सरपंच, उपसरपंचाचा निवडणुकीसाठी एक आठवडाभर देण्यात आल्याचे पंचायत संचालकांनी सांगितले. निवडून आलेल्या पंच सदस्यांनी काल विजयोत्सव साजरा केला. काल सकाळपासून विजयी उमेदवारांच्या मिरवणुका चालू होत्या.
पंचायत निवडणुका राजकीय पक्षांच्या बॅनरखाली लढविण्यात आल्या नव्हत्या. परंतु प्रत्येक आमदाराने आपआपल्या मर्जीतील उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यामुळे आमदारांचा आशीर्वाद असलेले अनेक उमेदवार विजयी झाले आहेत.
आता सरपंचपद कुणाला मिळावे यासाठी काल रात्री पासूनच प्रयत्न सुरू झाले आहेत. पंच सदस्यांना आपल्या बाजूने ओढण्यासाठी अनेक उमेदवारांनी आपल्या आमदाराला साकडे घातले आहेत.
यावेळी ८०.१२ टक्के मतदान झाले होते. मतदारांनी उत्साह दाखविल्याने टक्केवारीत वाढ झाल्याचे पंचायत संचालक तसेच राज्य निवडणूक आयुक्तांचे म्हणणे आहे. मतमोजणीनंतर कोणत्याही भागात संघर्षाचे वातावरण निर्माण होऊ नये म्हणून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे निवडणुकीप्रमाणेच मतमोजणीची प्रक्रियाही सुरळीत पार पडली.