Home बातम्या देवदर्शन

देवदर्शन

0

– सुरेश वाळवे

ज्या त्रिमूर्तीचे चित्रपट पाहत पाहत आम्ही लहानाचे मोठेच नव्हे तर म्हातारेही झालो, त्यातील राज कपूर कधीच काळाच्या पडद्याआड गेला. गत रविवारी पहाटे देव आनंदनेही (८८) ‘एक्झिट’ घेतली. दिलीपकुमार अर्थातच वयोवृद्ध झाला असून गेली दीडदोन दशके सिनेसंन्यास घेऊन बीबी सायरा बानोच्या मदतीने दिवस कंठत आहे. या तिघांपैकी प्रत्येकाच्या अभिनयाची जातकुळी वेगळी. म्हणूनच असेल कदाचित, त्यांच्यामध्ये स्पर्धा किंवा खुन्नस निर्माण झाली नाही. वैजयंती माला तुझी की माझी, यावरून राज (संगम) अन् दिलीप (लीडर) यांच्यात किंचित चढाओढ लागली होती. पण ती डॉ. बाली यांच्याशी विवाहबद्ध होऊन तिसर्‍याच घरी सुखाने नांदू लागली तेव्हा प्रश्‍न मिटला. देवने असले कधी केले नाही. सुरैयाशी जमले नाही तेव्हा कल्पना कार्तिकशी लग्न अन् संसार करून मोकळा झाला.

राज हा ‘ग्रेटेस्ट शोमन.’ पण रात्ररात्र चालणार्‍या बॉलिवूडमधील तारांकित पार्ट्यांमध्ये कधी रमला नाही. दिलीपही त्यांपासून दूर राहायचा अन् देव तर कधी फिरकलाच नाही. आपण बरे की काम बरे, अशा वृत्तीने तो सिनेसृष्टीत सहा दशके वावरला. राज वा दिलीप यांच्यापेक्षा देव चिकणाचोपडा. चॉकलेट हिरो. केसांचा कोंबडा हे वैशिष्ट्य अन् त्याची कॉपी तेव्हा लक्षावधी भारतीय तरुण करत. राजेश खन्नाच्या हेअर स्टाइलची अशीच जादू पुढे युवकांवर पडली होती. आज टकलू राजेश विग वापरतो अन् देवसुद्धा. अर्थात चाणाक्ष नजरांना हे खटकते. उदाहरणार्थ, आपले विदेशमंत्री एस. एम. कृष्णा. भुरकट रंगाचा विग वापरतात. मात्र तोंडाचे बोळके झाले असले तरी वदनी कवळी नाही. राजेशचा विग तपकिरी तर देवचा काळ्याकुट्ट केसांचा. राजेशवर निवृत्ती लादली गेली तर देव अखेरपर्यंत अट्टाहासाने चित्रनिर्मिती, दिग्दर्शन आणि अभिनय करीत राहिला. मात्र ‘देश-परदेश’नंतर त्याच्याकडे यशाने पाठ फिरवली ती फिरवलीच. पण नाउमेद न होता तो वर्ष-दोन वर्षांनंतर रसिकांपुढे येत अन् नाकारला जात राहिला. तू हा फटका सोसतोस तरी कसा, असा प्रश्‍न विचारला असता ‘आपले चित्रपट लो बजेट असतात,’ असे उत्तर त्याने दिले होते. हो, नवोदित कलाकारांना ‘ब्रेक’च्या नावाखाली जवळजवळ फुकटात वापरून घेतले की झाले! झीनत अमान, टीना मुनीम, जॅकी श्रॉफ अशी त्याची काही ‘फाइंड्‌स’ क्लिक् झाली. बाकी कधी आली नि गेली ती कळलीदेखील नाहीत. पुत्र सुनैल यालाही त्याने संधी देऊन पाहिली. छे! राजेंद्रकुमार, राजकुमार, मनोजकुमार, शशी कपूर, मुमताज यांचे पुत्र, माला सिन्हाची कन्या आदींनाही यश लाभले नाही. देवचा ज्येष्ठ बंधू चेतन आनंदने कधी पडद्यावर झळकण्याचा सोस बाळगला नाही. तो केवळ निर्मिती- दिग्दर्शन यातच गुंतून राहिला. ‘धाकटी पाती’ विजय आनंद उत्कृष्ट दिग्दर्शक. पण त्याला कॅमेर्‍यापुढे येण्याचा मोह आवरला नाही. मात्र तिथे डाळ शिजली नाही. थोरला आणि धाकटा भाऊ आधी गेला; आठ दिवसांपूर्वी मधलाही!

काय योगायोग बघा. २००७ साली ‘इफ्फी’च्या उद्घाटनास आला असता देवची क्षणकाल गाठ पडली होती. शुक्रवार दि. २ रोजी त्याचा भाचा शेखर कपूर भेटला तोही ‘इफ्फी’च्या निमित्ताने. मुख्यमंत्र्यांनी बोलावले म्हणून त्यांच्या शासकीय निवासस्थानी, आल्तिनो बंगल्यावर गेला होता. सोबत डॉ. नंदकुमारचा बंधू गुरुदास होता. ‘मामाजी को लंडन ले जाया गया है’ अशी माहिती ‘बॅण्डिट क्वीन’, ‘मि. इंडिया’, ‘मासूम’वाल्या शेखरने दिली होती. त्यामुळे तो आजारी असल्याची बातमी कळली होती. म्हणूनच त्याच्या निधनाची वार्ता धक्कादायक ठरली नाही.

दुसरा योगायोग म्हणजे इंग्लंडच्या राजधानीतील ज्या ‘हॉटेल वॉशिंग्टन’मध्ये देवने अखेरचा श्‍वास घेतला, त्याला भेट द्यायची संधी पंधरा वर्षांपूर्वी ब्रिटनदौर्‍यात लाभली होती. इंद्रकुमार गुजराल यांच्याबरोबर तेव्हा इंग्लंडला गेलो होतो. आमचा मुक्काम दुसर्‍या, हॉटेलात होता तर तत्कालीन प्रधानमंत्री ‘वॉशिंग्टन’मध्ये उतरले होते. त्यांच्या पत्र परिषदेच्या निमित्ताने त्या भव्य हॉटेलात जाणे झाले होते. सुरुवातीस उल्लेखिलेल्या त्रयीपैकी दिलीपलाही भेटलो तो, तो ‘इफ्फी’च्या उद्घाटनास आला होता, तेव्हा. मात्र राजची कधी भेट झाली नव्हती.

‘गाइड’ हा निःसंशय देवचा सर्वोत्कृष्ट चित्रपट. सचिनदेव बर्मन यांची गाणी म्हणजे बहार आणि वहिदा रेहमानचा अभिनयसुद्धा. एका सामान्य युवकाच्या जीवनात एक गृहिणी येते. नृत्यांगना म्हणून तिच्या उत्कर्षास याचे व्यवस्थापकीय कौशल्य साहाय्यभूत ठरते. मात्र तिच्या प्रगतीमुळेच उभयतांमध्ये दरी निर्माण होऊन ‘दिन ढल जाये, लेकिन रात न जाये’ असा तळमळत राजूगाइड मद्याच्या पेल्यात दुःख बुडवतो. पुढे दुष्काळग्रस्त भागात पर्जन्यवृष्टीसाठी तो उपोषण करतो, असा गैरसमज पसरून त्याला खरोखरच भुके राहावे लागते अन् त्यातच अन्नपाण्याविना तडफडून प्राण जातात. इकडे त्याचवेळी वरुणराजाही प्रसन्न होतो, अशी कथा. चित्रपटाने देवला यशाच्या शिखरावर पोचवले. मात्र त्याची पुनरावृत्ती करू शकला नाही. याचे कारण ‘गाइड’ला गोल्डीचा सुवर्णस्पर्श झाला होता. किमानपक्षी निम्म्या यशाचा तो मानकरी होता. ‘ज्वेल थीफ’, ‘जॉनी मेरा नाम’ हेही देवचे यशस्वी चित्रपट. तरी ते तद्दन मसालापट/गुन्हेगारीपट होत. तिरकी हॅट, तिरछी नजर आणि खांदेपाडू दुडकी चाल या नेहमीच्या वैशिष्ट्यांनी परिपूर्ण. त्या मानाने नेपाळमध्ये चित्रित ‘हरे रामा, हरे कृष्णा’ हा सर्वार्थानी देवपट म्हणता येईल. पाश्‍चात्य ‘लूक्स’ असलेली झीनत ही देवची बॉलिवूडला भेट. पण तिला ‘एक्स्पोझ’ केली ती राजने. नंतर मंदाकिनीला.

दिलीप, राज यांचे सुरुवातीचे कृष्णधवल चित्रपट पहाल तर ते किती काटकुळे होते, उभयता दिसते. राजेश, अमिताभ यांचेही तेच. कपूर घराण्याचे वैशिष्ट्य म्हणजे यष्टीचे देह होणे. पृथ्वीराज, राज, शम्मी, शशी ते ऋषी, राजीवपर्यंत ही परंपरा चालत आलेली. मात्र देव कधी शरीराने आणि अहंकाराने फुगला नाही. उलट अंगाने सुकत गेला. इतका की, कपड्यांवर कपडे घालून, मफलर गुंडाळून ‘जॅमिंग’ करू लागला. ‘कौन बनेगा करोडपती’चा पाचवा भाग हल्लीच समाप्त झाला. ‘बिग बी’ रोज पोशाख बदलायचा. पण वैशिष्ट्य हे की, खांद्यांचा आक्रसलेपणा झाकण्याकरिता गुबगुबीतपणा आणलेला नि गळ्याच्या सुरकुत्या लपविण्याकरिता उपाय योजलेले. देवने मात्र सुरुवातीपासून ‘हाय कॉलर’चे शर्ट वापरले. तरी हल्लीहल्लीचे त्याचे रोड रूप पाहवत नव्हते. आपण त्याला चिरतरुण, एव्हरग्रीन वगैरे खूप म्हणू; निसर्गापुढे कोणाचे शहाणपण चालले आहे? त्या मानाने सत्तरीतील जीतेंद्र अजून कमी वयाचा वाटतो. अर्थात त्यानेही चित्रसंन्यास घेतलाय म्हणा.

लोकांना मृतावस्थेतील आपले दर्शन घडू नये, अशी म्हणे देवची इच्छा होती. ती नियतीने कशी पुरी केली ती बघा! ‘जानी’ राजकुमारचीदेखील हीच इच्छा होती अन् तींत चुकीचे काही नाही. काहीजण आप्तेष्टांचे अंत्यदर्शन हुकले, वगैरे म्हणत फुका हळहळतात. इतके काय असते त्यात खंतावण्याजोगे? नाकात कापसाचे बोळे, चेहरा पिवळा पडलेला, हात पोटावर ठेवलेले कलेवर बघून काय मिळते, कोणास टाऊक. आपल्या समाजातही एकेक विपरीतच चाली आहेत. पार्थिवाला आंघोळ काय, पुष्पहार काय, काय नि काय! तरी बरे, अजून बँडबाजासह अंत्ययात्रा निघत नाही. पार्थिवाशेजारी साखर ठेवण्यात येते अन् अंत्यदर्शनार्थी चिमूट शवाच्या तोंडात (?) घालतात. हा आणखी काय बिनडोकपणा? उत्तरपूजेनंतर गणपतीचे विसर्जन होते. आधी घरातून बाहेर काढण्यापूर्वी मूर्तीच्या हाती मोदक ठेवला जातो. अरे, उत्तरपूजा म्हणजेच प्राणहरण नव्हे काय? मग जी नुसती मातीची प्रतिमा उरलेली असते, तिला हा नैवेद्य की काय? नाही; जलाशयापर्यंतच्या प्रवासासाठी ती शिदोरी असावी. रागावणार नसाल तर एक सांगू का? देवाने समजा, खरोखरच नैवेद्य भक्षण केला असता तर कोणी त्याच्यापुढे खाद्यपदार्थ ठेवलेच नसते! तो खात नाही हे माहीत असते अन् नंतर ते आपल्या तोंडात पडायचे आणि पोटात जायचे असते, म्हणून ही प्रथा. तद्वत, एखाद्या पार्थिवाने ओठांवरून जीभ फिरवत साखर गिळून ‘आणखी थोडं तोंड गोड करा की साल्यानो’ म्हटले नाही हे नशीब. मधुमेहाने मेलो असलो तरी आता मला साखरेची काय भीती, असेही त्याला विचारता येईल.

खैर, यातील विनोद वगैरे सोडून दिल्यास असे दिसते की, लाखो, करोडो चाहत्यांच्या मनातील प्रतिमा जिवापाड जपण्याचे काही कलाकारांचे प्रयत्न असतात अन् ते उचित होय. आज जशी ऐश्‍वर्या सौंदर्यखनी म्हणून ओळखली जाते, तशी एके काळी साधनाची इमेज होती. पुढे ती देहाने सुटली, कुरूप बनली. पूर्वनायिका म्हणून कोणी सिनेपत्रकार मुलाखतीस गेल्यास ती एकच विनंती करायची. ‘कृपया माझी छायाचित्रे घेऊ/छापू नका. कारण रसिकांना हे रूप पाहवणार नाही. त्यांच्या डोळ्यांपुढे आणि मनात माझी जी प्रतिमा आहे, तीच कायम उरू द्या.’ म्हणूनच देवची इच्छाही काही चुकीची होती, असे नव्हे. वास्तविक एवढ्या संवेदनशील देवने म्हातारपणी पडद्यावर झळकण्याचा मोह टाळला असता तर अधिक बरे होते. आपल्याला तरुणपणातला नटखट देवच पुनःपुन्हा पाहायला आवडेल; हल्लीचे खप्पड रूप नव्हे. तीनचार वर्षांपूर्वी त्याचे आत्मचरित्र प्रकाशित झाले. ते खपावे म्हणून काही क्लृप्त्या योजणे ओघानेच आले. मात्र देव कधी वादग्रस्त बनला नाही, हे मान्य करावे लागेल. आणीबाणीनंतर स्वतःचा राजकीय पक्ष काढणारा, फाळणीच्या विरोधात बोलणारा अशीही देवची काही रुपेरी पडद्याबाहेरील रूपे होत. दोन वर्षांपूर्वी वाढदिवशीच (भले भले ‘वाढदिवसा दिवशी’ म्हणतात) मुंबईत ‘गेट वे ऑफ इंडिया’ परिसरात चित्रीकरण करीत होता. रसिकांनी त्याला शुभेच्छा दिल्या. वाढदिवसही घरी कुटुंबियांच्या सहवासात, केकबिक कापून, मेणबत्त्या विझवून साजरा करणार्‍यांपैकी हा अवलिया नव्हता. तो वर्कोहोलिक होता, हे शंभर टक्के अन् दीर्घ काळ आनंदी चेहर्‍याने लोकान्तात वावरूनदेखील शेवटपर्यंत एकान्तप्रिय होता, हेदेखील.