लोकांमध्ये संभ्रमामुळे गोंधळ
विद्रुपीकरण झालेल्या नोटा बँका स्वीकारणार नसल्याच्या सूचना काही बँकांनी कॅश काउन्टरवर लावल्याने जनतेमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. दरम्यान, अशा नोटा न स्वीकारण्यासंबंधीची कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे किंवा आदेश बँकांना पाठविलेले नाहीत, असे येथील भारतीय राज्य बँकेच्या ट्रेजरी शाखेचे व्यवस्थापक अशोक कुमार शाहू यांनी त्यांच्याशी संपर्क केला असता सांगितले.
बनावट नोटा सापडल्यास बँका त्या जप्त करतात. परंतु विद्रुपीकरण केलेल्या नोटा न स्वीकारणे कायद्याच्या चौकटीत बसत नाही. त्यामुळे त्या नाकारणे शक्य नाही. असे असले तरी चलनावर रिझर्व बँकेचा अधिकार असल्याने नोटांवर लिहिण्याचा कोणालाही अधिकार नाही. त्यामुळे जनतेने नोटांवर लिहीणे बंद करावे, असे आवाहन करणारे परिपत्रक आरबीआयने यापूर्वीच जारी केले आहे. विद्रुपीकरण केलेल्या नोट जानेवारीनंतर कोणीही स्वीकारणार नाही, अशा अफवा पसरविल्याने गोंधळ निर्माण झाला. एटीएमद्वारे काढलेल्या पैशांमध्येही विद्रुपीकरण केलेल्या नोटा आढळून आल्या आहेत. प्रत्येकाच्या खिशात असलेल्या नोटांपैकी अनेक नोटांवर काहीनाकाही लिहिलेले असते. प्रत्यक्षात अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवणे कठीण होते, असे अनेक बँक अधिकार्यांचे म्हणणे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आरबीआयने सर्व बँकांना परिपत्रक पाठवून विद्रूप केलेल्या नोटा ग्राहकांना देऊ नये, असे कळविले आहे. वरील परिपत्रक बँकांसाठी असल्याने त्याचा ग्राहकांकडे असलेल्या नोटांशी संबंध नाही, असे बँक अधिकार्यांनी सांगितले.