुळे ही प्रामाणिक कार्यसंस्कृती रुजल्याविना स्मार्ट सिटी प्रत्यक्षात अवतरणे शक्य नाही!’ आज त्याच प्रामाणिकपणाची पणजी शहराला नितांत गरज आहे. स्मार्ट सिटीच्या कामांमध्ये पारदर्शकता गरजेची आहे. ही सारी कामे वेगाने जरूर झाली पाहिजेत, परंतु त्यांना गुणवत्ताही हवी.