Home बातम्या डॉलरऐवजी स्थानिक चलनांतून व्यापाराचा ‘ब्रिक्स’ राष्ट्रांचा संकल्प

डॉलरऐवजी स्थानिक चलनांतून व्यापाराचा ‘ब्रिक्स’ राष्ट्रांचा संकल्प

0

ब्राझिल, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका या पाच देशांच्या ‘ब्रिक्स’ परिषदेत काल महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षर्‍या झाल्या. सध्याच्या अस्थीर जागतिक वातावरणाच्या पार्श्वभूमीवर पाचही देशांतील व्यापार स्थानिक चलनांतून चालविण्याविषयीचा करार झाला. तसेच एकमेकांना पतपुरवठा करण्याच्यादृष्टीने जागतिक बँकेच्या धर्तीवर विकास बँक स्थापण्याविषयीही विचार करण्याचे ठरविण्यात आले.

याशिवाय पाचही राष्ट्रांनी परस्पर व्यापार वाढविण्याचे ठरविण्यात आले. एकमेकांना स्थानिक चलनाच्याआधारे पतहमीची सुविधा देण्याविषयीचा करार परिषदेचा सर्वात मोठी फलश्रुती मानण्यात येत आहे. या देशांत होणारा व्यापार डॉलरच्या आधारे होत होता तो आता स्थानिक चलनांतून होईल.

स्थानिक चलनांतून व्यापारास करारामुळे या देशांतील परस्पर व्यापाराची भरभराट होईल, असे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सांगितले. ब्रिक्स विकास बँक स्थापण्याविषयीच्या प्रस्तावावर अर्थमंत्री अभ्यास करून परिषदेसमोर मत मांडतील, असे सिंग यांनी सांगितले.

अशी बँक स्थापन झाल्यास जागतिक बँकेच्या धर्तीवर या राष्ट्रांना विकासासाठी कर्ज घेता येईल. तसेच कठीण आर्थिक परिस्थितीवेळी ही बँक मदत करू शकेल. सर्व ‘ब्रिक्स’ राष्ट्रांनी संयुक्तपणे जारी केलेल्या वक्तव्यात म्हटले आहे की, ‘बाजारातील स्थिती सावरणे व बाजारात पुन्हा विश्‍वास निर्माण करणे व रोजगारनिर्मिती करणार्‍या विकासास चालना देणे हे तातडीचे पाऊल असेल.’ दरम्यान, इराण व सिरीयातील सध्या चालू असलेले पेचप्रसंग केवळ चर्चेतूनच सोडविले जाऊ शकतात असे सांगून एकाअर्थी ब्रिक्स राष्ट्रांनी अमेरिकेच्या युद्धाच्या संकेतांना प्रतिकूलता व्यक्त केली.

 

सीमाप्रश्‍नावर तोडग्याचा भारत-चीनमध्ये संकल्प

ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत झालेल्या भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग व चिनी राष्ट्रपती हु जिंताओ यांच्यातील चर्चेत वर्ष २०१२ भारत-चीन मैत्रीचे वर्ष म्हणून ठरविण्यात आले.

त्याचप्रमाणे परस्पर राजकीय विश्‍वास वाढीस लावणे आणि शतकांपासूनच्या जुन्या सीमाप्रश्‍नी तोडगा काढणे गांभीर्याने घेण्याचेही ठरविण्यात आले. याच सीमाप्रश्‍नावरून १९६२मध्ये भारत व चीनदरम्यान, युद्ध झाले होते.

यावेळी जागतिक महत्त्वाच्या अन्य विषयांवरही चर्चा झाली. भारताने तिबेटींची निदर्शने काबुत ठेवल्याबद्दल जिंताओ यांनी प्रशंसा केल्याचे कळते. दरम्यान, हु जिंताओ यांची ही अखेरची भारत भेट असून वर्षअखेरीस चीन राष्ट्राध्यक्षपदाचा ताबा नियोजित पद्धतीनुसार क्शी जिनपिंग हे घेणार आहेत.

कुंडकुलम अणु प्रकल्पाची भारताकडून रशियाला हमी

भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेत्रेदेव यांच्यात काल झालेल्या चर्चेत उभय राष्ट्रांमधील नागरी अणु सहकार्य करार आणखी बळकट करण्यावर चर्चा झाली. तामीळनाडू येथील रशियाच्या कुंडकुलम अणू ऊर्जा भट्टीचे काम तूर्त आंदोलनामुळे थांबलेले होते मात्र ते पूर्ववत सुरू झाले असून ठरलेल्या कार्यक्रमानुसार ते पूर्ण होईल, अशी हमी भारताच्यावतीने रशियाला देण्यात आली.

दरम्यान, मेत्रेदेव यांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. मेत्रेदव यांची राष्ट्राध्यक्ष म्हणून अखेरची भारत भेट असून येत्या मे महिन्यात रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी ब्लादिमेर पुतीन विराजमान होत आहेत.