- राजश्री बांदोडकर
आपल्या जीवनात लहरींच्या रूपाने चांगली माणसे येतात आणि हळूच मनाला स्पर्श करून निघून जातात. आपण फक्त त्यांचं चांगुलपण जपून ठेवतो. डॉ. जयंत नारळीकर सरांचा सहवास लेखिकेला दीर्घकाळ लाभला. त्यांच्या सहवासातील स्मृती जागवणारा हा लेख…
20 मे 2025- आज आभाळ दाटलेलं. जोरदार पाऊस पडण्याची चिन्हे दिसत होती. नारळीकर सरांच्या निधनाची बातमी मनाला सुन्न करून गेली. नकळत डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. अनेक विचारांनी मनात थैमान घातले. एकापाठोपाठ एक-एक अनुभवलेले किस्से डोळ्यांसमोर पुन्हा जिवंत होऊन तरळू लागले.
आदल्या दिवशी ‘आयुका’ला फोन केला असता नारळीकर सरांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळालाय आणि ते घरी आले आहेत असे समजले. दुसऱ्या दिवशी परत फोन करणार होते. माझं नवीन पुस्तक ‘छबी आनी रंगरंगयाळी फुलां’ हे छापून माझ्या हातात आलंय, ही आनंदाची बातमी मला त्यांना द्यायची होती.
माझी आणि डॉ. नारळीकर सरांची ओळख 1987 सालापासूनची. त्या वर्षी ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ ग्रेव्हिटेशन ॲण्ड कॉस्मोलॉजी’चे गोव्यात आयोजन करण्यात आले होते. या कॉन्फरन्सची पूर्ण जबाबदारी भारतातील ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. प्रो. जयंत नारळीकर यांनी घेतली होती आणि गोव्यात आयोजनाचा मोठा भाग ‘गोवा असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ ॲस्ट्रोनॉमी’चे संस्थापक डॉ. पार्सिवाल नोरोन्हा यांनी उचलला होता. जगातील तब्बल नव्वद नामांकित खगोल शास्त्रज्ञ तसेच भौतिक शास्त्रज्ञांच्या उपस्थितीमुळे आम्हा विद्यार्थी कार्यकर्त्यांना एक आगळीवेगळी मेजवानीच होती ती. खूप काही नवीन शिकायला मिळत होते. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या वैज्ञानिकांची व्याख्याने यानिमित्ताने ऐकण्याची संधी आम्हा विद्यार्थ्यांना प्राप्त झाली होती. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मोजक्याच वैज्ञानिकांसमवेत स्नेहभोजनात एक कार्यकर्ती म्हणून मला सहभागी होण्याचे भाग्य लाभले. या स्नेहभोजनाच्या निमित्ताने डॉ. जयंत नारळीकर यांना जवळून पाहण्याचा व संभाषण करण्याचा योग आला. तिथे त्यांचे ते सावकाशीने बोललेले मोजकेच शब्द, जेवत असताना आपल्याला पाहिजे तेवढेच जेवण थाळीत घेऊन, भारतीय पद्धतीने भोजनाचा आस्वाद घेताना त्यांना पाहून मला तर आश्चर्यच वाटले. एवढे ख्यातनाम आंतरराष्ट्रीय कीर्तीचे हे वैज्ञानिक काटे-चमचे हातात घेऊन पाश्चात्त्य पद्धतीनेच जेवण करणार असे मी गृहीत धरलेले; पण येथे तर काही वेगळेच पाहायला मिळत होते! साध्यासुध्या भारतीय माणसासारखे जेवत असलेल्या सरांना बघून मला सुखद धक्काच बसला. काटे-चमचे घेऊन जेवणे म्हणजे काही मोठेपणा नाही हे मला त्या दिवसापासून कळून चुकले. आम्ही वयाने लहान, तरीसुद्धा आपल्यासमोर येणाऱ्या सामान्यातल्या सामान्य व्यक्तीलाही समजून घेणे या त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य माझ्या मनाला भावून गेले.
त्यानंतर सरांना भेटण्याचे विविध प्रसंग आणि त्या चर्चांमधला प्रत्येक क्षण मला अधिकाधिक समृद्ध करून गेला. त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांची विचारसरणी, त्यांची विनम्र संभाषणाची पद्धत या साऱ्याच गोष्टींचा विलक्षण प्रभाव माझ्यावर पडला. या असाधारण व्यक्तीचे अगदी साधेपणाचे आचरण बघून एक आगळी-वेगळी छाप माझ्यावर पडली, आपलेपणाचे एक नाते निर्माण झाले आणि नारळीकर सर आणि त्यांच्या पत्नी सौ. मंगलाताई आमच्या जिव्हाळ्याच्या होऊन गेल्या. गेल्या जवळ जवळ 20-25 वर्षांत माझ्या आयुष्यातले प्रत्येक बरे-वाईट क्षण मी मंगलाताई आणि सरांबरोबर शेअर केलेले आहेत. मंगलाताई खूपदा मला सल्ला द्यायच्या. माझ्या घरी आल्यानंतर बागेत फिरून पेरूचा जॅम कसा बनवायचा याच्यावरही कधीकधी चर्चा करायच्या. तसेच मुलींना कसं वाढवायचं याच्यावरही सल्ला द्यायच्या. तर कधीकधी आपण गावातल्या मुलांसाठी का काम करायचं असतं याच्यावर आपले विचार सांगायच्या. तसेच बोलण्या-बोलण्यात प्रो. विष्णू नारळीकरांबद्दलही माहिती मिळाली. कधीकधी त्यांच्या आईच्याही गोष्टी सांगायच्या. त्यांच्या काकांनी त्यांना लावलेल्या गणिताचे कोडे सोडवण्याच्या सवयी. या सगळ्या सवयींनी त्यांच्यावर झालेल्या संस्कारांबद्दल ते आम्हाला सांगायचे.
प्रादेशिक भाषांनी विज्ञानाचा प्रसार व्हायला पाहिजे हे त्यांचे ठाम मत. त्यांनी स्वतः मराठीत विज्ञान-कथा लिहिल्या आहेत. त्यांची पुस्तकं वाचल्यावर विज्ञान हे क्लिष्ट नाही याची जाण येते. पुण्यातली ‘इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रोनॉमी ॲण्ड ॲस्ट्रोफिजिक्स’ (आययूसीएए) ही संस्था जरी स्थापन करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला तरी त्यांच्या तोंडून स्वतःचा मोठेपणा मी कधीच ऐकला नाही.
पुढे सरांच्या प्रेरणेतून सोप्या शब्दांनी माझ्या गोव्याच्या मुलांकरिता कोकणीत विज्ञानलेखन करण्याचा उपक्रम मी सुरू केला. याकामी वेळोवेळी सरांचे प्रोत्साहन मला लाभले. ‘ताऱ्यांच्या वनात स्वप्नांची सहल’ या माझ्या मराठी पुस्तकातले वैज्ञानिक लिखाण तर मंगलाताईंनीच दुरुस्त केलेले.
मुलांसाठी लिहिताना आपण किती सतर्क असायला हवे, प्रत्येक शब्द मोजून-मापून का वापरायचा यावर मंगलाताई मला सल्ला द्यायच्या. सर म्हणायचे, निसर्गामधले लपलेले रहस्य जर आपण मुलांना उलगडून दाखवले तर शिकण्यात आनंद निर्माण होईल. पुढे उद्भवलेले निसर्गातले रहस्य ती स्वतः समजून घ्यायचा प्रयत्न करतील. अशा तऱ्हेने जर आपण लिखाण केलं तर विज्ञान आवडीचा विषय होऊन जाईल, असे ते सांगायचे. सरांच्या या सूचना, त्यांनी केलेले बदल यांमधून माझ्या लेखनाला एक शास्त्रीय बैठक लाभली आणि आपला विचार व्यक्त होण्याचा एक मार्गही सापडला.
‘ॲस्ट्रोनॉमी’ या विषयावर मुलांसाठी लिहिलेल्या ‘स्पेस टॉक’ आणि ‘ताऱ्यांच्या वनात स्वप्नांची सहल’ या पुस्तकांना परिपूर्णता आणण्यासाठी सरांनी खूपच सहकार्य केले. अत्यंत मोजक्या शब्दांत पण अर्थगर्भ अशी प्रस्तावनाही त्यांनी लिहिली. या साऱ्याच गोष्टी मला अविस्मरणीय वाटतात. हाच तो जिव्हाळा नाही का?
एकदा मी नारळीकर सरांना विचारले की, सर, आपण माझ्या पुस्तकाचे प्रकाशन कराल? तर सरांनी लगेच सांगितले की, ‘राजश्री, माझ्या नियमाप्रमाणे मी कधीच पुस्तक प्रकाशन केलेले नाही. पण एक काम करू शकतो. मी गोवा कोंकणी अकादेमीतर्फे मोजक्या लोकांना विज्ञान प्रसारावर व्याख्यान देऊ शकतो. तर तू ती व्यवस्था कर!’ हाच तो जिव्हाळा नाही का?
मी लागलीच गोवा कोंकणी अकादेमीत संपर्क साधला. व्याख्यानाची व्यवस्था झाली. सरांच्या काही अटी होत्या. समई नाही… पुष्पगुच्छ नाही… लहानसा परिचय आणि त्यानंतर व्याख्यान!
तर अशा तऱ्हेने 2005 मध्ये सरांच्या गोवा भेटीत ‘स्थानिक भाषेतून विज्ञानाची लोकप्रियता’ या विषयावर त्यांचे व्याख्यान गोवा कोंकणी अकादेमीसाठी आयोजित केले. दैनंदिन जीवनाकडे विज्ञानाचा जवळचा संबंध असल्याने हे विज्ञान सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचण्याची गरज असून त्यासाठी स्थानिक भाषेचा प्रभावी वापर करण्याची गरज सरांनी व्यक्त केली.
आणखी एका गोष्टीची आठवण झाली. एका विज्ञान संघटनेचे अधिकारी माझ्या घरी येऊन त्यांच्या कार्यक्रमासाठी सरांचे व्याख्यान आयोजित करण्याचा मला आग्रह केला. मी सरांना फोन करून विचारले, पण त्यांचे कार्यक्रम तर पाचसहा महिन्यांपूर्वीच ठरलेले असत. आपली योजना ठरलेली आहे आणि त्याच्यात आणखी काही बसवता येत नाही असे सरांनी मला सांगितले.
आमचे सर इतके शिस्तबद्ध होते.
माझ्या पुस्तक प्रकाशनाबद्दल सांगायचे राहूनच गेले. सरांनी जरी स्वतः माझे पुस्तक प्रकाशन केले नाही तरी 2009 साली ‘इंटरनॅशनल इयर ऑफ ॲस्ट्रोनॉमी’ या वर्षाची सांगता करण्याकरिता गोवा सरकार आयोजित समारंभात मंगलाताईंकडून माझ्या पुस्तकाचे प्रकाशन आग्रहाने करून घेतले.
एकदम पर्सनल.
1998 साली पहिल्यांदा जेव्हा सर आणि मंगलाताई माझ्या घरी आल्या तेव्हा जेवण थोडं तिखट होतं. सरांना जेवण थोडं तिखट लागले, हे मंगलाताईंनी जेव्हा मला सांगितले तेव्हापासून सर जेव्हा जेव्हा माझ्या घरी आले तेव्हा तेव्हा जेवण्याअगोदर मी चाखून बघायचे. दोघांनाही मुगाच्या गाठी, खतखते, आवळ्याचे सांसव खूप आवडायचे. तसेच मी केलेले पुडिंग किंवा कस्टर्ड ॲपलचे आईस्क्रीम आवडीने खायचे ते. गोव्याचे जेवण सरांना खूप आवडायचे. घरी जेवण वाढल्यावर तू काय बनवलंस असा प्रश्न सर मला आवर्जून विचारायचे आणि मग त्या जिन्नसाचे आवर्जून कौतुक करायचे.
2005 च्या भेटीत मी माझ्या आत्याने लिहिलेले आत्मचरित्र सरांना भेट दिले. काही दिवसांनी ते पुस्तक वाचल्यानंतर त्यांनी मला ईमेलने मुद्दाम कळवले की, त्यांना पुस्तकातील नॅरेटिव्ह स्टाईल आवडली- जणू काही लेखिका वाचकाशी तिच्या आयुष्याच्या कथेबद्दल सांगत आहे. आपले मत आत्याला मुद्दाम सांगायला त्यांनी नमून केले.
आपण कितीही व्यस्त असलो तरी दुसऱ्यांनी दिलेल्या भेटवस्तूचे कौतुक कसे करायचे, त्याला मान कसा द्यायचा हेसुद्धा त्यांच्याकडूनच शिकायला मिळाले मला. सर आणि मंगलाताई जेव्हा पहिल्यांदा म्हणजे 1999 साली माझ्या घरी आल्या तेव्हा माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता. सर माझ्या घरी जेवायला येणार तर कोणाकोणाला बोलावू? तसं मला माहीत होतं की त्यांना जास्ती माणसांत मिसळायला आवडत नाही. तरी पण मी माझ्या भावाला आणि छोट्या भाचीला निमंत्रित केलं. तसेच माझे सासरे आणि सिद्धर्थाचे काका यांना बोलावले. सगळी मिळून सहा माणसे.
दुसऱ्यांदा जेव्हा सर माझ्या मुलींना बघायला आले तेव्हा मी फक्त माझ्या पाच भाचरांना बोलावले होते. तिसऱ्या वेळेला फक्त सासू-सासरे, सिद्धार्थ, मी आणि माझ्या मुली. चौथ्या खेपेला मंगलाताईंनी फोन करून गोड शब्दांत मला सांगितले की राजश्री, आम्हा दोघांना फक्त, तू, सिद्धार्थ व मुलींना भेटायला आवडेल. त्यानंतर मी कानाला खडाच लावला. नंतर सर आणि मंगलाताई जेव्हा जेव्हा आमच्याकडे आली किंवा मी त्यांना भेटायला गेले तेव्हा आम्ही दोघेच असायचो. एकदम पर्सनल टाइम असे तो. माझ्या छोट्या मुलींबरोबर सर आणि मंगलाताई खेळायच्या.
एकदा सर, मंगलाताई आणि माझ्या मुली बाहेर बसलेल्या आणि मी स्वयंपाकघरात जेवण बनवत होते. बाहेर येऊन बघते तर सरांनी एकटीला आपल्या पायांवर घेऊन ‘आंगशो मांगशो’ करत होते, तर मंगलाताई दुसरीला आपण घोडा होऊन आपल्या पाठीवर बसवत घोडा-घोडा खेळत होत्या. मी अवाक्च झाले. त्यावेळच्या माझ्या भावना मी शब्दांत मांडूच शकत नाही.
एकदा सर आणि मंगलाताई माझ्या घरी आल्या तेव्हा त्यांच्या हातातला नारळ त्यांनी माझ्याकडे सोपवला आणि आपण आत्ता शांतादुर्गा, कवळे देवळातून आलो असे त्यांनी मला सांगितले. मी सरांकडे बघितले. त्यांनी मंगलाताईंकडे इशारा केला. मंगलाताईंनी सांगितले की, नारळीकर घराण्याचा शांतादुर्गा देवस्थानशी संबंध आहे. मी त्या क्षणी एकदम आश्चर्यचकित झाले. मग मी याच्यावर खूप विचार केला. का म्हणून देव आपला दुष्मन? आम्ही आमच्या आई-वडिलांवर प्रेम नाही करत का? डोळे झाकून त्यांच्यावर विसंबून नाही का राहत? मग देवळात गेलं तर काय बिघडलं? विज्ञान म्हणजे निसर्गामध्ये जे काही लपलेले आहे त्यांचा शोध घेणे. त्यांची उत्तरे शोधणे आणि मग या विज्ञानाचा उपयोग करून मनुष्य जातीला जास्तीत जास्त सुख देणे नाही का? अंधश्रद्धा ही गोष्ट वेगळी आणि त्याच्यापासून थोडं सावध राहिलेलं बरं असं माझं मत. पण त्या दिवशी आणखी एका गोष्टीचा उलगडा झाला की आपल्या जवळच्या माणसाचे छोट्या-छोट्या कारणांसाठी मन दुखवायचे नसते.
मी आणि सिद्धार्थ एक दिवस पुण्यात सरांच्या घरी दुपारी जेवायला गेलो तर मंगलाताईंनी दरवाजा उघडून आमचं स्वागत केलं आणि जेवणाच्या टेबलवर आम्हाला बसवलं. दोनतीन मिनिटांनी सर स्वयंपाक घरातल्या जेवणाची ट्रॉली घेऊन बाहेर आले आणि मग सगळ्यांनी एकत्र बसून जेवण केलं. यातून ‘हे माझं काम नाही…’ हा विचार तिथं दिसलाच नाही.
एकदा सर आणि मंगलाताई जेव्हा माझ्या घरी आल्या तेव्हा त्यांनी माझ्या दोन्ही मुलींना पुणेरी घागरा-पोलका आणलेला. मला त्यांनी दिलेली शाल मी जपून ठेवली आहे.
माझ्या मुलींचे प्रत्येक लाड मी त्यांना फोन करून सांगायचे. मुलींची शाळेतली प्रगती, त्यांचे गाण्याचे वर्ग, सगळ्या सगळ्या विषयांवर चर्चा.
2023 मे महिन्यात माझा नवरा सिद्धार्थानं हे जग सोडलं. ही वाईट बातमी सांगण्यासाठी जून 2023 मध्ये मंगलाताईंना फोन केला. पण त्या दिवशी त्यांच्या आवाजात फरक होता. त्यांनी माझं ऐकलं आणि फक्त ‘राजश्री, तू काळजी घे’ असं सांगितलं.
जुलै 2023 ला मंगलाताई गेल्या. खूप वाईट वाटले. आणि आता तर सरांचे एक्झिट…
आपल्या जीवनात लहरींच्या रूपाने चांगली माणसे येतात आणि हळूच मनाला स्पर्श करून निघून जातात. आपण फक्त त्यांचं चागुलपण जपून ठेवतो.