तीन अपघातांत 2 ठार; 10 जखमी

0
11

>> अपघातांची मालिका कायम; कुंडई, बेतोडा व हडफड्यात अपघात

राज्यात मागील एक-दोन दिवसांपासून सुरू झालेली अपघातांची मालिका कायम असून, गेल्या 24 तासांत झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांत दोन जण ठार, तर 10 जण जखमी झाले.
मानसवाडा-कुंडई येथील उतरणीवरील धोकादायक वळणावर कंटेनरचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने रविवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला. या ट्रकने एका दुकानासह 2 कार आणि 6 दुचाकी वाहनांना धडक दिल्याने मोठे नुकसान झाले. या अपघातात एकूण चार जण जखमी
झाले.

कंटेनरने प्रथम एका दुकानाला धडक दिली. त्यानंतर दोन कार आणि सहा दुचाकी वाहनांना धडक दिली. कुंडई येथून पणजीच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर ट्रकच्या चालकाचा वाहनावरील ताबा कुंडई मानसवाडा येथील उतरणीवर सुटल्याने ट्रकने रस्त्याबाजूच्या मद्यविक्री दुकानाला धडक दिली. ट्रकच्या धडकेने मद्यविक्री दुकानाचा अर्धाभाग जमीनदोस्त झाला. या दुकानाच्या समोर पार्क केलेल्या एका कारबरोबरच रस्त्यावरून जाणाऱ्या अन्य एका कारला धडक बसल्याने नुकसान झाले. तसेच, दुकानाच्या आसपास उभ्या केलेल्या सहा दुचाकी वाहनांचे नुकसान झाले. या अपघातात चार जण जखमी झाले. त्यांच्यावर इस्पितळात उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

नागरिकांकडून आंदोलन
या अपघातामुळे संतप्त बनलेल्या स्थानिक नागरिकांनी सोमवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन केले. अवजड वाहनांची वाहतूक राष्ट्रीय मार्गावरून करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. तसेच सर्व्हिस रोड स्थानिकांसाठी ठेवावा, अशी मागणी केली. या मागणीची पूर्तता न झाल्यास आगामी 2024च्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा काही ग्रामस्थांनी दिला.

बेतोड्यात कार अपघातात एक जण ठार
बेतोडा-बोरी बगल रस्त्यावर काल सकाळी एका कारला झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव पंकज कोठारकर (26, रा. कारवार) असे आहे. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या मधोमध पलटी झाली. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व जण वेर्णा येथे कंपनीत कामाला असून, ते कामगारदिनाच्या सुट्टीचे औचित्य साधून उसगाव येथे सहलीला जात होते.

हडफडेत दुचाकीचालक ठार
हडफडे येथे काल झालेल्या एका दुचाकी अपघातात रियाझ अल्लासाब पिंजर (33, रा. बेटिगेरी गदग, कर्नाटक) हा जागीच ठार झाला. रियाझ हा भाड्याच्या दुचाकीने (क्र. जीए-03-एएच-5569) हडफडेहून कळंगुटला जात असताना हडफडे जंक्शनवर पोहोचताच त्याच्या दुचाकीस अपघात झाला. त्याला कांदोळी आरोग्य केंद्रात दाखल केले; मात्र त्याचा त्यापूर्वीच मृत्यू झाला होता.