पक्षाघात आणि आयुर्वेद उपचार

0
2406

– कांता जाधव भिंगारे (आयुर्वेद तज्ज्ञ)
सर्वसामान्य भाषेत अंगावरून वारे जाणे म्हणजे पक्षाघात होय. याला बरीच पर्यायी नावे आहेत, जसे पक्षवध, पक्षाघात, एकांगवात, एकांगरोग, अर्धांगवात किंवा अर्धांगवायू. ही सर्व समान नावे आहेत. विशेषतः वृद्धापकाळात होणारा हा वातविकार असून मोठ्या कष्टाने बरा होणारा किचकट व्याधी आहे. यात शरीराच्या अर्ध्या भागामध्ये वैफल्य येणे, लकवा मारणे, शरीराचा अर्धा भाग लुळा पडणे इ. लक्षणे दिसून येतात. त्यालाच आपण अर्धांगवायू किंवा पक्षाघात असे म्हणतो. यात संपूर्ण शरीराच्या डाव्या किंवा उजव्या बाजूचे अंग पूर्णतः किंवा अंशतः निष्क्रिय होते. परिणामी त्या बाजूच्या हालचाली पूर्णपणे नष्ट होतात म्हणजेच त्या भागातील कर्मेंद्रियांची हानी होते आणि हेच पक्षाघाताचे प्रमुख लक्षण समजले जाते. खरं तर आजकालच्या वेगवान व धकाधकीच्या जीवनात माणसाला सतत ताणतणावांना सामोरे जावे लागते त्यामुळे त्याला कमी वयातच रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार या तीन प्रमुख रोगांनाही सामोरे जावे लागत आहे. या तिन्ही घातक व्याधींचे वेळीच निदान व चिकित्सा न झाल्यास पुढे या रोगांचा दुष्परिणाम म्हणून पक्षाघाताची संभावनाही वाढत आहे. आयुर्वेद शास्त्रानुसार पक्षाघात हा वार्धक्यात होणारा वातविकार असून वाताच्या दुष्टीने तो होतो. म्हणजेच वातवहनाडी संस्थानाला (नर्व्हस सिस्टीम) आघात झाल्याने पक्षाघाताची लक्षणे निर्माण होतात. अनियंत्रित उच्चरक्तचाप, अनियंत्रित मधुमेह (डायबिटीज), हृदयरोग (ब्लॉकेजेस) इ. कारणांनी मेंदूकडे जाणार्‍या रक्तवाहिन्यात अडथळा निर्माण होतो. अतिरिक्त दाबामुळे तेथील सूक्ष्म रक्तवाहिन्या फुटतात किंवा संकोचतात त्यामुळे मेंदूच्या कार्यात अडथळा निर्माण होतो. वारंवार हीच स्थिती निर्माण होत राहिल्यास पुढे पक्षाघातासारखी समस्या निर्माण होते.
पक्षाघाताचे आधुनिक प्रकार :
आधुनिक वैद्यकशास्त्रात पक्षाघात हा अंगघाताचा (पॅरालिसीस) एक प्रकार मानले आहे. अज्ञावह नाडीच्या (सेंसरी नर्व्हज्) विशिष्ट स्थानातील विकृतीनुसार पक्षाघाताचे चार विभागात वर्गीकरण केले आहे. तेही जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.
१) एकांगवात (मोनोप्लेजिया) :
मेंदूतील सेरेब्रल कॉर्टेक्समध्ये विकृती उत्पन्न झाल्याने या प्रकारचा एकांगवात होतो. या ठिकाणातील नाडीतंतू हे एकमेकांपासून बरेच दूर असल्याने विकृतीचा परिणाम हा कमी ज्ञानतंतूंवर होतो आणि म्हणून एकांगवात निर्माण होतो. या रोगामध्ये स्नायुपेशी शिथिल होतात त्यामुळे यास फ्लॅसिड टाइप पॅरालिसीसदेखील म्हणतात.
२) पक्षाघात किंवा अर्धांगवात (हेमिप्लेजिया) :
मेंदूच्या सेरेब्रल कॉर्टेक्समधून निघालेले नाडीतंतू इंटरनल कॅप्सूलमध्ये जाऊन नंतर तेथून बाहेर पडतात. या ठिकाणी नाडीतंतू हे एकमेकांच्या अगदी जवळ असतात. त्यामुळे या स्थानाची विकृती झाल्यास शरीराच्या डाव्या किंवा उजव्या भागातील प्रत्येक अंगाचा घात होणे हे लक्षण र्माण होते. हा घात स्तंभयुक्त (स्पास्टिक पॅरालिसीस) प्रकारचा असतो. मुखप्रदेशी याचा प्रभाव दिसत नाही. मात्र हात व पाय या कर्मेंद्रियांवर याचा प्रभाव पडतो. नाडीतंतू हे सुषुम्ना शिर्ष (मेड्युला ऑब्लॉंगाटा)मध्ये आल्यावर एकमेकांस क्रॉस करून दिशा बदलतात. म्हणजेच डाव्या बाजूचे तंतू उजवीकडे व उजव्या बाजूचे तंतू डावीकडून जातात. यामुळेच पक्षाघाताची लक्षणे ही मेंदूच्या विरुद्ध बाजूस व्यक्त होतात. म्हणजेच मस्तिष्कातील उजव्या बाजूच्या तंतूंना आघात झाल्यास शरीराची डावी बाजू लुळी पडते तर डाव्या बाजूच्या तंतूंना आघात झाल्यास शरीराची उजवी बाजू लुळी पडते.
* या प्रकारचा पक्षाघात हा विशेषतः वृद्धावस्थेत अधिक प्रमाणात होताना आढळतो कारण म्हातारपणी शरीरावर वाताचे प्राबल्य अधिक असते. इतर कारणांमध्ये धमनी काठिण्य (आर्टरिओस्लेरोसीस), मस्तिष्कावरण शोथ (मेनिंजायटीस), मस्तिष्कार्बुद (ब्रेन ट्यूमर), मस्तिष्काघात म्हणजे डोक्याला मार लागणे किंवा डोक्यावर पडणे इ. सर्व कारणांनी मेंदूतील रक्तवाहिन्यांवर दाब पडून रक्तपुरवठा थांबतो व पक्षाघाताची निर्मिती होते.
३) सर्वांगघात (डायप्लेजिया) :
हा एक सहज म्हणजे जन्मजात व्याधी आहे. जन्मतःच अशा प्रकारची विकृती बालकामध्ये आढळून येते. गर्भात असतानाच बालकाच्या मेंदूची वाढ नीट न झाल्याने हातापायांची वाढही नीट होत नाही. ते लुळे पडतात. त्यामुळे मूल उभेही राहू शकत नाही. याला वैद्यकीय भाषेत ‘कन्जेनायटल स्पास्टिक पॅरालिसीस’ म्हणतात.
४) अधरांगघात (पॅराप्लेजिया) :
हा व्याधी अप्पर मोटर न्यूरॉन किंवा लोअर मोटर न्यूरॉन यांपैकी कुठलाही असू शकतो. यात सेरेब्रल कॉर्टेक्समध्येच विकृती निर्माण होते. पोलिओमायलायटीस, टॅब्ज डॉर्सालिस या रोगातही पॅराप्लेजिया हे लक्षण आढळते.
पक्षाघाताची कारणे :
कारणांनुसार पक्षाघात हा दोन प्रकारे उद्भवतो.
१) अचानक (सडन ऑनसेट) २) सावकाश (स्लो)
अचानक होणार्‍या पक्षाघाताला पुढील कारणे जबाबदार असतात.
मेंदूगत रक्तस्राव – यातही एखाद्या मस्तिष्कगत संसर्गामुळे मेंदूला सूज येऊन रक्तस्राव होणे, एखाद्या बाह्य आघाताने मेंदूत रक्तस्राव होणे, विषबाधा होऊन मेंदूत रक्तस्राव होणे, अर्बुद किंवा ट्यूमरमुळे रक्तस्राव होऊन अचानक पक्षाघात निर्माण होतो.
काही शस्त्रक्रिया करताना त्या दरम्यानदेखील पक्षाघात होण्याची शक्यता असते. जसे हृदयावरील शस्त्रक्रिया, छातीच्या भागातील शस्त्रक्रिया, मानेची शस्त्रक्रिया इ.
मस्तिष्कावरण शोथ (मेनिंजायटीस), युरेमिया, हिस्टेरिया इ. व्याधीत अचानक पक्षाघात होतो.
२) सावकाश होणार्‍या पक्षाघाताला पुढील कारणे ही जबाबदार असतात.
मस्तिष्कगत अर्बुद(सेरेब्रल ट्यूमर), मस्तिष्कगत गुल्म(सेरेब्रल ऍब्सेस).
दीर्घकाळपर्यंत मेंदूच्या आवरणात रक्ताची गाठ असणे.
आयुर्वेद शास्त्रानुसार पक्षाघाताचे ३ प्रकार सांगितले आहेत व त्या प्रकारावरून चिकित्सा भिन्न प्रकारची असते.
१) वातानुबंधी २) पित्तानुबंधी ३) कफानुबंधी हे तीन प्रकार असून यातील वातानुबंधी हा असाध्य तर पित्तानुबंधी व कफानुबंधी हे कष्टसाध्य आहेत.
पक्षाघातावरील उपचार :
अचानक निर्माण होणार्‍या पक्षाघातात लक्षणे दिसताच रुग्णाला कुठल्याही प्रकारची हालचाल करण्यास सांगू नये व तात्काळ रुग्णालयात दाखल करावे.
रुग्णालयात नेईपर्यंत रुग्ण घरी शुद्धीवर असल्यास तोंडावाटे सर्पगंधा चूर्ण १ ग्रॅम मध अथवा तुपातून चाटण द्यावे.
रुग्णालयातून घरी आणल्यानंतर हातापायाची ताकद पूर्ववत होण्यासाठी खालील उपचार सुरू करावेत.
दररोज सकाळी महानारायण तेल किंवा शतावरी सिद्ध तेलाचा शास्त्रोक्त मसाज करून कोमट पाण्याचा टब-बाथ द्यावा.
पक्षाघातामध्ये बाह्यस्नेहन, संवाहन आणि स्वेदन हे पंचकर्मातील उपचार अतिशय उपयुक्त ठरतात.
बला तेल, नारायण तेल इ. तेलाने संवाहन(मसाज) करून त्यानंतर संपूर्ण शरीरास बाष्पस्वेद द्यावा.
बाष्पस्वेदासाठी निर्गुंडीपत्रकाढा, दशमूळ काढा, एरंडमूळ काढा इ.पैकी जो उपलब्ध असते त्याने स्वेदन(स्टीम) करावे.
पंचकर्मातील ‘बस्तिचिकित्सा’ सुद्धा पक्षाघातात अत्यंत उपयुक्त ठरणारा उपक्रम आहे मात्र तो वैद्याच्या सल्ल्याने व तज्ञांच्या देखरेखीमध्येच करणे महत्त्वाचे आहे. यात वेगवेगळ्या प्रकारचे औषधी काढे व त्यात योग्य प्रमाणात तिळाचे तेल एकत्रित गरम करून विशिष्ट प्रकारच्या बस्ती यंत्राने रुग्णाच्या गुदद्वारावाटे देण्यात येतात.
इंद्रियांना बलप्राप्त व्हावे यासाठी नस्यकर्म लाभदायी ठरते. षड्‌बिंदूतैल हे नस्यासाठी विशेष उपयुक्त असते. या तेलाचे कोमट थेंब नाकावाटे दिले जातात. प्रथम चेहर्‍याला कोमट तेलाने स्नेहन करून मग नाकात थेंब टाकले जातात. २० मिनिटे रुग्णाला तसेच झोपवून त्यानंतर चेहर्‍याला वाफ दिली जाते. अशाप्रकारे नस्य कर्म पूर्ण होते. त्यानंतर अर्ध्या तासाने गरम पेय पिण्यास दिले जाते. जेणेकरून इंद्रियांना तात्काळ बल प्राप्त होते. (क्रमशः)