– सौ. देवकी राजेश नाईक, घोगळ, मडगाव
‘‘सुंदर मी होणार! जुनी इंद्रिये जुना पिसारा, सर्व सर्व झडणार. नव्या शक्तीचे पंख मला फुटणार, सुंदर मी होणार! मृत्यू म्हणजे वसंत माझा, मजवरती फुलणार, सौंदर्याचा ब्रह्मा तो मज सौंदर्य घडणार, सुंदर मी होणार!’’
ह्या सुंदर ओळी आहेत स्वातंत्र्यशाहीर कवी गोविंद दरेकर यांच्या. बालपणापासून अपंगत्व आल्याने त्यांना शिक्षण घेता आले नाही, पण त्यांना कविता करण्याचा छंद लहानपणापासून होता. मृत्यूच्या थोडे दिवस आधी लिहिलेल्या या त्यांच्या सर्वोत्कृष्ट कवितेत मृत्यूचे स्वागत केले आहे. मृत्यूच्या पलीकडे जाऊनही एक सुंदर जग निर्माण करता येत ही कल्पनाच किती सुंदर आहे ना? मृत्यूचे स्वागत करून मृत्यूला कवेत घेणे क्वचितच लोकांना जमते. मृत्यूनंतर ज्यांचे अवशेष दानाच्या रूपाने जेव्हा मागे ठेवले जातात त्यांचे आयुष्य खरेच सत्कारणी लागलेले असते.
माझ्या निरागस निष्पाप, कोवळ्या मुलीचे चटका लावून जगाचा निरोप घेणे, मागे आपल्या माणसांना न संपणारी तगमग जिवाला लावूनच अलविदा होणे हे सगळे कसे चिमटीतून फुलपाखरू निसटून जावे व जाताना बोटावर सोनेरी रंग सोडावे तसेच.
रेवा कोण होती? कशी होती, हे ज्यांनी अनुभवलंय तेच सांगू शकतील. तिचे सुंदर पाणीदार डोळे, अनेकांना भुरळ पाडणारे. डोळ्यांद्वारेच बोलणारी, मनसोक्त हसणारी, अवघ्या अडीच वर्षांची ही कन्या विष्णू वाघांची ‘झिंजीर झिंजीर सांज’ तल्लीन होऊन ऐकणारी… कोकिळेने घातलेल्या आर्त सादाला ओ देणारी- रेवा. श्रीखंड किंवा केकसाठी रडणारी रेवा, सगळ्यांनाच हवीहवीशी वाटणारी…सहनशक्ती काय चीज असते हे मी माझ्या छोटीकडून शिकलेय. तिचे साक्षात मृत्यूशी झगडणे मी अनुभवलेय. अनुभवलेली प्रत्येक गोष्ट शब्दांत थोडीच बांधता येते?
मला गुलमोहराच्या झाडाची विलक्षण ओढ. त्याची फुले चार दिवस नजरेला खुलवतात आणि एका झुळुकेसरशी मातीत मिसळून जातात. माझ्या रेवासारखी! ती आज प्रत्यक्षरूपाने आमच्यात नाही हा सल मनात कायमचा कोरला गेलाय, पण तिचे अनंताच्या पलीकडे जाऊनही नेत्ररूपी राहणे आमच्यासाठी लाखमोलाचे!!
आपल्या प्रिय व्यक्तीचा विरह कधीच सहन होणार नसतो. पण, ‘मृत्यू’ हेच शाश्वत सत्य मानून आम्ही आमच्या अडीच वर्षाच्या मुलीचे आम्ही नेत्रदान केले. आम्हाला ती दुरावणार ह्याची डॉक्टरांनी पूर्ण शहानिशा केल्यानंतर आम्ही तिला नेत्रदानाने अमर ठेवण्याचा निर्णय घेतला.
दिवाळीला घराभोवती विद्युत रोषणाई करून झगमगाट करण्याऐवजी दृष्टिहीनांना नेत्र देऊन त्यांना दृष्टी देऊन खरी दिवाळी साजरी केल्याचा आनंद आम्ही उभयंतानी यंदा अनुभवला. कुठे तरी, कोणीतरी आपल्या प्रिय व्यक्तीच्या डोळ्यांद्वारे हे सुंदर जग पाहतोय ही कल्पनाच किती सुंदर! हा आनंद खरंच अवर्णनीय होता. रेवाचा पुर्नजन्मच जणू…
अंधत्व नष्ट करण्याचे काम आपणच करू शकतो. प्रत्येक नागरिकाने ते आपले आद्य कर्तव्य मानून नेत्रदान केले तर जगातील अंधत्व लुप्त पावेल यात शंका नाही. श्रीलंकेसारख्या लहान देशातून स्वतःची गरज भागवून दरवर्षी सुमारे १० हजार डोळे निर्यात केले जातात. नेत्रदान हे आपले कर्तव्य मानतात. दुर्घटनेमुळे, विषाणूंचा प्रसार व संसर्ग, गुंतागुंतीची शस्त्रक्रिया, बालकांमध्ये ‘अ’ जीवनसत्वाचा अभाव, कुपोषण इत्यादींमुळे दृष्टीदोष उद्भवतो. यावर नेत्ररोपण हा प्रभावी उपाय आहे.
फेब्रुवारी २०११ मध्ये आम्ही आमच्या मुलीचे मरणोत्तर नेत्रदान केले आणि अवघ्या सहा महिन्यांतच तिच्यामुळे दोन दृष्टिहिनांस दृष्टी मिळाली. मरणोत्तर नेत्रदान करणार्या नेत्रदात्यांचे स्मरण करण्यासाठीच ‘स्मरण नेत्रदात्यांचे’ हा कार्यक्रम नेत्रदान जागृती मंडळ, पुणे जिल्हा अंधत्व सोसायटी व रोटरी क्लब ऑफ पुणेरी डाऊनटाऊन या संस्थांनी आयोजित केला होता. यंदा आम्हाला ह्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. हजारोंनी नेत्रदाते तेथे उपस्थित होते. आम्हांला हे नवीनच होते कारण गोव्यात अजूनही पाहिजे तसा प्रतिसाद ह्या संस्थांना लाभत नाही. नेत्रलाभार्थ्यांची मनोगते ऐकून मन हेलावले. आपल्या निर्णयामुळे दोन व्यक्तींचे आयुष्य उजळून निघेल ही एकच भावना पुरेशी असते. म्हणूनच वाटते की प्रत्येकाने नेत्रदानाचा संकल्प करायला हवा.
नेत्रदान हेच श्रेष्ठदान या उद्घोषाने मानवी जीवनातील समाजजाणीव प्रकट होते आणि त्यातूनच नेत्रदानांच्या कुटुंबियांतून ती प्रत्यक्षात उतरते. प्रत्येक कुटुंबीयाच्या मरणोत्तर नेत्रदानातून दोघा दृष्टिहिनांस दृष्टी प्राप्त होते आणि एक अत्यंत उदात्त मानवकल्याणकारक उपक्रम प्रत्यक्षात आणला जातो. असाच एक अत्यंत उदात्त मानवकल्याण करणारा उपक्रम राबवलाय पणजीतील, रोटरी क्लबने. एक दर्जेदार उपक्रम राबवण्याच्या हेतून रोटरी क्लबचे चेअरमन श्री. अविनाश भोसले ह्यांनी ‘नेत्रदान पेढी’ गोव्यात सुरू करण्याचे आयोजले. अथक परिश्रमानंतर सुरू झालेल्या ह्या संस्थेला अनुदान, जागा, अन्य मदत सौम्य गतीने मिळाली. श्री आनंद बोस यांनी दिलेल्या देणगीतून त्यांच्या कार्याला गती मिळाली. ह्या संस्थेने पाच वर्षे पूर्ण केली आहेत. ह्या पाच वर्षांत त्यांनी लोकांना योग्य सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. आमचे कुटुंब त्यांचे सदैव ऋणी राहील कारण रोटरियन दिलीप प्रभुदेसाई व सौ. बबिता दिलीप प्रभुदेसाई, श्री प्रियोळकर व इतर डॉक्टर सदस्यांनी वेळेवर येऊन योग्य ती प्रक्रिया करून आमच्या रेवाचे डोळे नेत्रपिढीकडे सुपुर्द केले. दिवंगत व्यक्तीच्या ‘स्मृती-चिरंतन’ ठेवण्याचे कार्य अशा ज्या संस्था करतात, त्यांना आपण जनतेने विशेष करून तरूणवर्गाने सहकार्य केले पाहिजे. नेत्रदानाविषयी जागरूकता समाजात निर्माण केली पाहिजे. कारण, शेवटी आपल्याच प्रियजनांना ते पुर्नजन्म देत असतात.
श्री. अविनाश भोसले हे ७४ वर्षाचे. आजही त्यांच्या सहकार्यांबरोबर मृतांच्या घरी जातात. त्यांना आधार देतात. तसेच अनेकदा ‘नेत्रदान’ ह्या विषयावर लोकांशी संवाद साधतात. पुणे येथील देसाई हॉस्पिटलची त्यांना ह्या कार्यात खूप मदत होते. श्री भोसले सांगतात की, त्या हॉस्पिटलमध्ये नेत्र लाभलेल्या एका लहान मुलाला त्यांनी खेळताना पाहिले अन् त्यांच्या कार्याला गती मिळाली. त्या मुलासारख्या अनेक नेत्रलाभार्थ्यांचे उजळलेले चेहरे त्यांच्या कार्याची पावती देतात. चोवीस तास त्यांची सेवा कार्यरत असते.
‘रोटरी पणजी आय बँक ऑफ गोवा’ संस्थेच्या कार्यामुळे आमच्या मुलीचे अल्पायुष्य ‘सत्कारणी’ लागले. कदाचित ‘नेत्रदान’ हाच तिच्या जन्माचा हेतू असावा. दिवंगत व्यक्तीच्या ‘स्मृती-चिरंतन’ ठेवण्याचे कार्य ह्या संस्था करतात व त्याद्वारे प्रियजनांना पुनर्जन्म लाभतो ह्याचा आम्हाला अतीव आनंद होतो. त्यांच्या सामाजिक कार्याला यश मिळो हीच सदिच्छा.