Home बातम्या तिन्ही डॉक्टर गायब

तिन्ही डॉक्टर गायब

0

तिघाही डॉक्टरांविरुद्ध वास्को पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा नोंद करून त्यांना ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी, तसेच इतरत्र छापे टाकले, परंतु यापैकी कोणीच सापडू शकले नाही. यासंदर्भात बोलताना पोलीस निरीक्षक परबयांनी सांगितले की तिघाही डॉक्टरांना लवकरच ताब्यात घेतले जाईल.

संशयितांविरुद्ध सहा सदस्यांनी सादर केलेला ३५ पानी अहवाल आरोपपत्र सादर करण्यासाठी पुरेसा असल्याचे ते म्हणाले. आरोग्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये आरोग्य संचालक, आरोग्य खात्याचे संयुक्त सचिव, डॉ. प्रमोद साळगावकर, गोमेकॉचे डीन व डॉ. एमेदिओ गोम्स यांचा समावेश होता अशी माहिती त्यांनी दिली.

कान, नाक व घसा तज्ज्ञ डॉ. सुर्मे यांनी रवीना हिची तपासणी करून २ जून २०१० रोजी तिला अपेंडिक्स झाल्याचे निदान करून पै इस्पितळात दाखल करायला सांगितले होते. त्यानंतर ५ जुलै रोजी रवीनाला शस्त्रक्रियेनंतर घरी पाठवले गेले. परंतु पुन्हा वेदना होऊ लागल्याने तिला ९ जुलै रोजी पुन्हा त्याच इस्पितळात दाखल केले गेले. १० जुलैला तिला गोवा वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यास डॉक्टरांनी सांगितले. तेथेच २९ जुलै रोजी तिचा मृत्यू झाला. या प्रकरणात २ ऑगस्ट २०१० रोजी रवीनाची बहीण रविला हिने डॉक्टरांविरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी ही तक्रार वैद्यकीय मंडळाकडे दाखल केली होती. २१ ऑक्टोबर २०११ रोजी कुटुंबियांकडून प्रथम श्रेणी न्यायालयात याचिका दाखल केली गेली. त्याच्या संदर्भात ११ नोव्हेंबर रोजी न्यायालयाकडून पोलिसांना अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आला. २५ नोव्हेंबर रोजी वैद्यकीय समितीच्या अहवालाच्या आधारे तिघाही डॉक्टरांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.

या प्रकरणी वास्कोवासियांचेच नव्हे, तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.