Home बातम्या दिवाळी आणि संस्कृतीचा नवा अर्थ

दिवाळी आणि संस्कृतीचा नवा अर्थ

0

– विश्राम गुप्ते

दिवाळीच्या निमित्ताने आपल्या संस्कृतीच्या अंतरंगात शिरून बघू या. आमचे सणवार, उपासतापास, जत्रा आणि ङ्गेस्तं इत्यादी आपल्या पारंपरिक संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. पण काळ बदलला तसा या संस्कृतीचा अर्थही बदलू लागला. आज आपण ‘ग्लोबलाईज्ड’ जगात राहतोय. या जगातल्या गमतीजमती बघू या.

२०१२ सालच्या जगात ‘मुक्त अर्थव्यवस्था’ आणि ‘जागतिकीकरण’ या दोन आर्थिक प्रक्रियांना अतोनात महत्त्व आलं आहे. त्यामुळे जगण्याचे जुने अर्थ बदलले. नव्या जगात मिडियाची म्हणजे टेलिव्हिजन आणि इंटरनेटची जोरदार ‘बॅटिंग’ सुरू आहे. नवं जग सळसळतं आहे. अशा सळसळणार्‍या जगात संस्कृतीचे जुने अर्थ बाद ठरून नवे अर्थ रुजू होत आहेत. हे आपल्याला धुसरपणे जाणवत असते, पण हे अर्थ नेमके केव्हा आणि कसे बदलले हे कळत नसते. दिवाळी म्हणजे घराची साङ्गसङ्गाई, झाडलोट, रंगरंगोटी, खरेदी आणि नव्याचं स्वागत. हा जुना अर्थ होता.

नव्या अर्थाने दिवाळी म्हणजे पाच दिवस नॉनस्टॉप मौजमजा. नव्या जगात मौजमजेचं समीकरण प्रत्येक क्षेत्रात रूढ झालं आहे. दिवाळी म्हणजे आनंदाला पारावार नाही ही परंपरागत श्रद्धा आहे. बदललेल्या नव्या काळात या श्रद्धेची चिकित्सा करणे गरजेचे आहे. तिसेक वर्षांपूर्वी पारंपरिक समाजात सणांचं महत्त्व होतं. या निमित्ताने घरात गोडधोड शिजत होतं. म्हणून दिवाळीचं अप्रूप होतं. काळ बदलला. नव्या काळात वर्षातले तीनशे पासष्ट दिवस चमचमीत खाणार्‍या सुखवस्तू आणि ‘खवय्या’ समाजाला दिवाळीचं अप्रूप खरोखर वाटत असेल का? असा प्रश्‍न विचारणे वावगे नाही.

घरोघरी मातीच्या चुली आणि घरोघरी टेलिव्हिजन सेट्‌स. त्यामुळे सुखवस्तू समाज एकदिलाने, एकमुखाने एकच घोषणा देणं शिकला आहे : ‘आम्ही सारे खवय्ये!’ त्यात दिवाळीची भर. म्हणजे वजनात भर. जॉगिंगच्या मात्रेत भर. कंबरेच्या घेरात भर. डॉक्टरांच्या बिलात भर.

पंधरावीस वर्षांत आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी अतोनात बदलल्या. साधं खाणंपिणं इतिहासजमा झालं. समृद्धीचं द्योतक असलेल्या ‘शुगर’ आणि ‘ङ्गॅट्‌स’ या दोन पाश्‍चात्त्य बहिणी स्वयंपाकघरात कायम राहायला आल्यात. स्वयंपाकघरात बिझी राहणार्‍या घरातल्या ‘सुगरण’ बाईवर परंपरेचा बोझा हलका होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतोय. जितका समाज सुखवस्तू तितका तो परंपराभिमानी. आणि नवी परंपरा कुठली? तर ‘आम्ही सारे खवय्ये’ ही! संस्कृतीचा नवा अर्थ आहे, खाद्यसंस्कृती. खवय्या समाजाने खरं तर दिवाळीच्या निमित्तानं साधंसुधं खाऊन दिवाळी साजरी करण्याची आवश्यकता आहे. पण नव्याचं स्वागत करणार्‍यांपैकी किती जणांना हा विचार मंजूर होईल? नव्याचं स्वागत सांकेतिक परंपरेची रांगोळी घालून न करता असांकेतिक कृतीची रांगोळी घालून करता येते. घरावर नुसती दिव्याची रोषणाई करून घरातला वैचारिक अंधार नष्ट होत नाही.

‘ङ्गेस्टिव्हल ऑङ्ग लाइट्‌स’ म्हणजे ङ्गक्त बल्बांची खरेदी आणि विजेच्या बिलात वाढ असे समजणारी माणसे दिवसेंदिवस वाढताहेत. दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय असं म्हटलं जातं. आपण याचा शब्दशः अर्थ घेऊन घरोघरी शेकडो वॅट्‌सच्या बल्बांची रोषणाई करतो. सणाचा प्रतीकात्मक अर्थ काव्यात्मक आणि समृद्ध असतो. त्याकडे दुर्लक्ष करून आनंदग्रस्त समाज सणाला ङ्गक्त खाणं-पिणं, लेणं, ङ्गिरणं, दाखवणं, दाखवेगिरी करणं या वरपांगी गोष्टींना महत्त्व देतो.

दिवाळीत मध्यमवर्गीय सुखवस्तू समाज दिवाळसणाच्या निमित्ताने आपसात खूप देवाणघेवाण करतो. त्याला परंपरेचे वलय असते. म्हणजे ज्या जावयाच्या कपाटात तीस शट्‌र्ंस आणि पंचवीस पँट्‌स असतात, त्यांत त्याचे सासूसासरे आणखीन एका रेडिमेड शर्टाची किंवा पँटची भर घालतात. ज्या सुनेच्या वार्डरोबमध्ये पन्नास-पंचावन साड्या असतात, त्यांत तिचा श्रीमंत भाऊ, नवरा, बाप किंवा सासरा छपन्नाव्या साडीची भर घालतो. दिवाळीत नवी साडी, नवा शर्ट, नवा टेलिव्हिजन, नवी कार, नवी वॉशिंगमशीन घेतलीच पाहिजे असा कायदा आहे हे समजून लोकं खरेदीसाठी रस्त्यांवर ट्रॅङ्गिकजॅम करतात. हे व्यवहार परंपरेच्या, संस्कृतीच्या नावाने सुरू असतात. शर्टवाल्याकडे शर्ट, साडीवालीकडे साडी, पैसेवाल्याकडे पैसा जातो. लक्ष्मीची ही आपसातली देवाणघेवाण खरं म्हणजे निरर्थक असते. त्यामुळे गरजूची गरज न भागता, तृप्त माणसं अधिक तृप्त होतात. संस्कृतीचा नवा अर्थ म्हणजे उपलब्धीचं अजीर्ण.

दिवाळी म्हणजे धनत्रयोदशी. म्हणजेच सोनं-नाणं खरेदी करण्याचा पारंपरिक रिवाज. एरवी कायदे कानून झुगारून देणारा सुखवस्तू समाज या रिवाजाला कायदा समजून त्याचं मनोभावे पालन करतो. दिवाळीच्या तोंडावर सोनं खरेदीचा नियम तो न चुकता पाळतो. ही गंमत दिवाळीच्या तोंडावर घरोघरी बघायला मिळते. सोनं ही भारतीय मनात सतत दबा धरून असलेली आर्ष वासना आहे. तिचं मूळ दाखवेगिरीत आहे की माणसाच्या अंगभूत असुरक्षिततेत यावर मानसोपचार तज्ज्ञच मत देऊ शकतील.

भारतीयांच्या जाणिवेत आणि नेणिवेत सोन्याचं स्थान अढळ आहे. काळ बदलला तरी या स्थानात बदल झालेला नाही. माणसाला सुखी होण्यासाठी सोनं हवंच अशी सांस्कृतिक समजूत दिवसेंदिवस बळावतेय. म्हणून गोव्यात ङ्गवामन हरी पेठेफ यांची ब्रँच सुरू झाली म्हणजे गोव्यात जणू काही ङ्गहायड्रोइलेक्ट्रिकल पॉवर प्रोजेक्टफ सुरू झाला असं सुखवस्तू समाज समजू लागला. संस्कृतीचा नवा अर्थ आहे, वामन हरी पेठे.

दुसरी गंमत म्हणजे सोन्याचं ग्लॅमर कमी होऊन हिरे आणि प्लॅटिनमची क्रेझ वाढतेय. सोनं किमान दिसायला तरी सोनेरी असतं, प्लॅटिनम तर दिसायला पॉलिश उडालेल्या स्टीलसारखं दिसतं. पण ते सोन्याहून महाग म्हणून त्याची क्रेझ. हीच गोष्ट हिर्‍यांची. हिर्‍यासारखा दिसणारा काचेचा खडाही सुंदरच दिसतो. पण काचेला किंमत नाही, हिर्‍याला भाव. म्हणून हिर्‍यांची क्रेझ.

सुखग्रस्त समाज हा क्रेझी समाज असतो. हिरा घातल्याने सर्वांग उजळून निघत नाही. हिर्‍याची अंगठी हिर्‍याची आहे हे सांगावं लागतं. तरी लोकांना हिर्‍याचं अतोनात महत्त्व वाटतं. दिवाळीच्या निमित्ताने अंधारावर विजय मिळवायचा असेल तर हिर्‍याला दाखवेगिरीचं माध्यम म्हणून ओळखावं लागतं. या दाखवेगिरीवर नियंत्रण आणणं म्हणजे प्रकाश. संस्कृतीचा नवा अर्थ आहे- डायमंड्‌स आर ङ्गॉर एव्हर. दिवाळी म्हटली की ङ्गटक्यांची एक डोकेदुखी असते. या बाबतीत मुंबई-पुण्याच्या तुलनेत गोवा सुसंस्कृत आहे. रस्त्यांवर ङ्गटाके ङ्गोडण्याचं प्रमाण गोव्यात तरी कमी आहे. मुंबई-पुण्यात दिवाळीच्या सायंकाळी रस्त्यावर पाय टाकायला भीती वाटते. देशभरात रस्तोरस्ती सांस्कृतिक अतिरेक्यांचे बॉंबस्ङ्गोट्‌स सुरू असतात. मोठा आवाज केल्याने आनंद दुणावतो असं आनंदग्रस्त समाज समजतो. संस्कृतीचा नवा अर्थ आहे धडामधूम!!

दिवाळी म्हणजे नरकासुर दहन. महाराष्ट्रात या दहनाची प्रथा नाही. गोव्यात नरकासुराला जाळण्याच्या स्पर्धा होतात. गेल्या विसेक वर्षांत नरकासुरांना स्पॉंसरशिप्स मिळू लागलीय. हजारो किंवा लाखो रुपयांची पारितोषिके या स्पर्धेच्या निमित्ताने वाटली जातात. नरकासुर दहनातला प्रतीकात्मक अर्थ हरपला. प्रत्यक्ष जाळण्याच्या कृतीला महत्त्व मिळालं. संस्कृतीचा प्रतीकात्मक अर्थ काव्यमय आणि समृद्ध असतो. पण त्याकडे दुर्लक्ष करून शब्दशः अर्थाची चलती सुरू झाली की संस्कृतीचा अर्थ बदलू लागतो आणि नरकासुर दहनाच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. संस्कृतीचा नवा अर्थ आहे- प्रायोजित नरकासुर दहन.

दिवाळीच्या निमित्ताने आम्ही संस्कृतीचा पारंपरिक काव्यात्मक अर्थ आत्मसात करणार आहोत की दाखवेगिरीच्या संस्कृतीवर शिक्कामोर्तब करणार आहेत? समाज म्हणून आम्ही आत्मप्रवण असणार आहोत की आत्मप्रेमी असणार आहोत? याचा निर्णय प्रत्येकाला घ्यायचा आहे. बहिर्मुख आनंदग्रस्त समाजाने अंतर्मुख होण्याची गरज निर्माण झाली आहे. आतला प्रकाश बाहेर सांडेल तेव्हाच खरी दिवाळी साजरी करता येईल.