Home बातम्या दहशतवाद्यांचे नवे हत्यार : अंडरवेअर बॉम्ब!

दहशतवाद्यांचे नवे हत्यार : अंडरवेअर बॉम्ब!

0

धातूशोधक यंत्रांनाही सुगावा नाही

आत्मघातकी हल्ले घडवून आणण्यासाठी अल कायदाने धातूशोधक यंत्रांनाही सुगावा न लागू शकणारे धातूविरहित असे ‘अंडरवेअर बॉम्ब’ विकसित केल्याचे अमेरिकी गुप्तचर यंत्रणांना आढळून आले आहे. विमानतळावरील सुरक्षेचा भेद करीत अशा प्रकारचा बॉम्ब नेला जाऊ शकतो, असे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. अल कायदाच्या दहशतवाद्यांनी अशा प्रकारच्या अंडरवेअर बॉम्बद्वारे अमेरिकी विमानांमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट आखला होता अशी माहिती त्यांना मिळाली आहे.

अल कायदाच्या येमेनमधील हस्तकांपाशी दहा दिवसांपूर्वीच अशा प्रकारचा बॉम्ब आढळून आला असून विमानांत स्फोट घडवून आणण्याचा कट आखला गेला होता, असे अमेरिकेच्या प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले. अल कायदा इन अरेबियन पेनिन्सुला किंवा ‘एक्यूएपी’ या गटाने हा कट आखला होता व अमेरिका आणि त्याच्या मित्रदेशांवर हल्ले चढवण्याचा त्यांचा बेत होता असे त्यांचे म्हणणे आहे.

सौदी दहशतवादी इब्राहिम हसन अल असिरी यानेच हा बॉम्ब तयार केला असावा असे अमेरिकी गुप्तचरांना वाटते. यापूर्वी सौदी अरेबियाच्या दहशतवादविरोधी विभागाचा प्रमुख प्रिन्स महंमद बिन नायेफ याच्या हत्येचा कट केलेल्या दहशतवाद्यांनी अशा प्रकारच्या अंडरवेअर बॉम्बचा वापर केला होता. मात्र, त्यावेळी स्फोट घडवून आणणारा हल्लेखोरच ठार झाला होता व नायेफ हे बचावले होते. त्याच वर्षी म्हणजे २००९ साली ख्रिसमसच्या दिवशी उमर फारूख अब्दुलमुतल्लब या दहशतवाद्याने नेदरलँडहून डेट्रॉइटकडे निघालेल्या विमानात स्वतःच्या चड्डीत दडवलेल्या बॉम्बचा स्फोट घडवण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा आग लागली पण स्फोट झाला नव्हता. अब्दुलमुतल्लब याला सहप्रवाशांनी पकडून नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले होते. मात्र, आता हा बॉम्ब अधिक आधुनिक तंत्राने बनवला गेला असल्याचे गुप्तचरांना आढळून आले. या बॉम्बचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात धातूचा वापर केला जात नाही, त्यामुळे धातूशोधक यंत्रांना त्याचा थांगपत्ता लागत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या बॉम्बचा शोध लावण्यासाठी वेगळे तंत्र अवलंबण्याचे आदेश अमेरिकेने आपल्या गृह खात्याला दिले आहेत. अशा प्रकारचे बॉम्ब मानवी शरीरात शस्त्रक्रिया करून बसवून स्फोट घडवून आणण्याचा प्रयत्नही अल कायदा करू पाहात असल्याची माहिती अमेरिकी गुप्तचरांना मिळाली आहे.