– सुरेश वाळवे
काही व्यक्ती वाद घेऊनच जन्माला येत असाव्यात. त्यांची प्रत्येक उक्ती वा कृती ही वादग्रस्त बनत असते. गोव्यातही अशी काही मंडळी आहेत. सार्वजनिक क्षेत्रात वावरणारी माणसे असतात, तेव्हा त्यांची प्रत्येक हालचाल हजारो डोळे टिपत असतात. त्यामुळे त्यांनी तर फारच सावधगिरी बाळगावी, अशी अपेक्षा असते. परंतु वृत्तीच बेछूट, बेफिकीर असेल, तर काय?
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हेही नेहमी वादविषय बनत असतात. एके काळी ते भाजपचे राष्ट्रीय महासचिव होते. परंतु त्यावेळी फारसे झोतात आणि झोकात नव्हते. मात्र अकरा वर्षांपूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री बनले तेव्हापासून वादविषयांनी त्यांची पाठ सोडलेली नाही. फेब्रुवारी २००२ अखेरीस जेव्हा आपले मनोहर पर्रीकर चांगली चालती बोलती विधानसभा मांडवीत विसर्जित करीत होते, नेमक्या त्याच सकाळी तिकडे गुजरातेत गोध्रा अग्निकांड घडत होते. त्यानंतर साधारण पंधरा–वीस दिवस सारा गुजरात भयानक धार्मिक दंगलींमध्ये होरपळून निघत होता. त्यांची तुलना केवळ स्वातंत्र्योत्तर हिंदू– मुसलमान दंगे, इंदिराहत्येनंतरचे शीखकांड आणि बाबरी पाडापाडीनंतरच्या मुंबई दंग्यांशीच करता येईल. गुजरातमधील दंगलींना मोदींचा मूक पाठिंबा होता, असा अनेकांचा आजही आरोप असून ‘हिरव्यां’ना जन्माचा धडा शिकवण्यासाठी त्यांनी ‘भगव्यां’ना आणि पोलिसांना ‘ग्रीन सिग्नल’ दिला होता, असा संशय आहे.
या महिन्याच्या मध्यास सर्वोच्च न्यायालयाने एका दंगल प्रकरणी असा निवाडा दिला की, ट्रायल कोर्टानेच सुनावणी घेऊन मोदीबिदींच्या भूमिकेची छाननी करावी. मुख्यमंत्र्यांना निश्चितच हा मोठा दिलासा आहे. कारण त्यांना सर्वोच्च न्यायालय अद्दल घडवणार, असाच सगळ्यांचा कयास होता. हिटलरला ज्याप्रमाणे ज्यूंच्या निर्दालनाकरिता क्रूरकर्मा संबोधले जायचे, तशीच काहीशी प्रतिमा येथे मोदींच्या बाबतीत बन(वि)ली होती. त्यामुळे सुप्रिम कोर्टाच्या निकालाकडे आशेने डोळे लावून बसलेल्यांची निराशा झाली. ही संधी मोदी न घेते तर ते राजकारणी कसले? टेनिसमध्ये ‘ऍड्व्हान्टेज’ नावाचा प्रकार असतो. येथे मोदींना तशी थोडी अनुकूलता निर्माण होताच त्यांनी तिचा लाभ उठवायचे ठरवले अन् १७ ते १९ असे तीन दिवस ‘सद्भावना उपवास’ केला. मेमध्ये योगगुरू बाबा रामदेव यांनी दिल्लीमध्ये भ्रष्टाचारविरोधात आमरण अनशन केले होते. तो जसा शाही मामला होता, तसाच मोदींचादेखील. बाबा करोडपती तर मोदी सत्ताधीश. तेव्हा वातानुकूलित सभागृहामध्ये अन् बड्याबड्या निमंत्रितांच्या हजेरीत आणि प्रसिद्धीच्या झोतात हा तीन दिवसीय ‘सोहळा’ पार पडला. अण्णा हजार्यांच्या उपोषणामुळे आपल्या ‘मिडिया’चा पंधरा दिवसांचा प्रश्न सुटला होता. मोदींच्या उपवासामुळे निदान तीन दिवसांची काळजी मिटली.
ऑगस्टचा उत्तरार्ध ‘मैं हूँ अन्ना, तू है अन्ना, सारा(?) देश है अन्ना अन्ना,’ ‘भारत माता की जय,’ ‘इन्किलाब झिंदाबाद,’ ‘जय हिंद’च्या नारेबाजीने घुमला होता. तशी घोषणाबाजी अहमदाबादेत झाली नाही. (या शहराचे नाव बदलायचे अजून कसे मोदीजींना सुचलेले नाही? कारण औरंगाबादचे नामकरण शिवसेनेने आपल्यापुरते ‘संभाजीनगर’ केले आहे. मध्यंतरी गोव्यातही एका दैनिकाने चार दशकांपूर्वी वास्कोचे असेच बारसे केले होते. परंतु आता त्यालाही त्याचा विसर पडलेला दिसतो.) परंतु सहा करोड गुजरात्यांच्या अस्मितेवर मात्र पुनःपुन्हा फुंकर मारण्यात आली. आपला उपवास हा ‘ऑल इंडिया इव्हेन्ट’ असल्याने मोदींनी नांदी आणि भरतवाक्य राष्ट्रभाषेत केले. याउलट या पंचतारांकित उपवासाच्या विरोधात ‘कौंंटर फास्ट’ला बसलेल्या कॉंग्रेजी शंकरभाय वाघेला वगैरे मंडळीनी गुजरातीत भाषणे केली. तुम्ही गुजरात विद्यापीठाच्या बंदिस्त, थंडगार सभागृहात उपवास नावाचा फार्स करताय तर आम्ही गांधीजींच्या साबरमती आश्रमाबाहेरील पदपथावर प्रतिउपोषणाचे नाटक दाखवणार, असा हा एकीकडे कुरघोडी अन् दुसरीकडे खिल्ली उडवण्याचा प्रकार होता. वास्तविक अशा डोकेबाजीसाठी कॉंग्रेस फारशी ओळखली जात नाही. कदाचित दीर्घकालीन सत्तेची चरबी अंगावर चढल्याने मेंदूही सुस्तावलेला असेल. कारण ड्रामेबाजी ही भाजपची खासीयत. यावेळी भूमिका बदलल्या, एवढेच. एक गोष्ट खरी की, मोदींच्या उपवासाची जेवढी अष्टौप्रहर दखल मिडियाने घेतली, तेवढी वाघेलांच्या वाट्याला आली नाही. अर्थातच, अपेक्षितही नव्हती.
जनलोकपाल विधेयकाच्या मुद्द्यामुळे सारा देश भ्रष्टाचाराविरोधात पेटून उठला. जनतेच्या मनात जो अंगार खदखदत होता, त्याला वाट मिळाली. अण्णांनी हा जो चमत्कार करून दाखवला, त्याची तुलना महात्माजींच्या स्वातंत्र्यपूर्व आणि १९७४–७५ च्या जयप्रकाश (नवनिर्माणी) नारायणी आंदोलनाशीच होऊ शकते. नैतिकेचे सामर्थ्य किती प्रचंड असते, त्याची ही तिन्ही उदाहरणे. परवा पाकिस्तानातून राळेगणसिद्धीच्या ‘संता’ला निमंत्रण आले, त्यावरून देशाच्या सीमा ओलांडून ही चळवळ शेजारी पोचल्याचे सिद्ध होते. अशाच प्रकारे मोदीजींच्या प्रशासकीय कौशल्याची तारीफ करून अमेरिकेने त्यांना २०१४ च्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपचा प्रधानमंत्रिपदाचा उमेदवार ठरवूनही टाकले! अडीच वर्षांनी जी ‘बॅटल ऑफ बॅलट’ होईल, तींत कॉंग्रेसतर्फे युवराज राहुल गांधी प्रोजेक्ट केले जातील, असेही म्हटले. साठी ओलांडलेले मोदी अन् चाळिशीतील सोनियापुत्र– दोघेही अविवाहित, हा एक योगायोग.
आता प्रधानमंत्रिपदाच्या उमेदवारीचा विषय आलाच आहे तर दोन शब्द अडवाणींविषयी. कॉंग्रेस त्यांची टिंगल ‘पर्मनंट प्राइम मिनिस्टर इन वेटिंग’ अशी करते. डॉ. मनमोहन सिंग अबोल. ते मुळात राजकारणी नव्हेत. ते अर्थतज्ज्ञ, शिक्षक, प्रशासक. त्यांची खिल्ली भाजपच्या सुषमा स्वराज यांनी ‘एक तो प्रधानमंत्री बोलते हैं कम; और जब बोलते हैं तो कॉं. पार्टी में भी उनकी कोई सुनता नहीं’ अशी हल्लीच लोकसभेत उडविली होती. अटलजी–अडवानीजी उत्तम वक्ते. वाजपेयी तर वक्ता दशसहस्रेषु. दुर्दैवाने पक्षाघातामुळे त्यांची वाचा सध्या बाधित झाली आहे. अडवानीजी चारपाच वर्षांपूर्वी पाकमध्ये जाऊन जिनांविषयी जे स्तुतिपर बोलले, ते अंगलट आले. इतके की, रा. स्व. संघाने त्यांना शिक्षा तर दिलीच; शिवाय प्रधानमंत्रिपदाच्या दाव्यापासून दूरही केले. त्यामुळे एकदा डॉ. मनमोहन सिंग यांनाही हुरूप येऊन ‘नोट्स फॉर वोट्स’ नावाने कुप्रसिद्ध असलेल्या २००८च्या अविश्वास ठरावावरील चर्चेला उत्तर देताना लोकसभेत तत्कालीन विरोधी नेत्याला शालजोडीतील अहेर दिला होता. प्रधानमंत्री म्हणाले होते की, ‘या परिपक्व वयात अडवानीजींनी आपला स्वभाव/विचार बदलावेत, असं मी म्हणणार नाही. परंतु निदान त्यांनी आपला ज्योतिषी बदललेला बरा.’ चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलेच असेल की, प्रधानमंत्री बनण्याच्या लालजींच्या आकांक्षेला मारलेला हा टोमणा होता. गोव्यातदेखील ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून गेली वीस वर्षे उल्लेख होणारा एक नेता आहे. पासष्टीतील या नेत्याचे भविष्यात कदाचित स्वप्न साकार होईलही; पण ८३ वर्षीय अडवानीजींची बस चुकली ती चुकलीच. कारण ते आता भ्रष्टाचारविरोधी रथयात्रेवर निघणार आहेत तर त्यासाठी आशीर्वाद देण्यापूर्वी सरसंघचालकांनी (खरे तर हा शब्द ‘संघसरसंचालक’ असा नको का?) ‘प्रधानमंत्रिपदाची आशा सोडा; तरुणांकडे सूत्रे जाऊ द्या’ अशी म्हणे प्रच्छन्न अट घातली. संघ, जनसंघ, भाजप, कार्यकर्ते आणि देश यांनी आपल्याला प्रधानमंत्रिपदापेक्षाही अधिक काही दिल्याचे सांगून अडवानीजींनी स्वतःचे समाधान करून घेतले आहे. पण ‘७ रेस कोर्स’च्या रेसमधून ते बाहेर पडले ते पडलेच!
बॅक टु मोदी. त्यांचा उपवास वादग्रस्त ठरला अन् त्यातील काही प्रसंगदेखील. एका सुफी मौलानाने त्यांना मुस्लिम टोपी घालण्याचा आग्रह केला. प्रस्ताव मोदींनी नम्रपणे नाकारून त्यांच्याकडून शाल तेवढी घेतली. सभागृहाबाहेर पडताच ‘ये इस्लाम का अवमान है’ म्हणायला मौलाना विसरला नाही. शिवसेनेने मात्र मोदींचे कौतुकसुद्धा केले. नाही तरी सद्भावना व सर्वधर्मसमभाव यांसाठी हल्ली मोदींनी मुस्लिमांना चुचकारण्याचे धोरण अवलंबिल्याने संघ म्हणे थोडा नाराज आहे. एके काळी भाजपवाले समाजवादी पक्षप्रमुखाचे वर्णन त्याच्या मुस्लिम तुष्टीकरणासाठी ‘मौलाना मुलायम’ असे करायचे; परवा कोणीतरी नरेंद्रभायना ‘मियॉं मोदी’ म्हटले. रमझानच्या महिन्यात दिल्लीतील सायंकालीन इफ्तार पार्ट्यांमध्ये अनेक मुस्लिमेतर पुढारी या ‘स्कल कॅप्स’ परिधान करतात, हे आपल्याला ठाऊक असेलच. शिया, सुन्नी, खोजा, बोहरा असे सर्व मुस्लिम पंथीय मोदींच्या उपवासास हजर होते; नव्हे, त्यांच्यात अहमहमिकाच असावी. एक तर ते असुरक्षिततेतून घडले असेल वा खरोखरच गत साताठ वर्षांमध्ये मोदींनी धार्मिक भेदाभेद केला नसेल. १७ रोजी वयाची एकसष्टी त्यांनी उपवासाने म्हणजे शरीरशुद्धीने साजरी केली. पण ती राज्यातील नागरिकांना दरडोई रुपयाला पडली, अशी बोचरी टीका कॉंग्रेसने केली. मात्र मोदींचा कारभार उधळपट्टीचा नाही, हे लक्षात घ्यावे. ते त्वरित निर्णय घेतात अन् राज्यात भ्रष्टाचाराला मुळीच थारा नाही, असा आपला अनुभव एका युवा गोमंतकीय उद्योगपतीने मागे सांगितला होता, त्याची आठवण झाली.
मोदी हा कणखर माणूस आहे अन् भ्रष्टाचाराचा वा चारित्र्यावर डाग अजून लागलेला नाही. त्याच्या सुशासनाची अन् गेल्या दहा वर्षांतील गुजरातच्या घोडदौडीची प्रशंसा देशभरच नव्हे तर जगभर होत आहे. त्यामुळे प्रधानमंत्री बनावे, असे त्याला वाटले तर नवल नव्हे. पण अशीच स्वच्छ प्रतिमा असलेल्या बिहारच्या नितीशकुमारनाही कधी तरी देशाचे नेतृत्व करावेसे वाटते. पश्चिम बंगाली ममता बॅनर्जीसुद्धा साध्या आणि भ्रष्टाचारापासून दूर आहेत. इतक्या साध्या की, जाडीभरडी सुती साडी तर नेसतातच; गत वर्षी ‘इफ्फी’च्या उद्घाटनाला आल्या त्या ‘पायल’च्या रबरी सपाता घालून! जयललिता म्हणा वा मायावती. भ्रष्ट अन् श्रीमंती शौक असलेल्या त्या राष्ट्रीय पुढारी बनू शकत नाहीत. ममता नावाप्रमाणे मायाळू मात्र नाहीत. उलट झगडाळू आहेत, याचा प्रत्यक्ष अनुभव प्रस्तुत लेखकाने १९८९ साली कोलकाता दौर्यात घेतला होता. विस्तारभयास्तव तो किस्सा सांगण्याचा मोह आवरता घेतो. खुद्द अटलजींनी एकदा ममताच्या मातोश्रींंकडे ‘आपकी बेटी मुझे बहुत तंग करती है’ अशी लाडिक तक्रार केली होती; कदाचित अन्यायाविरोधात पेटून उठण्याचा पिंड असल्याने त्या काहीशा कजाग बनल्या असाव्यात. भाजपमध्ये सुषमाजी, अरुण जेठली अशीही काही महत्त्वाकांक्षी मंडळी आहेत. देवेगौडा, गुजराल प्रधानमंत्री बनू शकतात, तर मी का नाही? मात्र सध्या तरी ‘बाजारात तुरी’चा हा प्रकार आहे. राजकारण्यांना दूरदृष्टी असते. ते भविष्यावर नजर ठेवून प्रतिमा जोपासतात. ललाटरेखा चमकली तर सारे मनासारखे घडूनही येते. आपण करतो ती ‘राजनीती नहीं; राष्ट्रनीती’ असे मोदी म्हणतात. परंतु दंगलग्रस्त गुजरात्यांनी त्यांना खरोखरच माफ केलेय की काय, हे पुढील साली पुन्हा एकदा कसाला लागेल. कारण २०१२ मध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. मोदी सत्ता राखतील, हे सध्या तरी अटळ दिसते. त्यानंतर संघ त्यांना राष्ट्रीय स्तरावर नेईल. गोल गरगरीत नितीन गडकरींचा कार्यकाल संपताच भाजपाध्यक्ष बनविल व २०१४ साली ते प्रधानमंत्रिपदाचे उमेदवार असतील. पण या प्रश्नावर रालोआला पेचात पकडायचे कॉंग्रेसी प्रयास चालू आहेत. तुमचा उमेदवार कोण ते सांगा, असे परवा अभिषेक मनू संघवी भाजपला विचारते झाले. कलागत लावायचा हा प्रकार आहे. सध्या तरी कॉंग्रेस डॉ. मनमोहन सिंग यांच्याविषयी निश्चिंत आहे. मॅडमचे आरोग्य ठीक नाही, हेही एक कारण आहे. उद्या ७९ वर्षांचे होणारे डॉ. मनमोहन सिंग तसे ‘फिट’ आहेत. परंतु यूपीएत ऑल वेल आहे, असेही नव्हे. प्रणबदा आणि चिदंबरम् यांच्यातून म्हणे विस्तव जात नाही. त्यांच्या भांडणात संरक्षणमंत्री अँटनी हे ‘डार्क हॉर्स’ बनू शकतात. त्यांनीही भ्रष्टाचाराचा डाग आपल्या लुंगी–शर्टावर पडू दिलेला नाही. घोषित मालमत्ता किती? केवळ लाख– दीड लाख! हे मात्र अविश्वसनीय वाटते. ते केरळचे मुख्यमंत्री होते तेव्हा पत्नी स्टेट बँकेत काम करायची अन् बसने ऑफिसला जायची. ते का? पुडुचेरीचे मुख्यमंत्री रंगास्वामी सायकलने हिंडायचे! तेव्हा सर्वत्र सगळा भ्रष्टाचार अन् खाबुगिरी आहे, असे नव्हे. स्वच्छ प्रतिमेचे अन्य काही ‘अन्ना’ अजूनही आहेत. प्रश्न एकचः ते प्रधानमंत्री बनतील का? देशाला आपणासारखे करून सोडतील का? खैर, आज घडीस तरी मोदींनासुद्धा दिल्ली दूर आहे! राज्यात आपल्याविरुद्ध कुठच्याही पोलीस ठाण्यात तक्रार नाही, असे मोदी म्हणतात. (असेच आपले गृहमंत्री रवी नाईकही सांगतात.)