Home बातम्या नैतिक जबाबदारी स्वीकारून पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा : मुंडे

नैतिक जबाबदारी स्वीकारून पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा : मुंडे

0

कोळसा घोटाळा प्रकरणी भाजप शनिवार दि. १ व रविवार दि. २ सप्टेंबर रोजी देशभार जागृतीचे काम हाती घेणार असून पक्षाचे नेते देशातील सर्व प्रमुख शहरांत पत्रकार परिषदा घेऊन एनडीए सरकारने केलेल्या कोळसा घोटाळ्याविषयी माहिती देऊन जनजागृती घडवून आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपण त्याचसाठी गोव्यात आल्याचे ते म्हणाले.

खुल्या लिलावाद्वारे कोळसा खाणी देण्यात आल्या नसल्याने केंद्र सरकारच्या तिजोरीला १,८०,००० कोटी रु. चे नुकसान झाले असल्याचे कॅगने आपल्या अहवालात नमूद केले असल्याचे मुंडे म्हणाले. आता खुल्या लिलावाद्वारे या कोळशाच्या खाणी वितरीत करण्यात आल्यास केंद्र सरकारला १,८०,००० कोटी रु. मिळू शकतील, असे मुंडे यांनी स्पष्ट केले. कोळसा घोटाळा झालेला नसून त्याबाबत होणार्‍या आरोपात तथ्य नसल्याचा दावा काही मंत्री करायला लागलेले असून टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या वेळीही ते असाच दावा करीत होते, असे मुंडे म्हणाले.

राजीव गांधी यांनी पंतप्रधान असताना बोफोर्स घोटाळा केला होता. त्यानंतर आता मनमोहनसिंग यांनी कोळसा घोटाळा केल्याचे ते म्हणाले. ‘कॅग’ ही घटनात्मक संस्था असून तपासणीचा त्यांना पूर्ण अधिकार आहे, असे सांगून आपण घोटाळा केलेला असताना कॅगवर टीका करण्याचा केंद्र सरकारला अधिकार नसल्याचे त्यांनी सांगितले. कोळशासंबंधी बोलताना ते म्हणाले की, पूर्वी कोळशाचे राष्ट्रीयीकरण करण्यात आलेले होते. नंतर ते रद्द करण्यात आले. कोळसा घोटाळ्याप्रकरणी केवळ संसदेतच नव्हे संसदेबाहेरही देशभर आवाज उठवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

कोळशात भाजप नाही : मुंडे

कोळसा घोटाळ्यात भाजपचे हातही काळे झाल्याचा जो आरोप होत आहे त्याविषयी विचारले असता त्यात तथ्य नसल्याचा दावा मुंडे यांनी केला.