सौ. पौर्णिमा केरकर
‘मी ईश्वराचा दूत आहे. मानवजातीच्या कल्याणासाठी व पतितांच्या उद्धारासाठी पृथ्वीवर अवतरलो आहे’ असे ख्रिस्ताने सांगितले आहे. तो खर्वांनाच तारणारा. भेदभाव त्याला मान्य नाही. सर्वांशी त्याचे नाते महत्त्वाचे आहे. परमेश्वर स्वयंभू आहे. तो अनादी असून अनंत आहे. म्हणूनच त्याची मनःपूर्वक प्रार्थना करणे गरजेचे आहे. वैयक्तिक प्रार्थनेत आपण फक्त स्वतःपुरतेच मर्यादित राहतो. तर सामुदायिक प्रार्थनेत स्वतःबरोबर समाजालाही सोबत घेऊन एकरूप केले जाते. येशूने प्राधान्य दिले तेच सामुदायिक प्रार्थनेला. फक्त स्वतःसाठी न झटता समाजासाठी परमेश्वराकडे मागणे करणे ही खरी प्रार्थना होय. आप्त आणि शत्रू मध्येसुद्धा त्याने कधी दुजाभाव केला नाही. तसा दुजाभाव करता कामा नये ही येशूची शिकवण आहे. धर्मभेद, जातिभेद कधी मानले नाहीत. सगळेच धर्म माणुसकीचीच जोपासना करायला शिकवतात. ‘धर्म माणसाला जोडतो, तोडत नसतो’. स्वतःला सुशिक्षित समजणारे तथाकथितच धर्माचे अवडंबर माजवून तोडफोड करतात. माणुसकीला कलंक लावणारी नीच कृत्ये करतात व परत स्वतःच्या भल्यासाठीच देवाला वेठीस धरतात. ख्रिस्त सांगतो,‘ नेहमीच सर्वच ठिकाणी, चांगल्या किंवा वाईट परिस्थितीत असतानाही, प्रार्थना करता येते. किंबहुना सर्व जीवनच प्रार्थनामय व्हावे, जेणेकरून सर्वच घटना मांगल्याने परिपूर्ण असतील.’ परंतु असे न होता, वाटेल तसे वागणे हेच मुळी आपले आद्य कर्तव्य आहे असेच माणसांना वाटते. कर्मकांड, पूजाअर्चा, यांचे भयानक स्तोम माजलेले आहे. आत्मियतापूर्वक प्रभूचे नामस्मरण होत नाही. म्हणून समस्या-संघर्षाचे अडथळे मानवी जीवन व्यापून टाकतात. येशू ख्रिस्त या नावालाच वेदनेची किनार आहे. क्रुसावर खिळे ठोकताना उडालेली रक्ताची चिळकांडी ही आयुष्यभराची प्रार्थना ठरली. विश्वशांतीचा, मानवतेचा संदेश यातूनच तर सर्वदूर पसरला.
डिसेंबर महिना तर ख्रिस्ती समाजाचा प्रार्थनेचा, शांती-समाधानाचाच महिना. सत्कृत्ये, परोपकार, त्याग, दुर्बलांची रोग्यांची सेवा करून आध्यात्मिक उंची गाठण्याचा हा काळ. मानवजातीच्या कल्याणासाठी, मुक्तीसाठी केलेले आत्मबलिदान, त्याच्या जीवनातील करुण प्रसंगांची आठवण करून त्याच्या प्रतीच्या उत्कट श्रद्धेने मन प्रार्थनामय होते. ख्रिस्ताला लोकसमुदायासमोर क्रुरतेने क्रुसावर झोपवून हातापायाला खिळे ठोकून हाल हाल करून मारण्यात आले. आई मारिया शेजारी असूनही तिच्या डोळ्यांतील अश्रूही त्याच्या कोरड्या पडलेल्या ओठांची तहान भागवू शकले नाहीत. सारेच जण त्याच्यासमोर उभे राहून त्याची चेष्टामस्करी करत होते. पण तो तर अविचल-निःसंग. मृत्यूच्या बिंदूवरही त्याने मारेकर्यांवर प्रेम केले. ‘शत्रूवरदेखील मनस्वी प्रेम करा, प्रेमाने शत्रुत्व नष्ट करा’ या संदेशाबरोबरीनेच ‘देवा त्यांना क्षमा कर. कारण ते काय करीत आहेत ते त्यांचे त्यांनाच कळत नाही’ असा दिव्यत्वाचा उपदेश देणार्या ख्रिस्ताप्रति ख्रिस्ती बांधवांच्या मनात अपूर्व उत्साह दिसतो तो प्रामुख्याने नाताळच्या दिवसांत.
अपूर्व आनंद, उत्साहाचा ख्रिस्ती लोकांचा आनंदाचा सण म्हणजे नाताळ. ‘दिवेस नातालीस’ या लॅटीन शब्दावरून नाताळ हा शब्द रूढ झाला. भगवान येशूचा जन्मदिवस म्हणजे नाताळ. इसवी सनाच्या सुमारे चौथ्या वर्षी २४ डिसेंबरच्या उत्तररात्री पॅलेस्टाईन देशातील बेथलहेम या गावात गुरांच्या गोठ्यात भगवान येशूचा जन्म झाला. जगाला विश्वशांतीचा संदेश देणार्या ख्रिस्ताचा जन्म एका गोठ्यात झाला आणि म्हणूनच नाताळच्या दिवसांत ख्रिस्ती बांधव गोठा उभारून त्यात मारिया योसेफ व बाळ येशूच्या प्रतिकृती ठेवून त्यांची पूजा करतात.
नाझारेथ खेड्यात सुरू केलेल्या जनगणनेमुळे हेरोदेच्या सैनिकांनी लोकांना बजावूनच टाकले की, खानेसुमारी-जनगणना करण्यासाठी सर्वांनीच आपापल्या गावी जावे. फ मेरीला ही आज्ञा पाळावीच लागली. देवाचा पुत्र त्याचवेळी मेरीच्या उदरात वाढत होता. त्याचा जन्म होण्यास काही क्षणांचाच अवधी होता. चालता येत नव्हते मेरीला. तरीही प्रवास केला. कधी चालत तर कधी गाढवावर बसून. बेथलहेम गाठले पण आरामासाठी जागा मिळाली नाही. प्रत्यक्षात देवाच्या पुत्राला जन्म देण्यासाठीही केवढी यातायात, श्रम करावे लागले. या सगळ्याच यातना मेरीने आपल्या पुत्रासाठी सहन केल्या. अखिल मानवजातीला विश्वशांतीचा संदेश देणार्या महामानवाचा जन्म तिच्या उदरी होणारा होता. त्याला सुरक्षित राखण्यासाठी तिला मात्र दारोदार भटकावे लागले. निवार्यासाठी याचना करावी लागली. शेवटी शेळ्या-गाईंची वस्ती असलेल्या गोठ्याचा आश्रय तिला घ्यावा लागला. गवताचा बिछाना तयार करून त्यावरच मग येशूचा झालेला जन्म प्रकाशमयी ठरला. देवाच्या पुत्राचे स्वागत करण्यासाठी माणसे नव्हती तर जनावरांनीच त्याचे स्वागत केले. कदाचित माणसाच्या अंतःकरणाची सावली देवाच्या पुत्रावर पडता कामा नये असे विधिलिखित असावे. अंधार्या सभोवताली रात्री मारे बारा वाजता काळोख भेदून ज्ञानाचा प्रकाश समस्तांना देणार्या येशूचा जन्म झाला. सगळा गोठाच प्रकाशाने न्हाऊन निघाला. त्याच्या प्रकाशमयी जन्माचा संकेत दिव्य तार्याने दिला. त्यामुळेच की काय या तार्याचा शोध घेत घेत तीन ज्ञानी, विचारवंत ख्रिस्ताचे दर्शन घेण्यासाठी गेल्यावर दुष्ट हेरोदाला देवाच्या पुत्रजन्माविषयी कळते. पण त्याचा विश्वास बसत नाही. या घटनेविषयी दंतकथा सांगितली जाते की, दुष्ट राजा हेरोद जेवत असता त्याच्या दूतांनी त्याला ख्रिस्तजन्माची वार्ता सांगितली. त्याला ती पटली नाही. त्याने गर्जना केली. खरोखरच देवाच्या पुत्राचा जन्म झाला असेल तर शिजवलेला कोंबडासुद्धा जिवंत होऊन ओरडू लागेल आणि तसे झालेही. त्यानंतर मात्र तो सूडबुद्धीने पेटला. सत्याला मरण नाही. ते क्रुसावर क्रुरतेने ठोकले काय नाहीतर उंच कड्यावरून त्याचा कडेलोट केला काय? ते अजरामरच राहणार. हीच निर्मळ भावना नाताळ सणाच्या निमित्ताने मनामनांत प्रज्वलित होताना दिसते.
ख्रिस्ती समाजाचा लाडका, कौटुंबिक सण, जशी हिंदूंची दिवाळी, चतुर्थी तसाच ख्रिश्चनांचा नाताळ. सणाच्या अगोदर लेकी माहेरी येऊन झाडून पुसून सारे घर, घराभोवतालचा परिसर लखलखीत करतात. घरी केलेल्या फराळाची तर लूटच असते. उडदाच्या पिठाचे वडे पाण्याच्या वाफेवर शिजवलेली चांदणी, भाजलेल्या तांदळाच्या पिठाचे लाडू, शिजवलेले मटण, डुकराच्या मटणाचे इंदयाल, सर्पातेल, टेप्तात, नारळाच्या चवापासून माडाचे गूळ व तांदळाचे पीठ घालून तयार केलेले धोदेल, हे तर नाताळाचे खास आकर्षण. पूर्वी तर पारंपरिक पद्धतीने हा उत्सव साजरा करत असताना तिन्हीसांजेला युवायुवतींचा समूह एकत्र येऊन हातात घुमट घेऊन त्याच्या तालावर लोकगीते गात मनमुरादपणे नाचायचा. सामाजिक प्रेरणेने अंतर्बाह्य जोडला गेलेला हा उत्सव कौटुंबिक पातळीवर व धार्मिक अधिष्ठान बाळगून तेवढ्याच आत्मीयतेने साजरा केला जातो. या सणाची तयारी एक महिना आधीपासूनच केली जाते.झाडलोट, रंगरंगोटी, फराळ आधीच केले जातात. त्यादिवशी चर्चमध्ये जाऊन बाळ येशूचे दर्शन घेण्यात येते. ख्रिसमस केक कापून नाताळ साजरा केला जातो. तेराव्या शतकानंतर प्रचारात आलेली क्रीब (गोठा) करण्याची परंपरा आजही तेवढ्याच आत्मीयतेने पाळली जात आहे. नाताळ गोठे सर्वत्र घालण्यात येऊ लागले. नाताळ ट्री, सांताक्लॉज, हे तर या सणाचे खास आकर्षण. सांताक्लॉज तर मुलांचा खास दोस्तच. जे जे काही मुलांसाठी आनंददायी आहे, ते ते सर्व आपल्या झोळीतून मुलांना देऊन त्यांच्याशी आपुलकीचे नाते निर्माण करणारा सांताक्लॉज ख्रिश्चन, हिंदू, मुस्लीम, शीख असा भेदभाव करताना कधी बघितलाच नाही. म्हणूनच बालपणापासूनच या सणाचे सर्वधर्मसमभाव असणारे दर्शनच मनाला झाले. नाताळ झाडाविषयी तर सांगितले जाते की, बायबलमधील कल्पना याला जोडलेली आहे. आदाम इवा या आदिमानवांनी ज्ञानवृक्षाचे फळ खाऊन परमेश्वराची आज्ञा मोडली. त्यांच्या अशा कृत्यामुळेच माणसाला मृत्यूचा शाप मिळाला असे सांगितले जाते. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने मनुष्यरुपाने जन्म घेऊन मानवमुक्तीसाठी स्वतःला वाहून घेतले. त्यामुळेच शापाचे निवारण झाले. एक मारणारा असेल तर दुसरा तारणारा आहेच. हे झाड प्रकाशमयी झाले म्हणूनच या झाडाला प्रकाशीत केले जाते. विविध वस्तू खाण्याचे पदार्थ त्याला बांधले जातात. शुभेच्छापत्रे तर असतातच. ख्रिस्तजन्माचे शुभसंकेत प्रतिकात्मकतेने त्यात येतात. ‘बाळ येशूचा गव्हाणीत जन्म, देवदूतांचा मेंढपाळांना संदेश, ख्रिस्ताचा शोध करीत आलेले तीन राजे, मेंढपाळाची ख्रिस्ताला भेट, ख्रिस्त जन्मावेळचा संकेत देणारा आकाशात चकाकणारा उगवलेला तारा वगैरे संकेत येतात. नाताळच्या निमित्ताने चांदणी लटकावली जाते. त्यामागे हीच संकल्पना आहे. सांताक्लॉज तर संत निकालसेचेच रूप आहे. पांढरीशुभ्र दाढी असलेला, लाल कपड्यातील हसरा, सेवाव्रती तर देवदूत आणि लहान बालगोपाळांचा मित्रच असतो. त्याच्या झोळीतील खाऊ आणि खेळण्यासाठी बालकमंडळी तर ताटकळतच असतात.
धर्म कोणताही असो, प्रत्येक धर्मात सर्वधर्म समभावच शिकवलेला असतो. नाताळ समूहमनाच्या उत्सवाचे प्रतीक आहे. एकमेकांचे सुयश चिंतून मनोकामना पूर्ण करणे हे याच उत्सवातून प्रतिबिंबित होते. सेवा, त्याग, प्रेम, सत्य, अहिंसा, सांती यांचा संदेश म्हणजे नाताळ. ‘स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी’ हा दृष्टिकोन त्यातही प्रार्थनेचे सामर्थ्य महान. सुळावर ज्यांनी चढवले त्यांनाही प्रेमाचा संदेश दिलेला आहे तो ख्रिस्तानेच. त्याचे जीवन एक प्रार्थना, ज्या प्रार्थनेत सामर्थ्य आहे संस्कार, प्रकाशाचे, त्याग सेवेचे, सामूहिक भावनेचे, मांगल्य पावित्र्याचे. आज तणाव संघर्षात मन अभंग ठेवण्यासाठी, चित्त शुद्धीसाठी प्रार्थनेची गरज आहे. जगताचे सारे श्रम हलके करण्याचे सामर्थ्य या प्रार्थनेत आहे. माणसाने परमेश्वरावर प्रेम करावे. परमेश्वरही तेवढ्याच उत्कटतेने आपल्यावर प्रेम करतो. आचारविचार, आहारविहारातील नैतिक संकेत आपल्या जगण्याची उंची वाढवतात. अशी उंची वाढवण्यासाठी निकोप, निर्भेळ आनंद देणार्या अशा सण उत्सवात सहभागी होऊन सर्वधर्मसमभावाची शिकवण देणे हाच खरा नाताळ सण साजरा करणे होय.