Home बातम्या डॉ. सुरेश आमोणकर यांचा आज भाजपामध्ये फेरप्रवेश

डॉ. सुरेश आमोणकर यांचा आज भाजपामध्ये फेरप्रवेश

0

पाळी मतदारसंघाचे माजी आमदार व माजी आरोग्यमंत्री डॉ. सुरेश आमोणकर हे आज रविवार दि. २७ रोजी भारतीय जनता पक्षामध्ये फेरप्रवेश करणार आहेत. पणजीत भाजपाच्या प्रदेश कार्यालयात आज संध्याकाळी चार वाजता काही कार्यकर्त्यांसह त्यांना स्वगृही प्रवेश दिला जाणार आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून दोन वेळा निवडून आल्यानंतर सुमारे तीन वर्षे भाजपाची धुरा यशस्वीपणे हाताळताना दोन वेळा लोकसभा उमेदवारांच्या विजयात त्यांनी योगदान दिले होते. दोनवेळा ते पाळी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर आरोग्यमंत्री, समाजकल्याण मंत्री, प्रोव्हेदोरिया आदी खातीही त्यांनी सांभाळली होती.

पाळी मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाने डॉ. आमोणकर यांना बाजूला सारून डॉ. प्रमोद सावंत याला उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या डॉ. आमोणकरांनी भाजपाला रामराम ठोकून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती.

आता विधानसभा निवडणूक जवळ आल्याने व भाजपाला राज्यात सत्तेचे वेध लागल्याने सक्षम उमेदवारांना पक्षात प्रवेश देऊन पक्ष मजबूत करण्याची मोहीम पक्षाने हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा निर्णय घेतला गेला आहे.