Home बातम्या दुर्गामाता भक्तीचा शारदीय नवरात्रौत्सव

दुर्गामाता भक्तीचा शारदीय नवरात्रौत्सव

0

रमेश सावईकर

नवरात्रहा नऊ दिवस चालणारा हिंदूंचा एक महत्वपूर्ण उत्सव आहे. आश्‍विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणारा हा उत्सव नवमीपर्यंत चालतो. दुसर्‍या दिवशी म्हणजे आश्‍विन शुद्ध दशमी विजया दशमी’ ‘दसरासंबोधून साजरा होतो. शरद ऋतुच्या प्रारंभी येणारा नवरात्रौत्सव शारदीय नवरात्रया नावानेही संबोधला गेला आहे. दुर्गामाता (देवी) चा हा उत्सव विविध धार्मिक विधींसह भारतातील बंगाल, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा या राज्यांत प्रामुख्याने मोठ्या थाटात आणि भक्तीभावाने साजरा होतो. दुर्गामातेची महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती ही तीन रूपे. नवरात्रीचे पहिले तीन दिवस महाकालीची पूजा व प्रार्थना होते. त्यामुळे आपणातील सर्व अपवित्र गोष्टींचा नाश होतो अशी भावना बाळगून कालीदेवीची भक्त सेवा करतात. पुढचे तीन दिवस (, ५ व ६) ‘महालक्ष्मीच्या रूपात दुर्गामातेची पूजा होते.

महालक्ष्मी ही संपत्ती देणारी देवता म्हणून तीन दिवस भक्त तिची मनोभावे पूजाप्रार्थना करतात. सप्तमी, अष्टमी व नवमी या तीन दिवशी सरस्वतीदेवीचा उत्सव साजरा केला जातो. नवमी तिथी ही महानवमी संबोधली जाऊन विशेष विधीसह नवरात्रौत्सवाची सांगता केली जाते.

दुर्गादेवीने वेगवेगळे अवतार घेऊन शुंभनिशुंभ, रक्तबीज, महिषासूर आदी राक्षसांशी नऊ दिवसरात्र युद्ध करून त्यांचा वध केला. म्हणून नवरात्रउत्सव साजरा करण्यात येतो. विजया दशमी हा दुर्गादेवीचा विजयाचा दिवस. विजया दशमी किंवा दसरा या नावाने संबोधलेला असून तो मोठ्या उमेदीत, उत्साहाने साजरा करण्याची प्रथा देशातील अनेक राज्यांत आहे. राम, कृष्ण, खंडोबा इ. देवताचेही नवरात्रौत्सव असतात. परंतु देवीच्या शारदीय नवरात्राचा उत्सव भारताच्या बहुतेक सर्व भागात रूढ आहे. ‘नवरात्रहा एक कुलाचार असल्याने त्यामध्ये विविधता दिसून येते. दुर्गा किंवा काली ही ब्राह्मणांचीच नव्हे तर, क्षत्रियांचीही कुलदेवता आहे.

नवरात्रौत्सवाची सुरूवात आश्‍विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापनाकरून होते. लहानशा मातीच्या ढीगावर किंवा थर मांडून त्यावर गहू पेरून मातीचा घट (किंवा ताम्रघट) ठेवतात. त्यावर देवीची स्थापना करतात. नऊ दिवस देवीची स्थापना करतात. नऊ दिवस देवीची पूजा करतात. ‘नवरात्रौत्सवहा सार्वजनिक उत्सव देवीच्या मंदिरामध्ये विशेष धार्मिक विधी, संगीत, सांस्कृतिक कार्यक्रमांसहित भक्तीभावाने थाटामाटात सर्वत्र साजरा करण्यात येतो. रोज देवीला फुलांची माळ घालणे, कुमारिकेचे पूजन करणे, अखंड दीप लावणे, उपवास करणे, सप्तशतीचा पाठ वाचणे, ब्राह्मणसुवासिनींना भोजन घालणे आदी आचार वेगवेगळ्या कुळांमध्ये पाळले जातात.

नवरात्रौत्सवानिमित्त घटस्थापना करून अखंड नऊ दिवसरात्र दीप पेटवता ठेवणे यामागे विशेष श्रद्धाभक्तीभाव आहे. ‘घटहा विश्‍वरूप मानून पेटता दीप हे आपली भक्ती दुर्गामातेपर्यंत पोचवण्याचे प्रकाशरूपी माध्यम समजून तशी प्रथा किंवा विधी रूढ झाली. दुर्गामातेची नऊ विविध रूपे (अवतार) पूज्यवत् मानून नऊ दिवस हा उत्सव साजरा केला जातो.

बंगालमध्ये कालीदेवीचे उपासक अधिक आहेत. त्यामुळे तेथे नवरात्र उत्सव विशेष प्रकारे साजरा केला जातो. बंगालमध्ये नवरात्रौत्सवास दुर्गापूजा किंवा पूजाउत्सव म्हणतात.

कर्नाटकमध्ये नवरात्रौत्सवाच्या समाप्तीचा दुसरा दिवस म्हणजे दसरा’ (विजया दशमी) विशेष प्रकारे साजरा केला जातो. ‘महिषासूर मर्दिनीच्या दुर्गामातेचा हा उत्सव संबोधून साजरा करतात. तामिळनाडू, नेपाळ, गुजरात, महाराष्ट्र व गोवा या इतर राज्यातही वेगवेगळ्या रूढी, पद्धती, विधी यांसह नवरात्रौत्सव साजरा होतो. गुजरातमध्ये नवरात्रौत्सवात गरबा नृत्यलोकसमुहातर्फे मोठ्या उमेदीने व थाटात सादर केले जाते. शिवाय दांडीया नृत्यही विशेष महत्त्वपूर्ण आहे.

महाराष्ट्रात विशेषतः कोंकण प्रदेशात नवरात्रौत्सवास सार्वजनिक महत्त्व प्राप्त झाले आहे. सार्वजनिक ठिकाणी मंडप उभारून दुर्गादेवीची विधीवत् स्थापना करून आश्‍विन शुद्ध प्रतिपदा ते नवमीपर्यंत दरदिवशी पूजा, आरत्या, भजन, किर्तन, संगीत व रात्रौ दांडीया, गर्बा आदी नृत्यांचे कार्यक्रम ही उत्सवाची वैशिष्ट्ये ठरलेली आहेत. गोव्यात नवरात्रौत्सव विशेष उत्साहाने, धार्मिक विधींनी थाटात साजरा होतो. अंत्रूज महाल (फोंडा तालुका) हे नवरात्रौत्सवाचे राज्यातील मुख्य केंद्र होय. पूर्वी केवळ देवींच्या मंदिरातच नवरात्रौत्सव व्हायचा, आता देवांच्याही मंदिरात हा उत्सव करण्यात येतो. मंदिर आकर्षक रंगरंगोटी करून सजवणे, आकर्षक विद्युत रोषणाई करणे, देवीची पालखीतून मिरवणूक काढणे, देवीची उत्सवमूर्ती सजवलेल्या मखरात बसवून त्या मखराला पूजारी झोके देतात, त्यास मखरोत्सवअसे संबोधले जाते. भक्तभाविक देवीचा प्रसाद व कौल घेण्यास मोठ्या मंदिरात येतात. गोव्यात वास्तव्य केलेल्या दशदेवी (दहा बहिणी) ज्यांची नावे, शांतादुर्गा, आर्यादुर्गा, महालसा, कात्यायनी, महामाया, कामाक्षी, विजयादुर्गा, भूमिका, महालक्ष्मी आणि नवदुर्गा अशी आहेत. या देवींच्या मंदिरात नवरात्रौत्सव विशेष पद्धतीने व थाटाने साजरा होतो. देवीची विधीयुक्त पूजा, भजन, आरती, प्रार्थना, तीर्थप्रसाद, सप्तशतीपाठ वाचन, पुराणवाचन, सायंकाळी किर्तन, रात्रौ मखरोत्सव, पालखी मिरवणूक तद्नंतर संगीत व सांस्कृतिक कार्यक्रम दांडिया नृत्य अशा स्वरूपात नऊ दिवस हा उत्सव आनंदाने साजरा करण्यात येतो. दहाव्या दिवशीही दसराविशेष भक्तीभावाने दुर्गामातेची पूजाप्रार्थना होऊन साजरा करण्यात येतो. शारदीय नवरात्रौत्सव शरद ऋतूत निसर्गात नवचैतन्य येते. त्याप्रमाणे धार्मिक विधी व भक्तीभावालाही चैतन्यरूप देणारा ठरला आहे.