दोनापावल जेटीचे उद्घाटन ५ डिसेंबरला : पर्यटनमंत्री

0
15

दोनापावल येथील नूतनीकरण करण्यात आलेल्या जेटीचे उद्घाटन येत्या ५ डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली.
पर्यटनमंत्री खंवटे यांच्या अध्यक्षतेखाली दोनापावल जेटीच्या विषयावर चर्चा करण्यासाठी काल एक बैठक घेण्यात आली. या बैठकीला महसूलमंत्री तथा पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात, पणजी महानगरपालिकेचे महापौर रोहित मोन्सेरात व इतरांची उपस्थिती होती.

या बैठकीत दोनापावल जेटीचे उद्घाटन, पार्किंग, वाहतूक आणि इतर विषयांवर चर्चा करण्यात आली. दोनापावल जेटी नूतनीकरणाच्या कामामुळे पर्यटक आणि नागरिकांसाठी मागील तीन वर्षे बंद आहे. जेटी बंद असल्याने पर्यटकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. जेटीच्या ठिकाणी असलेले व्यावसायिक व इतर विषयांचा आढावा घेण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या निर्देशानुसार जेटीचे योग्य पद्धतीने नियोजन केले जाणार आहे. तेथील रहिवासी आणि व्यावसायिकांचे प्रश्‍न लक्षात घेऊन तोडगा काढला जात आहे, असेही खंवटे यांनी सांगितले.