धो-धो पावसामुळे पणजी शहर पाण्याखाली

0
3

काल दिवसभरात विश्रांती घेतलेल्या पावसाने रात्री 8 नंतर रुद्रावतार धारण करत पणजीसह विविध भागांत जोरदार सरी बरसल्या. जवळपास दोन-अडीच तास धो-धो पाऊस कोसळला. परिणामी पणजी शहर जलमय झाले. तसेच 18 जून रोडलगतच्या दुकानांसह अन्य काही भागांतील दुकानांतही पावसाचे पाणी
शिरले. रात्री उशिरापर्यंत पावसाचा कहर सुरुच होता. अधूनमधून जोरदार सरी कोसळत होत्या.

काल रात्री 8 च्या सुमारास अचानक पावसाने रौद्ररुप धारण करत जोरदार हजेरी लावली. मान्सूनच्या आगमनानंतर आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला नव्हता. कालच्या पावसामुळे पणजीतील 18 जून रोड, चर्च स्क्वेअर, कदंब बसस्थानक, पाटो-पणजी परिसर आदी ठिकाणी प्रचंड पाणी साचले होते. दोन तास अविश्रांत पडलेल्या पावसाने स्मार्ट सिटीच्या कामांचा, मान्सूनपूर्व कामांचा आणि गटार सफाईचा फोलपणा उघड केला. गटार व्यवस्था कुचकामी ठरल्यामुळे या पावसाचे पाणी 18 जून रोडवरील अनेक दुकानांत शिरले. त्यामुळे व्यावसायिकांना मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. शिवाय शहरात विविध ठिकाणी पाणी साचून वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.

मागील चोवीस तासांत केवळ 8.4 मिमी. अशा किरकोळ पावसाची नोंद झाली. फक्त मडगाव येथे 1.99 इंच आणि केपे येथे 0.51 इंच पावसाची नोंद झाली. दरम्यान, येथील हवामान विभागाने 28 व 29 जूनला काही भागात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. राज्यातील पावसाचे कमी प्रमाण चिंतेचा विषय बनला आहे. राज्यात आत्तापर्यंत 14.38 इंच पावसाची नोंद झाली. राज्यात सुमारे 54.5 टक्के पावसाची तूट आहे.