इतर गुन्ह्यांतही तुलनेत वाढ
सन २०११ या मावळत्या वर्षात दक्षिण गोव्यात २५१ अपघातांत ८७ जणांचे तर संपूर्ण गोव्यात वाहन अपघातात ३०७ बळी गेले आहेत. गेल्या दोन वर्षांचा आढावा घेतल्यास वाहन अपघातांत बळी जाणार्यांच्या संख्येत घट झालेली नाही.
वाहनांची वाढती संख्या, अरुंद रस्ते, नशेत वाहन चालवणे तसेच निष्काळजीपणे वाहन चालवण्याने अपघातात वाढ होत आहेत. सुट्टीच्या दिवसांत रात्री व पहाटे दुचाकी अपघातात वाढ होत आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून अपघात व वाहनचालनासंबंधी प्रशिक्षण देणे गरजेचे बनले आहे.
दक्षिण गोव्यातील इतर गुन्ह्यांचा आढावा घेतल्यास १५ खून झाले असून त्यातील १३ प्रकरणांचा तपास लागलेला आहे. २००९ मध्ये २० तर २०१० मध्ये १० खून झाले होते. त्यामानाने यंदा यात वाढ झालेली आहे. यंदाच्या वर्षात बलात्कार (१६), दरोडे (१), घरफोड्या (१२४), वाहन चोरी (१७८), अपहरण (१३) इतर चोर्या (१४१) अशी इतर गुन्ह्यांची संख्या आहे. सर्व गुन्ह्यांची यंदा १२४८ संख्या आहे. यापैकी ७४८ प्रकरणांचा पोलिसांना शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे.
गेल्या २५ वर्षांत सरकारने मडगाव, कुडतरी, वास्को, सावर्डे आदी पोलिस स्थानकांवरील पोलिसांची संख्या वाढवलेली नाही. किमान २०० पोलिसाची गरज असल्याचे वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितले. शहरी भागातील पोलिस अधिकारी व शिपायांची संख्या ग्रामीण भागांच्या तुलनेत संख्येने कमी आहे, त्यामुळे शहरी पोलिसांवर कामाचा बोजा पडत असतो. त्याचा परिणाम त्यांच्या कामावरही होत असतो. मडगाव शहराचा विकास झपाट्याने होत आहे. कुडतरी, नावेली, बाणावली, फातोर्डा, नुवे भाग मडगावला जोडले आहेत. बहुमजली इमारती, कोकण रेल्वे, प्रवासी गाड्या, ट्रक वाहतूक, शहरातील झोपडपट्टी यामुळे गुन्ह्यांत वाढ होत आहे. परप्रांतीय गुन्हेगार हे येथील झोपडपट्टीचा आधार घेऊन पाहणी करतात व घरे फोडतात. बहुतेक गुन्ह्यांमध्ये ओरिसा, कोलकाता, उत्तर प्रदेश, बिहार येथील लोकांचा भरणा असल्याचे दिसून आले आहे. त्याचप्रमाणे तरुण पोलिसांकडून वरिष्ठांना तपासकार्यात सहकार्य मिळत नसल्याची खंतही एक वरिष्ठ हवालदाराने व्यक्त केली. त्याचप्रमाणे आपल्याच मर्जीतील अधिकार्यांची पोलिस स्थानकावर नेमणूक करण्याची राजकीय प्रवृत्ती यामुळे तपासकामात अडथळा येत असतो त्यामुळे पोलिसांवरील विश्वासास तडा जातो असेही सूत्रांनी सांगितले.