Home बातम्या तो राजहंस एक!

तो राजहंस एक!

0

–  विष्णू सूर्या वाघ

(भाग-१)

कविश्रेष्ठ ग. दि. माडगूळकर यांनी बालगंधर्वांबद्दल काढलेले हे उद्गार. बालगंधर्व म्हणजे नारायण श्रीपाद राजहंस. मराठी रंगभूमीला पडलेलं एक मोहक स्वप्न! वेळ बदलला, काळ बदलला, परिस्थिती बदलली, रंगभूमीचं तंत्र बदललं, स्वरूप बदललं आणि तरीही ‘बालगंधर्व’ या नावाची मोहिनी मराठी मनावर अजूनही कायम आहे. १५ ऑगस्ट १९६७ रोजी बालगंधर्वांनी जगाच्या रंगभूमीवरून एक्झीट घेतली. आयुष्यातील त्यांचा अखेरचा काळ अत्यंत खडतर अवस्थेत गेला. पण ऐन तारुण्याच्या भरात असताना मराठी रंगभूमीवर संगीत आणि अभिनयाचा जो परमोच्च रसाविष्कार त्यांनी घडवला त्यामुळे मराठी जगत बालगंधर्वांचे कायमचे ऋणी बनले.

‘गंधर्व’ या शब्दात काहीतरी विलक्षण जादू असलीच पाहिजे. कारण या शब्दावर आधारून जितक्या पदव्या दिल्या गेल्या किंवा घेतल्या गेल्या तितक्या दुसर्‍या कोणत्याही शब्दाच्या वाट्याला आल्या नाहीत. बालगंधर्व, भूगंधर्व, सवाई गंधर्व, महाराष्ट्र गंधर्व, कुमार गंधर्व, छोटा गंधर्व, नूतन गंधर्व, हिंद गंधर्व, आनंद गंधर्व, भावगंधर्वपासून अक्षरशः डिट्टो गंधर्वपर्यंत गंधर्वांची एक मांदियाळीच महाराष्ट्रात तयार झाली. यांपैकी बर्‍याच जणांनी आपल्या कर्तृत्वाने ती पदवी सार्थ करून दाखवली आणि काहीजणांनी आपल्या अतिहुशारीमुळे त्या पदवीलाच लाजविले. नारायण श्रीपादराव राजहंस या माणसाने मात्र ‘बालगंधर्व’ ही आपणाला मिळालेली पदवी अजरामर केली. बरं, ही पदवी बहाल करणारा माणूस तरी लेचापेचा होता? अजिबात नाही. १८९८ साली नारायण राजहंस या छोट्या मुलाचं गाणं ऐकून ‘अरे, हा तर साक्षात बालगंधर्व आहे!’ असे उद्गार काढणारी ती व्यक्ती कोण असेल? भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे अध्वर्यू, असंतोषाचे जनक, प्रख्यात प्रकांड पंडित, भगवद्गीतेचे भाष्यकार, ज्योतिर्विद्येचे जाणकार आणि वैदिक गणितज्ज्ञ- साक्षात लोकमान्य टिळक!
या घटनेचं वर्णन करताना गदिमांनी लिहिलंय-

त्याच संधिला कुणा अनामिक रसिकाची हौस

टिळकांपुढती ठेवि बोलका कुणी राजहंस

राजहंस तो नेत्यासन्मुख गीत मनोहर म्हणे


देवदत्त तो साद मनोहर ऐकूनिया कानी

बाल गायका अमोल पदवी दिली टिळकांनी

शिरोधार्य ते दान मानिले इवल्या नारायणें

तो तोच बालगंधर्व

जाणिती सर्व

वाढला पुढती

यशसिद्धी राहिली त्याची सदोदित चढती

वाढला बालगंधर्व युगंधर झाला

वर्षाव प्रीतीचा रसिकजनांनी केला

सन्मान असा ना मिळतो सम्राटाला

मंत्रमुग्ध जन होत राहिले त्यांच्या मधुगायनें…

साक्षात सम्राटालाही मिळत नाही असा मान बालगंधर्वांना मिळाला. जवळपास पन्नास वर्षे रसिकमनावर त्यांनी अधिराज्य केले. आवाजाच्या जोरावर ते संगीतातील विलक्षण जादूगार झाले. ज्याप्रमाणे त्यांचे रूप मोहक होते त्याचप्रमाणे त्यांचा आवाजही मोहिनी घालणारा होता. अत्यंत मधुर, झार असलेला स्वयंप्रकाशी असा तो आवाज होता. त्यांच्या आवाजाच्या झारेला इंद्रधनुष्यातील विविध रंगांच्या छटांची उपमा एका मर्मज्ञ रसिकाने दिली होती व ती सार्थही होती. इतर कलावंत गायकांप्रमाणे जरी त्यांच्या गायनात पुष्कळ तर्‍हा नसल्या तरी त्यांचे साधेसुधे गोड गाणे आल्हाददायक बनू शकले ते या कंठमाधुर्याच्या देणगीवरच! हा आवाज प्रत्यक्ष ऐकण्यासाठी लोक शेकडो मैलांवरून धावत येत; तारेने थिएटरमध्ये जागा रिझर्व्ह केल्या जात; स्पेशल मोटारी सोडल्या जात. एवढेच नव्हे तर नाटकाच्या तिसर्‍या अंकापर्यंत तिकिटं मिळवण्याची लोक खटपट व धडपड करीत. लोकांची ही असोशी एवढ्या पराकोटीची होती की अमरावतीला एकदा बालगंधर्वांच्या नाटकाचा प्रयोग असताना तिकीट न मिळालेल्या एका वर्‍हाडी पाटलाने ‘अहो वाटेल तितके पैसे घ्या… कुठंही कोपर्‍यात जागा द्या, पण त्या गंधर्वाचं गाणं मला ऐकू द्या आणि डोळे भरून त्याला पाहू द्या’ अशी मिनतवारी तिकीट काऊंटरवर म्हणे केली होती!

असं काय बालगंधर्वांमध्ये होतं की त्यांना पाहायला, ऐकायला लोक एवढे वेडावले होते? ही सर्व किमया बालगंधर्वांच्या जादुई आवाजाची होती! ऑर्गन व सारंगीवर त्यांनी आपला आवाज मिळवला की त्या तीन सुंदर स्वरांच्या मिलाफाने श्रोत्यांच्या कानांचे समाधान होऊन अंगावर रोमांच उभे राहत. रंगमंदिरात विलक्षण शांतता प्रस्थापित होई. बालगंधर्वांची गायनपद्धती साधी, सरळ परंतु रसोत्पादक होती. त्यामुळं एखाद्या कसलेल्या गवयाच्या तासभर गाण्यानं जो परिणाम होणार नाही तो गंधर्वांच्या पाच मिनिटांच्या गाण्यानं होई. त्या सुरेल गाण्यावर भले भले गवयीसुद्धा लुब्ध होत. असं म्हणतात की संगीतसम्राट अल्लादियाखॉंसाहेब एकदा भास्करबुवा बखले यांच्या आग्रहावरून बालगंधर्वांचं ‘स्वयंवर’ नाटक बघायला आले. अल्लादिया म्हणजे साक्षात संगीतसम्राट! दस्तुरखुद्द बखलेबुवांचे गुरू! एवढा प्रकांड पंडित समोर बसला असताना बालगंधर्व रुक्मिणीच्या भूमिकेत रंगमंचावर आले. ‘यमन’मधलं ‘नाथ हा माझा’ त्यांनी साग्रसंगीतपणे पेश केलं. पुढल्या प्रवेशात ‘स्वकुलतारक सुता’ हे भीमपलासमधलं नाट्यगीत सुरू झालं. गंधर्वांचं ते हातखंडा पद, रागही आवडता व श्रोतेही समजूतदार. मग गाणं रंगायला कितीसा उशीर? या रागात कोमल निषादवरून तार षड्‌जाला जाताना बालगंधर्वांनी निषादाला असा काही अलगद हेलकावा दिला की खॉंसाहेबांनी बसल्या ठिकाणावरून ‘‘वाहवा! क्या तेरी निखाद मीठी लगती है| मैं आज चालीस बरस गा रहा हूँ, लेकिन मेरे से भी ऐसी नहीं लगती!’’ असे उद्गार काढले.
‘बालगंधर्व’ आणि ‘नटसम्राट’ या दुहेरी किताबतीनं नारायणराव राजहंस विभूषित झाले. यांपैकी पहिली पदवी ते पंधरा ते सोळा वर्षांचे असताना लोकमान्य टिळकांनी त्यांना दिली आणि दुसरी त्यांच्यावर फिदा झालेल्या रसिक जनतेनं दिली. परंतु गायक आणि नट या दोन्ही नात्यांनी बालगंधर्वांच्या प्रगतीचे टप्पे पाहण्यासारखे आहेत. अभिनय आणि गायन या दोन्ही अंगात बालगंधर्व अगदी प्रारंभापासून श्रेष्ठ कोटीतले होते अशी कुणाची समजूत असेल तर ती सपशेल चुकीची आहे. दोन्ही बाबतीत त्यांना निसर्गाची विशेष देणगी होती हे निर्विवाद, परंतु कुठलाही कलाकार केवळ निसर्गदत्त देणगीच्या बळावर महन्पदाला पोचू शकत नाही. नैसर्गिक गुणवत्तेवरही संस्कार व्हावे लागतात. त्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागते. कलेवर निष्ठा असावी लागते. निरलस तपश्‍चर्येची कास धरावी लागते. या सर्व गोष्टी नारायण राजहंस यांनी केल्या म्हणून ते अढळपदाला पोचू शकले. ‘गंधर्व’ आणि ‘नटसम्राट’ ही दोन्ही बिरुदे त्यांना शोभली याचे कारण त्यांची खडतर तपश्‍चर्या आणि कलेवरील अव्यभिचारी निष्ठा!
मराठी रंगभूमीचे खूप जुन्या काळातले एक अभ्यासक बाबुराव जोशी यांना मात्र बालगंधर्वांना कुणी ‘नटसम्राट’ म्हटलेले आवडत नसे. १९५९ साली लिहिलेल्या एका लेखात त्यांनी याविषयीचे स्पष्टीकरणही दिले आहे. ते लिहितात-
‘‘बालगंधर्वांसंबंधी लिहिताना त्यांना ‘सम्राट’ हे बिरुद त्यांच्या चाहत्यांनी अनेक वेळा लावले आहे. भाऊराव कोल्हटकरना रूप व आवाजाच्या अलौकिकत्वामुळे, गणपतराव जोशी यांना असामान्य अभिनयगुणांमुळे, केशवराव भोसले यांना गायकीच्या प्रभुत्वामुळे ‘सम्राट’ म्हणण्यात येत असे. बालगंधर्वांच्याकडे तसा विशेष गुणप्रकर्ष नसला तरी बर्‍याच गुणांच्या समुच्चयामुळे त्यांना ‘सम्राट’ म्हणता येईलही. पण मला ती गोष्ट अनेक कारणाने पटत नाही.
पहिलं कारण म्हणजे, बालगंधर्वांनी रंगभूमीवर पाऊल ठेवल्यानंतरच्या पहिल्या तीस वर्षांच्या काळात स्त्री-भूमिकेखेरीज दुसरी भूमिका केली नाही. भाऊराव कोल्हटकर, केशवराव, गोरे, सवाई गंधर्व प्रभृतींनी स्त्री भूमिका केल्या. पण त्या फारच थोडा काळ. नंतर त्या सर्वांनी स्त्री भूमिका सोडून देऊन पुरुष भूमिका केल्या, नव्हे त्यांना त्या कराव्या लागल्या. भाऊराव रंगभूमीवर आल्यापासून नऊ-दहा वर्षांच्या आत त्यांनी यापुढे स्त्री भूमिका करावी की नाही याची चर्चा वर्तमानपत्रांतून सुरू झाली व लगेच दोनतीन वर्षानंतर भाऊरावांनी स्त्री भूमिकांना सोडचिठ्ठी दिली. बालगंधर्वांना रूपाची आणि शरीर बांध्याची अशी काही देणगी होती की १९३५ नंतरही त्यांचा बांधा स्त्री भूमिकेला फारसा बेडौल दिसला नाही. शिवाय स्त्रीचा भास कायम राहावा यासाठी बालगंधर्व कमालीची दक्षता घेत असत. साधी लुगडे नेसण्याची गोष्ट घ्या. स्त्रीच्या शारीरबांध्याचे कलात्मक दर्शन घडवणारी महाराष्ट्रीय नऊवारी साडी ते असे काही चापून चोपून नेसत की पुण्यातील खानदानी कुटुंबातील स्त्रियांनीही त्यांचे कौतुक करावे. वेशभूषेचे व केशभूषेचे नवनवे प्रकार (फॅशन) रूढ करण्यात तर बालगंधर्वांकडेच महाराष्ट्रीय स्त्रियांचे नेतृत्व होते असे म्हणायला हरकत नाही. बालगंधर्वांच्या प्रथमच्या काळातील स्त्री भूमिकेतील विलोभनीय दर्शन पाहून काही आंबटशौकीन लोक बालगंधर्वांसारखे लुगडे नेसून व मेकअप करून आपले फोटो काढून घेण्यात धन्यता मानीत अशी आठवण श्री. दादा लाडू यांनी ‘मोहिनी’च्या १९५५ च्या अंकात प्रसिद्ध केली आहे. सोंग सजवण्यात (मेकअप करण्यात) तर बालगंधर्व फारच काळजी घेत. खेळाच्या दिवशी ते रंगपटात सर्वांच्या आधी येत व नाटकाची जाहीर झालेली वेळ होऊन गेली तरी त्यांचा ‘अखेरचा हात’ फिरवण्याचे काम चालूच असे. नाटकाला उशीर करण्याचा गंधर्व नाटक कंपनीने जो ‘लौकीक’ मिळवला होता त्याला पुष्कळ वेळा बालगंधर्वांची ही न संपणारी कलाकुसर कारणीभूत होती. अशी कलात्मक वेशभूषा, उत्कृष्ट मेकअप व विशेष अंगप्रत्यंगाचा संकोच करण्याची विशेष लकब त्यांना साधली असल्याने पन्नाशीच्या घराजवळ येईपर्यंतही बालगंधर्वांची रुक्मिणी प्रेक्षकांना ‘स्वयंवरा’स योग्य अशी दर्शनीयच वाटली. मला हे म्हणायचंय की रंगभूमीवरील बालगंधर्वांचं स्मरण होताच कोणत्या ना कोणत्या नायिकेची विलोभनीय मूर्तीच डोळ्यांपुढे तरळू लागली तर त्याना ‘नटसम्राट’ ही पुरुष संज्ञा देऊन औचित्यभंग का करावा?
शिवाय ‘सम्राट’ या शब्दामध्ये पराक्रम, युयुत्सूवृत्ती, सत्तेचे प्रदर्शन, दरारा इत्यादी गोष्टी अंतर्भूत होतात. त्या बालगंधर्वांना लागू पडतात कुठे? दर्शन, अभिनय अगर गायन यापैकी बालगंधर्वांचा कुठलाही पैलू पाहिला तर त्याचे वर्णन मोहकता, लडिवाळपणा, माधुरी, आर्जव अशाच तर्‍हेच्या जनानी शब्दांनी करावे लागणार. भाऊराव कोल्हटकरांना रसिकांनी प्रथम पाहिले तेव्हा आपण एक ‘दिव्य तेजोमय’ व्यक्ती पाहतो आहोत असे बहुतेकांना वाटले. बालगंधर्वांच्या बाबतीत असे काही घडले नाही. असामान्य अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणले, चित्तवृत्ती थरारून सोडली अशी नटसम्राट गणपतराव जोशी यांची ख्याती होती, तशी शक्ती बालगंधर्वांच्या ठिकाणी मुळीच प्रत्ययाला आली नाही. आवाजाच्या ओजाने अगर तेजाने, विजेसारख्या सळसळणार्‍या व मेघांप्रमाणे गडगडणार्‍या तानांनी अगर गाण्याच्या अजब तयारीने ज्या गानसम्राटांनी रंगभूमी दणाणून सोडली, गाजवली व प्रेक्षकांना रिझवलं तशा प्रकारची मर्दुमकी बालगंधर्वांच्या हातून झाली नाही.
बालगंधर्वांची सारी तर्‍हा न्यारीच. ते एकदम प्रसिद्धीला आले नाहीत. शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे त्यांची कला हळूहळू तेजःपुंज बनत गेली. पुढे ती पूर्णत्वाला पोचली तरी प्रखर किंवा तापदायक अशी केव्हाच झाली नाही. अगदी पूर्णचंद्राप्रमाणं ती सदैव शीतल, आल्हाददायक राहिली. त्याकडे खुशाल टक लावून बघा- डोळे दिपायचे नाहीत. कितीही वेळ पहा- कंटाळा यायचा नाही. त्यांच्या अभिनयात सूक्ष्म भावनेच्या छटांचा अभ्यास किंवा परिश्रमपूर्वक मिळवलेला प्रभाव असा कधी दिसलाच नाही. तथापि, त्यांनी रसिकांना अभिनयानेही भारून टाकले. कारण त्यात स्त्रीसुलभ मार्दव व लडिवाळपणाचा प्रत्यय येत होता. म्हणून त्यांचा दोषयुक्त अभिनयही पुन्हा पुन्हा पाहिला जायचा. संगीताच्या बाबतीतही तीच तर्‍हा. त्यांच्या आवाजाला ‘ओज’ अगर वजन कमी होते हे खरे, पण झार व माधुरी खास होती. तान, पलटा व फिरकी यांची तयारी नव्हती, पण मोहक स्वरविलास होता. गाणे आक्रमक नव्हते तरीही अभिजात संगीताची सौंदर्यशाली कांडी त्यांच्या हातात होती. ती कांडी ते फिरवीत. अशा मोहिनीने ते स्वतः रंगून जात आणि प्रेक्षकांनाही धुंद चढे. अशा स्थितीत बालगंधर्वांनी पुन्हा पुन्हा गावे व लोकांनीही पुन्हा पुन्हा ऐकावे असा तो एकंदर मामला होता.
म्हणून मी म्हणतो की जर पदवी द्यायचीच असेल तर बालगंधर्वांना एकच पदवी द्यावी- मराठी रंगभूमीची सम्राज्ञी!’’
पण बालगंधर्वांच्या बाबतीत हा पदवी बहाल करण्याचा खटाटोप तरी कशाला करावा? हा कलावंत रंगभूमीवर अवतरला तोच मुळी कवचकुंडले परिधान करून- म्हणजेच ‘बालगंधर्व’ ठरून. ‘बाल’सुलभ लडिवाळपणा व ‘गंधर्व’तुल्य गायनाची माधुरी हे दोन गुण त्यांच्यात अंगभूत होते. या रसोत्पादक गायनपद्धतीने ते रंगभूमीवरचे राजे झाले. शृंगार, करुण, वत्सल व शांत या रसांवर त्यांचे सारखेच प्रभुत्व होते. गाणं गाता गाता त्या पदांतील भावनेशीच ते तद्रूप होत. त्यामुळे श्रोतेही भावनेच्या त्या आवर्तांत गुरफटून जात. इतका रसोत्पादक गाणारा स्त्री-नट मराठी रंगभूमीवर भाऊराव कोल्हटकरांनंतर दुसरा झाला नव्हता. बालगंधर्वांनी ते स्थान तर काबीज केलेच, पण त्याही पुढे जाऊन आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवला.
बालगंधर्वांना लाभलेल्या लोकप्रियतेला खरोखर मर्यादा नव्हती. त्यांच्यावरील प्रेमापोटी काहीही सहन करायला प्रेक्षक तयार होते. एकदा रंगभूमीवर पद म्हणत असताना त्यांची खोट्या दातांची कवळी निसटली. परंतु बालगंधर्वांनी न गांगरता प्रेक्षकांच्या पुढ्यातच ती पुन्हा तोंडात बसवली आणि काहीच न घडल्याच्या थाटात गाणं पूर्ववत चालू केलं. खोट्या दातांची ही खरी ‘दंतकथा’ म्हणजे बालगंधर्वांवरील जनतेच्या प्रेमाची अक्षरशः खूण म्हणावी लागेल.
आपला प्रेक्षक आपल्यावर खूप प्रेम करतोय याची पूर्ण जाणीव बालगंधर्वांना होती. नाटकाच्या सुरुवातीला उशीर होऊ लागला किंवा मॅनेजर घाई करू लागले की बालगंधर्व त्यांना सांगत- ‘‘बालगंधर्वांचं गाणं ऐकायचं असेल तर उशीर सोसलाच पाहिजे म्हणून सांगा लोकांना!’’ वरवर हा उद्दामपणा वाटेल. पण बालगंधर्वांची यामागची भूमिका प्रामाणिक होती. प्रेक्षकांची सेवा करण्यात आपण किंचितही कसूर करीत नाही, प्रामाणिकपणानं सर्वस्व पणाला लावतो याची त्यांना खात्री होती. बालगंधर्वांनी प्रेक्षकांची सेवा ज्या निष्ठेनं केली ती खचितच बावनकशी सोन्यासारखी होती.
(क्रमशः)