तामिळनाडूत फटाक्यांच्या कारखान्यातील आगीत 9 ठार

0
13

>> 8 जणांची प्रकृती चिंताजनक

तामिळनाडूत बुधवारी एक मोठी दुर्घटना घडली. उत्तर तामिळनाडूतील कांचीपुरम जिल्ह्यात बुधवारी एका फटाक्यांच्या कारखान्याला आग लागून 27 जण गंभीर जखमी झाले. सर्वांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यातील 9 जणांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला, तर 8 जणांची प्रकृती गंभीर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कांचीपुरम जिल्ह्यातील एका फटाक्यांच्या कारखान्यात भीषण आग लागली. कारखान्याला आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. लोकांनी तत्काळ अग्निशमन दल आणि पोलिसांना याची माहिती दिली. फटाक्यांच्या कारखान्याला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. तासाभराच्या अथक परिश्रमानंतर फटाका कारखान्यातील आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यासोबतच बचावकार्यही केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी फटाक्यांच्या कारखान्यातून 27 जणांची सुटका केली. गंभीर भाजलेल्या या सर्वांना बाहेर काढून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी 9 जणांना मृत घोषित केले. फटाका कारखान्याला लागलेल्या आगीत भाजलेल्या इतर 18 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 8 जणांची प्रकृती गंभीर आहे.