– विष्णू सूर्या वाघ
गेल्या वर्षीच्या ३० सप्टेंबरला मी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. माझ्यानंतर अवघ्या काही महिन्यांनी युगोडेपाचे नेते माथानी साल्ढाणा यांनीही आपल्या पक्षाचा त्याग करून भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. गोव्याच्या राजकारणाचा बारकाईने अभ्यास करणारा एक मित्र या घटनेनंतर भेटला. बोलता बोलता तो म्हणाला, ‘गोव्याच्या राजकारणात या वर्षी फार मोठं स्थित्यंतर घडणार आहे. कॉंग्रेस पक्षाचा संपूर्ण पराभव होणार आहे. तो करण्यात दोन माणसांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.’ मी त्यांना विचारलं, ‘कोण ही दोन माणसे?’ तो म्हणाला, ‘विष्णू वाघ आणि माथानी साल्ढाणा!’
त्याचं बोलणं थट्टेवारी नेत मी आतल्या आत हसलो. तो गंभीरपणे म्हणाला, ‘हसू नकोस… येणार्या काळात तुला याचं प्रत्यंतर येईल. तुम्ही दोघेही निवडणुकीला उभे राहाल, पण दोघांनाही आपला मतदारसंघ सोडून कुठेही बाहेर जाता येणार नाही. तरीही तुमच्या उमेदवारीचा अप्रत्यक्ष परिणाम गोवाभर होईल व भाजपचे आमदार बहुसंख्येने निवडून येतील.’
सरते शेवटी ३ मार्चला निवडणुका झाल्या. ६ मार्चला निकाल घोषित झाले. मी आणि माथानी दोघेही निवडून आलो. झुवारी नदीच्या दोन तीरांवर समोरासमोर आमचे मतदारसंघ. दोन्ही मतदारसंघांना जोडणारा झुवारीचा पूल. प्रचाराच्या काळात काही ठिकाणी मला माथानीची तीव्र गरज होती. तर त्याच्या कुठ्ठाळी मतदारसंघाच्या काही भागात तो मला घेऊन जाऊ बघत होता. पण आम्ही दोघेही आपापल्या मतदारसंंघात इतके जखडलो होतो की मनात असूनही एकमेकांच्या प्रचाराला जाऊ शकलो नाही. निकालाच्या दिवशी सायंकाळी आमची भेट झाली नि दोघांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली. तीन दिवसांनंतर मंत्रिमंडळ निर्मितीच्या पहिल्या टप्प्यात माथानीला स्थान मिळालं. पक्षातल्या प्रत्येक माणसाला माथानीला मंत्रिपद मिळाल्याचा आनंद आणि अभिमान वाटत होता. गेल्या दहा वर्षांच्या काळात भाजपसाठी जे काही त्याने सोसलं, भोगलं, त्याबद्दलची कृतज्ञता प्रत्येकजण बोलून दाखवत होता. मोठमोठी आमिषे असतानादेखील पर्रीकरांची साथ त्याने सोडली नाही. ‘सत्तेसाठी पक्ष बदलायला मी काही रंगबदलू सरडा नाही’ असे बाणेदार उत्तर दिले. पक्षांतर बंदी कायद्याची तलवार मस्तकावर लटकत असतानाही अपात्रतेची लढाई तो बाणेदारपणे लढला. आमदार म्हणून त्याची पहिली टर्म तशी अपूर्णच राहिली होती. ती यावेळी पूर्ण करणारच अशा जिद्दीने रणांगणात उतरला आणि मोठ्या दिमाखाने विधानसभेतही पोचला.
माथानीसारखा स्वच्छ चारित्र्याचा, स्थिर विचारांचा आणि तत्त्वनिष्ठ प्रणालीचा एक आमदार भाजपमध्ये आमच्यासोबत आहे ही भावनाच विधानसभेत नव्याने आलेल्या माझ्यासारख्या नवख्या आमदाराला मानसिक बळ देणारी होती. या बाराव्या विधानसभेत मी, प्रमोद सावंत, सुभाष फळदेसाई, गणेश गावकर, ग्लेन टिकलो, मायकल लोबो, नीलेश काब्राल, किरण कांदोळकर, कार्लुस आल्मेदा वगैरे पहिल्यांदाच प्रवेश करीत होतो. मागच्या विधानसभेत बदनाम झालेले अनेक पुढारी आमच्या सुदैवाने पडले होते. किंबहुना, जागृत झालेल्या मतदारांनीच त्यांना खड्यासारखे बाजूला फेकून दिले होेते. या परिस्थितीत माथानीसारख्या तत्त्वनिष्ठ राजकारण्याचे साहचर्य आम्हाला मार्गदर्शक ठरेल असा आम्हाला विश्वास होता. दुर्दैवाने नियतीने हे सुख आम्हाला लाभू दिले नाही. १९ मार्चला विधानसभेचे अधिवेशन सुरू झाले. आमदारांना शपथा दिल्या गेल्या. सभापतींची निवड झाली. गतकाळात दिवंगत झालेल्या मान्यवरांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली. विधानसभेतील माझे पहिलेवहिले भाषणही पार पडले. सभागृहात मुख्यमंत्री पर्रीकर, माथानी साल्ढाणा, मिलिंद नाईक आणि मी असे चौघेजण एकामागोमाग एक बसलो होतो. माझं भाषण झाल्यावर मध्ये कधीतरी माथानी चहाला बाहेर गेला. जाताना मला पाठीवर थोपटून ‘गूड मेडन स्पीच’ अशी शाबासकीही त्याने दिली. दुसर्या दिवशी राज्यपालांचं अभिभाषण होतं. त्यावेळी माथानी मला थकलेला वाटत होता. एकदोनदा वॉटर डिस्पेन्सरमधून पाणी घेऊन तो चहा करून प्याला. तेव्हा धीर करून मी त्याला विचारलंही, ‘दोतोर, तुका बरे दिसना?’ हसल्यासारखं करून तो म्हणाला, ‘ना रे… इलेसांवा कांसेर जाल्या. रेस्ट घेवपा जाय.’ ती विश्रांती त्याला शेवटपर्यंत मिळालीच नाही. अधिवेशनाचं सत्र संपल्यावर रमेश तवडकरसोबत तो काणकोण शिमगोत्सवाला हजर राहायला गेला. तिथे उशिरापर्यंत थांबला. काणकोणकरांनी चढवलेला रंगीत फेटा घेऊन उत्साहाने घरी आला. तब्बल रात्री एक वाजता बायकोला त्यानं उठवलं. म्हणाला, ‘आय गॉट अ सरप्रायझ फॉर यू…’ पुन्हा बाहेर जाऊन तो फेटा घालून आत आला व तिला विचारलं, ‘हाव डू आय लूक?’ काणकोणच्या त्या फेट्यात आयलीनला झालेलं माथानीचं हे शेवटचं दर्शन. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांनीच त्याला स्ट्रोक आला. पुढच्या एक तासात माथानी साल्ढाणा वर्तमानाच्या कवेतून निसटून भूतकाळाच्या मांडीवर विसावला होता.
माथानीचं हे असं अचानक एकाएकी जाणं सर्वांसाठी धक्कादायक होतं. कालपरवापर्यंत आमच्यामध्ये वावरणारा माणूस अशा रीतीनं आपल्यातून जावा हे पटण्यासारखं नव्हतंच. मनोहरभाईंची स्थिती तर अगदी सैरभैर झाली होती. तशातही स्वतःला सावरण्याचा ते अतोनात प्रयत्न करत होते. भाजपच्या विधिमंडळ गटाची सचिवालयात बैठक झाली, तेव्हा शोकसंदेशाचा ठराव पारित करताना भाई रोजच्या प्रमाणेच वागताना दिसले. पण दुपारी भाजपच्या प्रदेश कार्यालयात श्रद्धांजली वाहण्यासाठी जी बैठक झाली तिथे मात्र त्यांना अश्रू आवरता आले नाहीत. पार्सेकरांचं भाषण चालू असतानाच भाईंच्या अश्रूंचा बांध फुटला नि ते गपकन खाली बसले. पुढचं भाषणही करण्याच्या मनःस्थितीत ते नव्हते. त्यामुळे त्यांच्या वतीने डॉ. मिस्कितांना बोलावं लागलं. अनंत संकटे सहजपणे झेलून घेणार्या आणि आपल्या राजकीय कारकिर्दीत विषामागून विषाचे प्याले हसत हसत रिचवणार्या मनोहरभाईंना त्या दिवशी मी मुलासारखं रडताना पाहिलं. माथानींशी त्यांचे स्नेहबंध किती दृढ आणि सच्चे होते त्याचं ते साक्षात उदाहरण होतं.
माथानी साल्ढाणा हे नाव मी पहिल्यांदा ऐकलं ते इयत्ता पाचवी की सहावीत असताना. सांकवाळचा झुवारी प्रकल्प तेव्हा नुकताच सुरू झाला होता. लोक त्याला बिर्ला फॅक्टरी म्हणत. त्या फॅक्टरीच्या सांडपाण्यामुळे वेळसांव, कुठ्ठाळी, कांसावली या भागांतील विहिरी व नदीनाले प्रदूषित झाले होते. झुवारीच्या या प्रदूषणाविरुद्ध ज्या लोकांनी पहिल्यांदा आवाज उठवला त्यांत माथानी साल्ढाणा हे नाव होतं. त्यानंतरच्या काळात सातत्याने हे नाव वर्तमानपत्रांतून वाचायला मिळालं. गोव्यात वाढत चाललेल्या ट्रॉलरवाल्यांचा मुकाबला करण्यासाठी रापणकार एकत्र आले. ‘गोंयच्या रापणकारांचो एकवोट’ ही संघटना स्थापन झाली. तिचं नेतृत्व माथानीकडे गेलं. पुढं आम्ही कॉलेजला गेल्यानंतर विद्यार्थीचळवळीत पडलो. विद्यार्थी आंदोलनात मार्गदर्शन करायला ख्रिस्तोफर फोन्सेका, माथानी साल्ढाणा इत्यादी मंडळी अधूनमधून येत असत. १९८६ साली कोकणी राजभाषा आंदोलन झाले. माथानी त्यावेळी कोकणीची बाजू पोटतिडीकेने मांडत होता. आम्ही मराठीच्या बाजूने लढत होतो. साहजिकच माथानीबद्दलच्या नाराजीची एक सूक्ष्म अढी मनात रेंगाळत होती. मधल्या काळात त्याने गोमंत लोकपक्ष स्थापन केला. लोक गमतीने त्याला ‘पक्षाचे नाव गोलोप, गोंयान घालतलो हुलोप’ असं म्हणायचे. मला आठवतं गोलोपच्या उमेदवारांना सायकल हे चिन्ह मिळालं होतं आणि व्हिक्टोरिया फर्नांडिस, दिलीप बोरकर वगैरे लोक त्या पक्षाचे उमेदवार होते. गोमंत लोकपक्षाला राजकारणाला कधीच यश मिळालं नाही. पण माथानीने खचून न जाता निवडणुकीमागून निवडणूक लढण्याचा सपाटाच चालवला. सरतेशेवटी २००० साली त्याच्या प्रयत्नांना यश मिळालं आणि आयुष्यातली पहिली जिल्हा पंचायतीची निवडणूक तो जिंकून आला. ही निवडणूक म्हणजे त्याच्यासाठी एक स्टॅपिंग स्टोन होती. २००२ साली त्याने युगोडेपाची तिकीट घेतली आणि कुठ्ठाळी मतदारसंघातून माविन गुदिन्होला धूळ चारली. त्या निवडणुकीत माविनने प्रचंड दहशत निर्माण केली होती. माथानीचं चिखली येथील कार्यालय माविनच्या माणसांनी फोडून टाकलं होतं. तरीही माथानी जिंकला. विधानसभेत पोचला. युगोडेपाचा पाठिंबा घेणं भाजपसाठी अनिवार्य बनलं. पण तत्त्वनिष्ठ माथानीनं सुरुवातीला पूर्ण सावधगिरी बाळगण्याचा पर्याय स्वीकारला. जसजशी मनोहर पर्रीकरांची कार्यपद्धती त्याने पाहिली तसतसा तो प्रभावित होत गेला आणि पर्रीकरांच्या अंतर्गत वर्तुळात एक मित्र व सहकारी म्हणून त्याने स्थान पटकावले. मधल्या काळात पर्रीकरांची, पर्यायाने भाजपची साथ माथानीने सोडावी म्हणून खूप प्रयत्न झाले. पण मैत्रीला जागण्याच्या अट्टाहासापायी माथानी आपल्या जाग्यावर अडग राहिला. मोठमोठी आमिषे त्याने ठोकरून लावली. २००५ साली पर्रीकरांचे सरकार पाडण्यात आले. पाच आमदार भाजपातून फुटले. माथानीही सोबत येईल अशी कॉंग्रेसला आशा होता. त्यावेळी तो स्पेनला होता. मुंबई विमानतळावर उतरताच त्याला उचलायचे अशा बेत कॉंग्रेसवाल्यांनी केला होता. पण माथानीने त्यांना स्पष्ट शब्दांत बजावले. ‘मला तुम्ही कोण समजता? रंग बदलणारा सरडा? मी पर्रीकरना शब्द दिला आहे, त्या शब्दाशी प्रामाणिक राहीन. पर्रीकरांशी कधी प्रतारणा करणार नाही!’
आयुष्याच्या शेवटपर्यंत माथानीने हे वचन पाळले. गेल्या वर्षीच्या उत्तरार्धात त्याने भाजपमध्ये प्रवेश केला. माथानीसारखा कॅथलिक समाजाचा बलदंड नेता भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतो ही घटनाच गोव्याच्या राजकारणाचा पुढचा प्रवास बदलणारी होती. ‘हिंदुत्वनिष्ठ पक्ष’ हा भाजपवर बसलेला शिक्का मिटवण्याचा आटोकाट प्रयत्न करण्याची जबाबदारी एकट्या फ्रान्सिस डिसौझाच्या शिरावरच यापूर्वी पडत असे. पण आता माथानी आल्यामुळे परिस्थितीत निश्चित फरक पडला. गोव्यातील कॅथलिक समाज कॉंग्रेसला पाडण्यासाठी यंदा कमळावरती शिक्का मारणार असे लोक उघडपणे बोलू लागले. माथानीसारखा माणूस जर भाजपाची तिकीट घेत असेल तर कॅथलिक लोकांनी भाजपाला मते का देऊ नयेत? हा प्रश्न राजकीय वर्तुळात खुलेआमपणे विचारला जाऊ लागला.
गोव्यात आज मगो पक्षाच्या साथीने भाजपचे सरकार सत्तारूढ झाले आहे. गुरुवारी संस्थगित झालेल्या विधानसभेचे अधिवेशन सोमवारी पुन्हा सुरू होणार आहे. यावेळी ४० पैकी ३९ आसने भरलेली असतील. रिकामे असेल ते फक्त मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या बरोब्बर मागे असलेले माथानीचे आसन. त्या आसनावर पुढे कोण येऊन बसेल ते येणारा काळ ठरवील. पण तूर्तास माथानी साल्ढाणा नावाच्या सतत घोंघावणार्या अस्वस्थ वादळाची गाज प्रत्येक गोमंतकीयाच्या हृदयात घुमत राहील, यात मात्र शंका नाही.
माथानी नावाचं गाव
माथानी साल्ढाणा हे केवळ एक नाव नव्हतं….
गोंयकारपणाने गहिवरलेलं ते एक जितंजागतं गाव होतं…
माणसं येतात, माणसं जातात…
बरीचशी काळाच्या उदरात गडप होतात…
पण काही महाभाग असेही असतात…
जे कर्तृत्वाची छन्नी–हातोडी घेऊन
काळाच्या कातळावर आपलं शिल्प कोरून जातात…
माथानी हे असंच एक अस्वस्थ वादळ…
जे घोंगावत राहिलं सतत तिसेक वर्षं…
दीनदुबळ्यांचा आवाज होऊन..
दुःखितांचं शस्त्र होऊन…
दूरवर असलेल्या प्रकाशाचं शिखर पाहत…
तुडवीत राहिला काट्याकुट्यांनी माखलेल्या वाटा….
भूमिपुत्रांचे किनारे राहावेत सुरक्षित म्हणून
छातीचा कोट करून झेलत राहिला
समुद्राच्या अजस्त्र लाटा…
विकासाच्या नावाने भन्नाट सुसाटत निघालेल्या
जागतिकीकरणाच्या गाडीला त्यानेच तर मधोमध अडवलं…
मुकाट्याने अन्याय सहन करणार्यांना
रस्त्यावर येऊन मुकाबला करण्यासाठी घडवलं…
माथानी होता पेशाने शिक्षक,
पण वृत्तीने मात्र सदैव राहिला हाडाचा कार्यकर्ता…
वर्षांमागून वर्षं गेली
पण याचा संघर्ष कधी संपला नाही…
अनेक जण साथीला आले
काही संगत सोडून गेले
तरी हा लढवय्या भिऊन मागे हटला नाही…
गोंयकारपण हा त्याचा श्वास होता
गोवा सांभाळणं हा त्याचा ध्यास होता
कोंकणी अस्मितेवर त्याचा अतीव विश्वास होता
नि भूमिपुत्रांच्या हक्कांसाठीच
त्याच्या आयुष्याचा प्रवास होता…
त्याचं अर्ध आयुष्य लढण्यात गेलं
अगदी शेवटी बाग फुलली
पण फुलांची दोस्ती करण्याआधीच
त्याच्या आयुष्याची दोरी तुटली
कोणाला काही न सांगता
माथानी निघून गेला
चिरंतनाच्या यात्रेला…
मागं ठेवून त्याच्या असंख्य लढायांच्या
रोमहर्षक कहाण्या…
या कहाण्यांचा आता एक अढळ दीपस्तंभ होईल
समाजासाठी लढू पाहणार्या झुंजारांचा आदर्श होईल
सकाळ–संध्याकाळ माडावर चढणारा रेंदेर
आता नुसतीच सूर काढणार नाही
आभाळाला कवेत घेण्याची तो स्वप्ने पाहील
खारव्याच्या रापणीत येणार नाहीत फक्त
ताजे फडफडीत मासे…
क्षितिजावर स्वार होण्याची विजिगिषु वृत्ती
त्याच्या मनात लाटांसारखी हलत राहील…
राज्यकर्ते आखतील जेव्हा जेव्हा
गोव्याला उद्ध्वस्त करण्याची कुटील कारस्थाने
तेव्हा माथानी नावाच्या विचारांचं वादळ
त्यांना जमीनदोस्त करत राहील…
माथानी हे अजब रसायन होतं
त्याचं जगणं म्हणजेच सृष्टीचं गायन होतं
या सृष्टीच्या रक्षणासाठीच सेझ विरोधात
त्याने आघाडी उघडली
पर्यावरणाच्या संवर्धनासाठी झुआरी ऍग्रोच्याविरोधात
ऐन जवानीत लढाई छेडली
झुंज हे त्याचं इतिकर्तव्य बनलं
सत्तेचं मृगजळ पुढे पुढे धावत राहिलं…
अगदी काही दिवसांपूर्वीच हे नष्टचर्य संपलं
भाजपला पूर्ण बहुमत मिळालं
मनोहरभाईंचं एकछत्री राज्य आलं
पहिल्याच टप्प्यात माथानीलाही
मंत्रिपद मिळालं.
पण लाल दिव्याच्या गाडीचं सूख
अक्षरशः क्षणभंगुर ठरलं
माथानी आज आमच्यात नाही
पण एखाद्या पुरातन संतासारखा
त्याचा धीरगंभीर चेहरा
मनाच्या आरशात पुन्हा पुन्हा दिसत राहील…
आझाद मैदानावर अनेकदा घुमलेला
त्याचा खुला दमदार आवाज
कानामध्ये घुमत राहील…
कदाचित तो पुन्हा पुन्हा ओरडून सांगेल
‘तलवारी म्यान करू नका,
अजून लढाई थांबलेली नाही!’
किंवा असंही बजावून सांगेल
‘लाल दिवा नशिबी आला,
तरी तुमचा कणा ताठ ठेवायला चुकू नका.
स्वर्गातून कुबेर आला पैशांच्या थैल्या घेऊन
तरी आपला गोवा धनिकांना विकू नका’
माथानी साल्ढाणा हे केवळ एक नाव नव्हतं
माणूसपणाने भारलेलं
तत्त्वनिष्ठेने डवरलेलं
गोंयकारपणाने रसरसलेलं
ते एक जितंजागतं गाव होतं….