दोन दिवसांत मान्सून केरळात हवामान खात्याकडून अंदाज व्यक्त

0
1

पुढील दोन दिवसांत केरळमध्ये मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने काल व्यक्त केली. त्याचबरोबर मान्सून दक्षिण भारतातील काही भागांतही सक्रिय होण्याची शक्यता देखील हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

अरबी समुद्रात आग्नेयच्या दिशेने ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, त्याचबरोबर लक्षद्वीप व केरळच्या किनारपट्टीवर ढगाळ हवामान तयार झालेले आहे. येत्या 48 तासांत केरळमध्ये मान्सूनचे आगमन होण्यासाठीची स्थिती निर्माण झाल्याचे हे संकेत असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. याचबरोबर दक्षिण भारतातील काही भागांतही मान्सून धडकण्याची स्थिती निर्माण झाली आहे. तसेच नैऋत्य मान्सून अरबी समुद्र, संपूर्ण लक्षद्वीप मालदीव बेट, कोमोरिन विभाग, नैऋत्य दिशेचे विविध भाग, तसेच बंगालच्या उपसागराचा मध्यभाग आदी ठिकाणी देखील नैऋत्य मान्सून आगेकूच करण्यासाठीची पूरक स्थिती निर्माण झाली असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. त्याशिवाय ईशान्य राज्यातही मान्सूनचे आगमन होण्यासाठीची स्थिती निर्माण झाली आहे.