दोन ठिकाणच्या अपघातात तीन ठार

0
7

वास्कोत कदंबला दुचाकीची धडक बसून दोघांचा मृत्यू

वेर्णातील अपघातात तरुण ठार

काल रविवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून दोघेजण जखमी झाले आहेत. वास्कोत कदंब आणि दुचाकी यांच्यात काल संध्याकाळी अपघात झाला. त्यात दोघांचा मृत्यू झाला. तर वेर्णा येथे काल सकाळी टेम्पो आणि कार यांच्यातील अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. याप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.
वास्कोत कदंब बसखाली सापडून दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वरील सर्व व्यक्ती बिर्ला झुआरीनगर येथील रहिवासी असून ही घटना काल संध्याकाळी 6.30 वाजता घडली. एकाच दुचाकीवरून हे तिघेजण जात होते.

वास्को येथील बॉम्बे गारमेंटस मासळी मार्केटजवळ चार रस्त्यावर एका दुचाकी चालकाने कदंब बसला पाठीमागे ठोकर दिल्याने प्रकाश बिंद (30), या स्कूटर चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवरील अरुणकुमार सरोज (19) याचा इस्पितळात उपचारादरम्यान मृत्यू झाला. रितिश कुमार सरोज (29) ही दुचाकीवरील तिसरी व्यक्ती गंभीर जखमी झाली असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वरील सर्व व्यक्ती बिर्ला झुआरीनगर येथील रहिवासी आहेत. सदर दुचाकीवर (जीए 06 वाय 1372) तिघेजण होते. तर कदंब बस (जीए 03 एक्स 0097) मडगावहून वास्कोला आली होती.

सदर बस मार्केटमध्ये जात असताना दुचाकीने कदंबला पाठीमागून धडक दिली. यात दुचाकी चालक प्रकाश बिंद याचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोघांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी दाबोळी चिखली येथील उपजिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. नंतर उपचारादरम्यान अरुण कुमार सरोज याचा मृत्यू झाला. या प्रकरणी वास्को पोलीस पुढील तपास करीत आहेत.

वेर्णा येथे सिमेंटवाहू टेम्पो, कार अपघातात एकाचा मृत्यू

वेर्णा बायपास महामार्गावर सिमेंट नेणारा टेम्पो व कार यांच्यात समोरासमोर झालेल्या टक्करीत मॅक आर्थर परेरा (23) या उतोर्डा येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. रविवारी (दि. 30) सकाळी 6.15 वाजता ही घटना घडली. वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 6.15च्या सुमारास अपघाताची भीषण घटना घडली. वेर्णा बायपास जवळील महामार्गावरून सिमेंट नेणारा टेम्पो (जीए 08 यू 1451) मडगावहून पणजीच्या दिशेने जात होता. त्याचवेळी पणजीहून मडगावच्या दिशेने जाणाऱ्या कारने (जीए 08 एम 7600) येऊन समोरून टेम्पोला जबर धडक दिली. या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे चालक जखमी झाले. दोघांनाही उपचारासाठी मडगाव जिल्हा इस्पितळात नेले असता कारचालक मॅक आर्थर याचा इस्पितळात आणण्यापूर्वीच मृत्यू झाला. पोलिसांना अपघाताची माहिती मिळाताच त्यांनी त्वरित घटनास्थळावर दाखल होऊन अपघाताचा पंचनामा केला. वेर्णा पोलिस पुढील तपास करीत आहे.