– शंभू भाऊ बांदेकर
१९८४ च्या गोवा विधानसभेत डॉ. काशिनाथ गोविंद जल्मी आणि मी दोघांनीही बरोबरच प्रवेश केला. डॉ. जल्मी होते महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे आमदार आणि मी होतो सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाचा आमदार. पण हा पक्षीय भेद आमच्या आड कधीच आला नाही. याचे कारण म्हणजे आम्हा दोघांची नाळ राष्ट्र सेवा दलाशी जुळलेली होती. त्यामुळे ‘खरा तो एकचि धर्म | जगाला प्रेम अर्पावे’ हा आम्हा दोघांच्याही जीवनाचा मूलमंत्र होता. पू. साने गुरूजी आम्हा दोघांनाही वंदनीय होते. त्यांचे साहित्य आम्हाला प्रिय होते, श्री. नरहर कुरुंदकर, वि. स. खांडेकर हे आम्हा दोघांचेही आवडते लेखक होते. डॉ. जल्मी कवी नसले तरी अनेक कविश्रेष्ठांच्या कविता त्यांना तोंडपाठ होत्या आणि मी एक उदयोन्मुख कवी होतो. शिवाय सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही सामाजिक बांधिलकी मानून दीनदलित, शोषित – पीडितांसाठी तन – मन – धनाने कार्यरत असलेले कार्यकर्ते होतो. त्यामुळे अखेरपर्यंत आमचे संबंध हे जिवाभावाचे स्नेही असेच राहिले.
डॉ. जल्मी हे पुरोगामी विचारवंत होते. मंत्र, जप – जाप्य करून देव पावणार नाही, तर ‘मानवसेवा हीच ईश्वरसेवा’. त्यातून तुम्हाला परमेश्वर सुखा – समाधानाचे दिवस देईल, असे ते म्हणत. पेशाने डॉक्टर असलेल्या जल्मींनी आपल्या वैद्यकीय पेशाचा उपयोग ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ अशा पद्धतीने केला हे मी स्वतः पाहिले आहे. ‘‘मी गरिबीशी सामना करीत, हालअपेष्टा सोसत डॉक्टर झालो याचे माझ्या वडिलांना फार कौतुक वाटे. म्हणून मी माझ्या दवाखान्याचे नामकरण सुद्धा ‘गोविंद क्लिनिक’ केले आहे’’ असे त्यांनी मला अभिमानाने सांगितले होते.
आणखी एक गोष्ट ते आपल्या मित्रपरिवाराला आवर्जून सांगत ती म्हणजे आपण गोमंतक गौड मराठा समाजातील पहिला डॉक्टर जरी असलो, तरी आरक्षण घेऊन डॉक्टर झालेलो नसून केवळ गुणवत्तेच्या आधारे डॉक्टर बनलो आहे.
डॉ. जल्मी हे आमदार, मंत्री, विरोधी पक्षनेता या सगळ्या भूमिकांना न्याय देऊ शकले, याचे कारण त्यांची अभ्यासूवृत्ती. एखादा प्रश्न विचारायचा झाला तर त्या प्रश्नाला पूरक असे उपप्रश्न तयार करणे, विषयाची पूर्ण माहिती गोळा करणे, आपल्या प्रश्नाला समर्पक उत्तर मिळेपर्यंत चिकाटीने त्याचा पाठपुरावा करणे, विधानसभेच्या कामकाजासाठी किंवा एखाद्याला घेरायचे असेल तर त्यासाठी आवश्यक नियमांचा गाढा अभ्यास करणे या सार्या गोष्टी ही डॉ. जल्मींची खासीयत होती.
मला विधानसभेतील असाच एक प्रसंग आठवतो. शेतकी मंत्र्यांची भंबेरी उडवण्यासाठी ते आपला प्रश्न, उपप्रश्न, संबंधित उत्तरे यात गढून गेले होते. मला पाहताच म्हणाले, ‘‘आज बघत राहा. तुझ्या शेतकी मंत्र्यांची कशी मी त्रेधातिरपिट उडवतो!’’ मी कृषीमंत्री फ्रान्सिस सार्दिन यांना सावध केले. ते म्हणाले, ‘‘डोन्ट वरी. आय ऍम फुल्ली प्रिपेअर्ड’’ मग प्रश्नोत्तरांच्या तासाला दोघांची जुगलबंदी सुरू झाली. एकाच प्रश्नाने तब्बल पंधरा मिनिटे घेतली. कोणीच कोणाला हार जात नव्हते. मग सभापतींनी दुसरा प्रश्न पुकारला. दोघांनीही माझ्याकडे पाहून मंद स्मित केले. मी सुटकेचा निःश्वास सोडला.
असाच आणखी एक प्रसंग आठवतो. विधानसभेच्या कामकाजात भाग घेताना त्यांनी विषयाची केलेली मुद्देसुद मांडणी, संबंधित नियमांच्या आधारे केलेले अभ्यासपूर्ण भाषण ऐकून तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे व सभापती ऍड. दयानंद नार्वेकर यांनी डॉ. जल्मी यांना कौतुकाने ‘डॉक्टर ऑफ लॉ’ म्हणून संबोधले. उपस्थितांनी बाके वाजवून त्यांच्या म्हणण्यास दुजोरा दिला.
चहापानाच्या वेळी मी डॉ. जल्मी यांचे अभिनंदन करण्यासाठी विरोधी पक्षनेते ऍड. रमाकांत खलप यांच्या चेंबरमध्ये गेलो. खलपांनी भावनाविवश होऊन जल्मींना जवळजवळ मिठीच मारली आणि म्हणाले, ‘‘आय ऍम प्राऊड ऑफ यू माय बॉय!!’’ दोघांच्याही डोळ्यांनी आनंदाश्रूंना वाट करून दिली. त्यात मीही सामील झालो.
मुख्यमंत्री राणे यांनी इतर राज्यांमध्ये अनुसूचित जाती – जमातींसाठी कोणत्या योजना राबवल्या आहेत, त्यातील कोणत्या योजनांची अंमलबजावणी गोव्यासाठी करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी श्री. वासू पाईक गावकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली होती. मीही या समितीचा उपाध्यक्ष होतो. सर्वश्री ऍड. बाबुसो गावकर, डॉ. काशिनाथ जल्मी, प्रकाश शंकर वेळीप, श्रीकांत मळीक हे आमदार या समितीचे सदस्य होते. समाजकल्याणमंत्री हरिष झांट्ये यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्यावेळी बिहार राज्याचा दौरा केला. सरकारला मग सविस्तर अहवाल सादर केला. हा अहवाल तयार करण्यामध्ये डॉ. जल्मी यांचा सिंहाचा वाटा होता.
डॉ. जल्मी हे उत्तम संघटक होते. ‘गाकुवेध’ ला संघटित करून त्यांच्या मागण्या धसास लावण्याच्या कामात त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरेल. अजूनही धनगर समाजाचा अनुसूचित जमातींत समावेश झालेला नाही, याविषयी त्यांनी माझ्याकडे अनेकदा खेद व्यक्त केला होता. या समाजासाठी आम्ही काही तरी करूया असे ते मला अनेकदा सांगत. तू लेख लिहितोस, त्यांच्या समस्यांना वाचा फोड असे त्यांनी सांगितल्याने मी या विषयासंबंधी दोन – तीन लेखही लिहिले होते.
डॉ. जल्मींच्या आठवणी असंख्य आहेत. त्यांच्या निधनाने माझा एक जिवाभावाचा स्नेही गेला. गोरगरिबांचा कैवारी गेला आणि गोवा एका उत्तम संसदपटूला मुकला. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच मनोकामना.